दिल्ली : विशेष वृत्त, पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या रहस्यमयी हत्येप्रकरणी दिल्लीच्या एका न्यायालयाने सोमवारी शिक्षा सुनावली. गुन्हे तपासातील चार दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय आर्थिक दंडही ठोठावण्यात आला आहे. शुक्रवारी दोषींच्या शिक्षेबाबत युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल २५ नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवला होता. एका अग्रगण्य इंग्रजी वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या पत्रकार सौम्या विश्वनाथन यांची ३० सप्टेंबर २००८ रोजी सकाळी कामावरून घरी परतत असताना दक्षिण दिल्लीतील नेल्सन मंडेला मार्गावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हा दरोडा असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
विश्वसनीय सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने प्रकरणातील दोषी रवी कपूर, अमित शुक्ला, अजय कुमार आणि बलबीर मलिक यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सर्व दोषींच्या प्रतिज्ञापत्रांच्या पडताळणी संदर्भातील अतिरिक्त अहवाल दिल्ली राज्य विधी सेवा प्राधिकरण (डीएलएसए), दक्षिण, साकेत कोर्टाच्या सचिवांकडून प्राप्त झाला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार पांडे यांनी निकाल राखून ठेवला होता आणि त्याची प्रत राज्य सरकारच्या वकिलांना तसेच दोषींच्या संबंधित वकिलांना देण्यात यावी, असे आदेश दिले होते. ते म्हणाले की, सरकारी वकील आणि दोषींच्या वकिलांनी शिक्षेच्या प्रमाणात युक्तिवाद पूर्ण केला आहे.
दोषींनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांची पडताळणी पूर्ण झाली नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने ७ नोव्हेंबर रोजी सुनावणी तहकूब केली. रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार यांना कलम ३०२ आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील (मोक्का) तरतुदीनुसार संघटित गुन्हेगारी केल्याप्रकरणी न्यायालयाने १८ ऑक्टोबर रोजी दोषी ठरवले होते.
या प्रकरणातील पाचवा आरोपी अजय सेठी याला संघटित गुन्हेगारीला प्रोत्साहन देणे किंवा मदत करणे आणि संघटित गुन्हेगारीतून पैसे मिळवण्याचा कट रचल्याप्रकरणी कलम ४११ आणि मोक्का कलमान्वये दोषी ठरवण्यात आले होते. फिर्यादीनुसार, ३० सप्टेंबर २००८ रोजी दक्षिण दिल्लीतील नेल्सन मंडेला रोडवर पीडितेचा पाठलाग करताना कपूर यांनी विश्वनाथन यांच्यावर देशी बनावटीच्या पिस्तुलाने गोळ्या झाडल्या होत्या. कपूर यांच्यासोबत शुक्ला, कुमार आणि मलिक उपस्थित होते. सेठी ऊर्फ चाचा याच्याकडून पोलिसांनी हत्येत वापरलेली कार जप्त केली.
रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार ऊर्फ अजय या सर्व आरोपींना न्यायालयाने जन्मठेप आणि सव्वा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणात पाच जण आरोपी होते, त्यापैकी चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर पाचव्या दोषीला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाचवा दोषी अजय सेठी याला भादंविकलम ४११ आणि मोक्का अंतर्गत सव्वासात लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार पांडे यांच्या कोर्टाने या हत्याकांडातील पहिला आरोपी रवी कपूर याला जन्मठेप, भादंवि ३०२ अन्वये २५ हजार रुपये दंड आणि मोक्का अंतर्गत एक लाख रुपये, बलजीत मलिक ला जन्मठेप तसेच भादंवि कलम ३०२ अन्वये २५ हजार रुपये दंड आणि मोक्का अंतर्गत एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) २५ हजार रुपये, भादंवि ३०२ अन्वये २५ हजार रुपये आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.