(अ) मानवी तस्करी!

(अ) मानवी तस्करी!

सुनील कदम

गेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी रोमानियाच्या लिजंड एअरलाईन्सचे दुबईतून उड्डाण केलेले एक विमान फ्रान्सच्या व्हॅट्री विमानतळावर जवळपास तीन दिवस रोखून धरण्यात आले होते. कारण, या विमानातून मानवी तस्करी होत असल्याचा फ्रान्स पोलिसांना संशय होता. या विमानात एकूण 303 भारतीय प्रवासी होते आणि त्यापैकी बहुतेकजण अमेरिका आणि युरोपातील विविध देशांत निघाले होते. तीन दिवसांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर फ्रान्स पोलिसांनी अखेर या विमानातील 276 प्रवाशांना पुन्हा भारतात पाठवून दिले. कारण, त्यांची तस्करी होत असल्याचा फ्रान्स पोलिसांना संशय होता. (Pudhari Crime Diary)
गेल्या वर्षी अशाच बेकायदेशीर मार्गाने परदेशात निघालेल्या 96 हजार प्रवाशांना वेगवेगळ्या विमानतळांवर ताब्यात घेऊन त्यांना पुन्हा भारतात पाठविण्यात आले होते, यावरून देशांतर्गत किती मोठ्या प्रमाणात मानवी तस्करी चालते, याचा प्रत्यय येण्यास हरकत नाही. मानवी तस्करीचे स्वखुशीने, जबरदस्तीने आणि फसवणुकीने असे तीन प्रकार आहेत.
स्वखुशीची मानवी तस्करी!
स्वखुशीने होणारी मानवी तस्करी ही प्रामुख्याने भारतातून अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय देशांमध्ये होते. पंजाब, हरियाणा, गुजरात, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश आदी राज्यांमधील हजारो लोक उद्योग-व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने अमेरिका, कॅनडा आणि काही युरोपीय देशांमध्ये कायदेशीरपणे स्थायिक झालेले आहेत. या लोकांच्या इथल्या काही नातेवाईकांना तिकडे जाऊन त्यांच्यासोबत स्थायिक होण्याची इच्छा असते; मात्र त्या देशांचा व्हिसा मिळविणे अत्यंत जिकिरीचे आणि कधी कधी अशक्य कोटीतील असते. अशावेळी हे नातेवाईक बेकायदेशीर मार्गाने त्या देशात घुसत असतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या देशांमध्ये घुसखोरी करणार्‍यांसाठी सगळा बंदोबस्त करून देणार्‍या तस्करांच्या काही टोळ्याच देशभर सक्रीय आहेत. या टोळ्यांचे जाळे पार आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पसरलेले आहे. या टोळ्यांच्या माध्यमातून दरवर्षी बेकायदेशीर मार्गाने परदेशात पाठविण्यात येणार्‍या नागरिकांची संख्या जवळपास दहा ते बारा हजार इतकी आहे.
जबरदस्तीची मानवी तस्करी!
जबरदस्तीच्या मानवी तस्करीत प्रामुख्याने मुली, महिला आणि लहान मुला-मुलींचा समावेश आहे. ही मानवी तस्करी प्रामुख्याने देशांतर्गत आणि कधी कधी आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेश्या व्यवसायाशी निगडीत आहे. देशांतर्गत दररोज जवळपास 88 महिला बेपत्ता होतात, तर वार्षिक जवळपास एक लाख मुले-मुली बेपत्ता होतात. या बेपत्ता होणार्‍यांपैकी वर्षाकाठी केवळ 2 हजार लोक सापडतात, तर बाकीच्या महिला आणि मुली वेश्या व्यवसायात ढकललेल्या दिसून येतात. लहान मुले-मुली यांना भीक मागण्याच्या कामासाठी जुंपले जात असल्याचे दिसून येते. वेश्या व्यवसायात मुख्यत्वे नेपाळी