दिल्लीत सत्तारुढ-विरोधकांची निदर्शने

आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात : केजरीवालांच्या राजीनाम्याची भाजपकडून मागणी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली असून सध्या ते 28 मार्चपर्यंत कोठडीत असणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना अटक झाल्याने आम आदमी पक्षाने भाजपवर तपास यंत्रणेच्या गैरवापराचा आरोप केला आहे. आम आदमी पक्षाने मंगळवारी दिल्लीत निदर्शने करत पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव […]

दिल्लीत सत्तारुढ-विरोधकांची निदर्शने

आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात : केजरीवालांच्या राजीनाम्याची भाजपकडून मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली असून सध्या ते 28 मार्चपर्यंत कोठडीत असणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना अटक झाल्याने आम आदमी पक्षाने भाजपवर तपास यंत्रणेच्या गैरवापराचा आरोप केला आहे. आम आदमी पक्षाने मंगळवारी दिल्लीत निदर्शने करत पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
केजरीवाल यांना मागील आठवड्यात अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली होती. नैतिकतेच्या आधारावर केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी भाजपची मागणी आहे.
आपच्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या परिसरात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली होती. संबंधित परिसरात कलम 144 लागू करण्यात आल्याने तेथे कुठल्याही प्रकारचे आंदोलन करण्याची परवानगी नव्हती, असे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दिल्लीतील एका मेट्रोस्थानकाच्या बाहेर आम आदमी पक्षाने निदर्शने केली आहेत. तेथे आप कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
केजरीवाल यांना अटक केल्यामुळे दिल्लीतील जनता भाजपवर नाराज आहे. संपूर्ण दिल्ली आणि देशातील जनता संतप्त असून भाजपविरोधात स्वत:चा राग व्यक्त करत आहे. देशाला पुढे नेण्याचे ध्येय असलेल्या केजरीवाल यांना भाजपने तुरुंगात टाकले आहे. मोदी हे केजरीवालांचा द्वेष करतात, त्यांना घाबरतात असा दावा आप नेते दुर्गेश पाठक यांनी केला आहे.
 
भाजपकडून निदर्शने
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगात आहेत, त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी अन्य कुणाकडे सोपवावी. अटक होऊनही केजरीवाल मुख्यमंत्रिपदावर आहेत, याचा अर्थ ते असुरक्षिततेच्या भावनेमुळे पद सोडत नसावेत अशी टीका भाजप खासदार हर्षवर्धन यांनी केली आहे. तर केजरीवालांच्या राजीनाम्यासाठी भाजपने दिल्लीत निदर्शने केली आहेत.