प्रश्न मांडा, विरोधकांसारखे बोलणे टाळा!
पक्षाची शिस्त मोडू नये, अंगीकारावी : अगोदर जनतेच्या समस्या सोडवा,मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या सूचना
पणजी : भारतीय जनता पक्षात पक्षापेक्षा कोणी मोठा नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेऊन आपले कर्तव्य पार पाडायला हवे. पक्षाला अंधारात ठेवून गुपचूप दिल्लीच्या वाऱ्या करणाऱ्यांनी सावध राहून सरकारला साथ द्यावी. इतकेच नव्हे, तर विरोधक बोलतात तसे सरकारच्या विरोधात बोलणे टाळायला हवे. तुमचे प्रश्न, समस्या सरकारकडे मांडा, परंतु त्यांचे भांडवल करण्यापेक्षा त्या सोडवण्यावर भर द्या, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सत्ताधारी आमदारांना दिल्या आहेत. पर्वरी मंत्रालयात काल सोमवारी घेण्यात आलेल्या बैठकीला सत्ताधारी पक्षातील बहुतांश आमदार उपस्थित होते. या सत्ताधारी आमदारांच्या बैठकीत दिल्ली वारी आणि सरकार विरोधी कारवायांविषयीचे विषय चर्चेला आले.
… त्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडवा
पक्ष नेतृत्वाला कोणत्याही प्रकारे कल्पना न देता आणि मुख्यमंत्री सावंत यांनाही न कळवता काही मंत्र्यांनी दिल्लीला भेट देऊन वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. प्रोटोकोल म्हणजे शिष्टाचारानुसार तुमचे प्रश्न असल्यास प्रथम राज्यातील नेतृत्वाकडे बोलायला हवे, मुख्यमंत्र्यांकडे समस्या मांडायला हव्यात, मनमानी कारभार करणाऱ्या मंत्र्यांनी, आमदारांनी यापुढे हे लक्षात ठेवून जनतेच्या समस्या सोडवाव्यात, असे तानावडे यांनी सांगितले.
पक्षाची शिस्त मोडू नये, अंगीकारावी
मंत्र्यांनी कोणाचीही भेट घेण्यासाठी जाताना पक्षाला आणि मुख्यमंत्र्यांना कल्पना द्यावी. ही प्रथा आहे. भाजपात आलेल्यांनी पक्षाची ही शिस्त अंगीकारावी. पक्षाच्या शिस्तीबाहेर जाऊ नये असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, बैठकीनंतर काही मंत्री एकमेकांच्या केबिनमध्ये बराचवेळ चिंतन करण्यात व्यस्त होते. सत्ताधारी गटाच्या आजच्या बैठकीनंतर काही मंत्र्यांच्या स्वतंत्र बैठका झाल्या. त्यात पक्ष नेतृत्वाने दिलेल्या सूचनांबाबत बराच वेळ चर्चा झाली.
दिल्लीवाऱ्या करणाऱ्या मंत्र्यांना खडसावले
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळातील फेरबदल होण्याबाबत चर्चा होत असतानाच काल सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अचानक सत्ताधारी आमदारांची बैठक बोलवली. मात्र ही बैठक मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत नसल्याचे सांगून उलट दिल्लीवाऱ्या करणाऱ्या मंत्र्यांना खडसावून काढले. बैठकीनंतर एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे, असे सांगितले. मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत आपण काहीच चर्चा केलेली नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. तीन मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्याजागी तीन नव्या आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. पण, हे बदल येत्या 15 जुलैपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनानंतरच होतील, असे एका आमदाराने सांगितले.
आमदार, मंत्र्यांना अधिवेशनाबाबत सूचना
सरकारातील मंत्री व सत्ताधारी आमदारांसोबत केवळ विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत बैठकीत कोणत्याच प्रकारे चर्चा झालेली नाही. पावसाळी अधिवेशनात संपूर्ण अर्थसंकल्पाला मान्यता मिळवून घेण्यासह आमदारांचे प्रश्न आणि विविध मतदारसंघांतील विकासकामांवर चर्चा करण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांना सांगितले. बैठक संपताच कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे व पशुपालन व पशूसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर त्वरित बाहेर पडले. त्यांनी पत्रकारांशी बोलण्याचेही टाळल्याने त्यांच्याविषयी उलट-सुलट चर्चा झाल्या.
Home महत्वाची बातमी प्रश्न मांडा, विरोधकांसारखे बोलणे टाळा!
प्रश्न मांडा, विरोधकांसारखे बोलणे टाळा!
पक्षाची शिस्त मोडू नये, अंगीकारावी : अगोदर जनतेच्या समस्या सोडवा,मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या सूचना पणजी : भारतीय जनता पक्षात पक्षापेक्षा कोणी मोठा नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेऊन आपले कर्तव्य पार पाडायला हवे. पक्षाला अंधारात ठेवून गुपचूप दिल्लीच्या वाऱ्या करणाऱ्यांनी सावध राहून सरकारला साथ द्यावी. इतकेच नव्हे, तर विरोधक बोलतात तसे सरकारच्या विरोधात बोलणे टाळायला हवे. तुमचे प्रश्न, समस्या सरकारकडे […]