सर्व आपत्कालीन उपाययोजना सज्ज ठेवाव्यात

अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त एस. एस. बिरादार यांची सूचना खानापूर : तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीविताचे आणि मालमत्तेचे पुरामुळे तसेच पावसामुळे नुकसान होणार नाही याची सर्व तालुकास्तरीय, ग्राम पंचायतस्तरीय अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, पुरापासून धोका टाळण्यासाठी सर्व उपाययोजना आखाव्यात आणि सतर्क राहून नागरिकांना सहकार्य करावे, तसेच पुराचा धोका असलेल्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना सज्ज ठेवाव्यात, अशा सूचना अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त एस. एस. बिरादार यांनी […]

सर्व आपत्कालीन उपाययोजना सज्ज ठेवाव्यात

अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त एस. एस. बिरादार यांची सूचना
खानापूर : तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीविताचे आणि मालमत्तेचे पुरामुळे तसेच पावसामुळे नुकसान होणार नाही याची सर्व तालुकास्तरीय, ग्राम पंचायतस्तरीय अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, पुरापासून धोका टाळण्यासाठी सर्व उपाययोजना आखाव्यात आणि सतर्क राहून नागरिकांना सहकार्य करावे, तसेच पुराचा धोका असलेल्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना सज्ज ठेवाव्यात, अशा सूचना अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त एस. एस. बिरादार यांनी आयोजित केलेल्या खानापूर तालुका अधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या. या बैठकीला जि. पं. मुख्य योजना अधिकारी गंगाधर दिवटर, तहसीलदार प्रकाश गायकवाड, ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी विरनगौडर एगनगौडर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी तालुकास्तरीय सर्व खात्याचे अधिकारी आणि ग्राम पंचायतीचे विकास अधिकारी उपस्थित होते.
खानापूर तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने तसेच दुर्गम भाग असल्याने तालुक्यात पावसाळ्यात पुराचा धोका कायम आहे. त्यामुळे आपत्कालीन उपाययोजना सज्ज ठेवणे गरजेचे आहे. तालुक्यात रस्त्याच्या बाजूने असलेली जीर्ण झाडे, जीर्ण शालेय इमारती तसेच विद्युतखांब, जीर्ण घरे यांच्यामुळे पावसात धोका असतो. याबाबत ग्राम पंचायतस्तरीय अधिकाऱ्यांनी अहवाल तयार करून वरिष्ठांकडे देण्यात यावा. तसेच आवश्यक ठिकाणी उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. पावसामुळे शक्य तितके कमी नुकसान होईल, याची खबरदारी शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. गेल्या 2019-2020 साली झालेल्या महापुराच्या वेळेचा अनुभव लक्षात घेऊन सर्व आपत्कालीन उपाययोजना सज्ज ठेवाव्यात, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी याबाबत जागरुकता बाळगावी, असे ते म्हणाले. यावेळी पशू संगोपन खात्याचे अधिकारी ए. एस. कोडगी, समाज कल्याण खात्याचे व्ही. आर. नागनूर, मागास कल्याण खात्याचे कांतापुरी, गटशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची, कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.