आणि बंगाली मुलींना अधिक मागणी असल्याने तिथून चालणार्‍या मानवी तस्करीचे प्रमाणही प्रचंड आहे. दरवर्षी अशा पद्धतीने जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलल्या जाणार्‍या मुली आणि महिलांची संख्या 50 हजारांच्या घरात आहे, तर भीक मागण्यासाठी पळविण्यात येणार्‍या लहान मुली-मुलांची संख्या 4 ते 5 हजारांच्या घरात आहे. या पद्धतीच्या मानवी तस्करीत गुंतलेल्या शेकडो टोळ्या देशभर कार्यरत आहेत. (Pudhari Crime Diary)
फसवणुकीतून मानवी तस्करी!
लाखो भारतीयांना युरोप किंवा आखाती देशातील नोकरी किंवा राहणीमानाचे आकर्षण असलेले दिसते. अशा नागरिकांना हेरून त्यांना युरोप-आखातातील नोकरीचे अमिष दाखवून त्यांची तस्करी करण्याचे प्रमाणही प्रचंड आहे. अशा पद्धतीने फसवून आखाती देशांमध्ये नेऊन वेश्या व्यवसायात ढकललेल्या महिला आणि तरुणींचे प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून प्रत्यक्षात वेठबिगारी करायला लावलेल्यांचे प्रमाणही मोठे आहे. वार्षिक अशा पद्धतीने जवळपास 10 ते 12 हजार नागरिकांची तस्करी होते.
बेकायदा स्थलांतराचे भोग
शशिकिरण रेड्डी नावाचा एक कुख्यात मानवी तस्कर गेल्या अनेक वर्षांपासून हैदराबाद येथून आपले नेटवर्क चालवतो. गेल्या वर्षी या रेड्डीने गुजरातमधील एका कुटुंबाला बेकायदेशीर मार्गाने कॅनडामध्ये घुसविण्याची सुपारी घेतली होती. त्याच्यावर विसंबून गुजरातच्या डिंगुचा येथील जगदीश पटेल, त्याची पत्नी वैशाली आणि दोन लहान मुले भारतातून गेली तर खरी; पण त्यांना काही कॅनडा सीमेवरील बंदोबस्तामुळे आत शिरकाव करता आला नाही. दोन-तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हे कुटुंब तिथल्या जीवघेण्या थंडीत गारठून आणि अक्षरश: गोठून मृत्यूमुखी पडले होते.(Pudhari Crime Diary)
कायद्यातील पळवाटा
देशात दरवर्षी पर्यटन व्हिसाच्या नावाखाली प्रामुख्याने आखाती देशात आपल्या मुलींसह जाणार्‍या गोरगरीब कुटुंबांची संख्या वर्षागणिक वाढते आहे. याचे कारण तिथल्या निकाहनाम्यात दडले आहे. आखाती देशांमध्ये वेश्या व्यवसाय किंवा बलात्काराबद्दल अत्यंत कडक शिक्षा आहेत; पण निकाहनामा कायदेशीर आहे. या देशांमधील कायद्यानुसार मासिक पाळी येत असलेली कितीही वयाची मुलगी निकाहयोग्य समजली जाते. गोरगरीब कुटुंबे लाखो रुपयांच्या मोबदल्यात आपल्या मुलींची लग्नगाठ कोणत्यातरी अरबाशी बांधून देतात आणि नंतर मुलीविनाच परततात. त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करता येत नाही. कारण, तो निकाह तिथल्या कायद्यानुसार कायदेशीरच ठरतो. अशा मुली कालांतराने अगदी हमखासपणे जगभरातील कोणत्या ना कोणत्या कुंटणखान्यातच आढळून येतात.
हेही वाचा :

Nashik News : मुंढेगाव दरोड्यातील संशयितांकडून ६०० ग्रॅम सोने, ३० किलो चांदी हस्तगत
Shiv Sena Crisis : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? सुनावणी लांबणीवर
छत्रपती संभाजीनगर : आदर्श घोटाळा प्रकरणात आणखी एक प्रकरण; महिला नागरी पतसंस्थेत ४ कोटींचा अपहार

The post (अ) मानवी तस्करी! appeared first on Bharat Live News Media.