दीड महिन्यानंतर पुन्हा शाळांमध्ये किलबिलाट

दीड महिन्यानंतर पुन्हा शाळांमध्ये किलबिलाट

फुलांची उधळण करत अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत : नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ
बेळगाव : मागील दीड महिन्यापासून शुकशुकाट असलेला शाळांचा परिसर शुक्रवारी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजला. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्यासाठी पालकांची ओढाताण दिसून आली. यावर्षीही शाळांनी अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना गोडधोड खाऊ घातले. त्यामुळे आनंदात नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार दीड महिन्याच्या उन्हाळी सुटीनंतर शुक्रवार दि. 31 मे पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मागील दोन दिवसांपासून शाळांमध्ये शिक्षक व पालकांची जय्यत तयारी सुरू होती. शाळा सुधारणा कमिटीच्या सहकार्याने शाळांमध्ये फुलांची तोरणे बांधण्यात आली होती. काही ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली. विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच वर्गात आल्यावर पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
गोड खाऊसह मध्यान्ह आहाराचे वाटप
प्रत्येक शाळांमध्ये प्रारंभोत्सव आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने विविध खेळ व चित्रकृतींची निर्मिती करण्यात आली. याचबरोबर विद्यार्थ्यांना गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात गोड करण्यात आली. त्याचबरोबर दुपारी मध्यान्ह आहाराचे वितरण करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस असल्याने नवीन गणवेश, वह्या, पुस्तके, दप्तर घेऊन विद्यार्थी शाळांमध्ये आले होते. बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 3078 सरकारी, 254 अनुदानित तर 659 विनाअनुदानित प्राथमिक शाळा आहेत. तर 330 सरकारी, 364 अनुदानित व 442 विनाअनुदानित माध्यमिक शाळा आहेत. बेळगाव जिल्ह्यात एकूण 8 लाख 50 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व शाळा शुक्रवारपासून खुल्या करण्यात आल्या. शिक्षणाधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली.
पहिल्याच दिवशी 19 लाख पाठ्यापुस्तकांचे वाटप
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात यावर्षी 39 लाख 35 हजार 856 पाठ्यापुस्तकांची मागणी आहे. त्यापैकी 19 लाख 42 हजार पुस्तके शाळांना वाटप करण्यात आली आहेत. उर्वरित पुस्तके येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने वितरित केली जाणार आहेत. विनाअनुदानित व खासगी शाळांनी 10 लाख 76 हजार 450 पुस्तकांची मागणी केली होती. यापैकी 6 लाख 78 हजार पुस्तकांची विक्री शाळांना करण्यात आली आहे. यापैकी अनेक शाळांनी पहिल्याच दिवशी पाठ्यापुस्तकांचे विद्यार्थ्यांना वितरण केले.