हिंडलगा कारागृहातील पाच कैद्यांची सुटका

हिंडलगा कारागृहातील पाच कैद्यांची सुटका

सद्वर्तनाच्या आधारावर अवधीपूर्वी मुक्तता
बेळगाव : वेगवेगळ्या प्रकरणात शिक्षा भोगत असताना वर्तन सुधारलेल्या पाच कैद्यांची हिंडलगा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. बेंगळूर येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या उपस्थितीमध्ये कैद्यांची सुटका करण्यात आली. वेगवेगळे गुन्हे करून कारागृहामध्ये शिक्षा भोगणाऱ्या राज्यातील विविध कारागृहांतील वर्तन सुधारलेल्या 77 कैद्यांची सुटका करण्याची शिफारस सरकारकडून राज्यपालांकडे करण्यात आली होती. यावरून अवधीपूर्वी सुटका करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.
त्यानुसार बेळगाव येथील हिंडलगा कारागृहातील पाच कैद्यांचा यामध्ये समावेश होता. बेंगळूर येथे कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदक वितरण व सद्वर्तन कैद्यांची अवधीपूर्वी सुटका याबाबत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांची सुटका करण्यात आली. हिंडलगा कारागृहामध्ये शिक्षा भोगणाऱ्या पाच कैद्यांना दोन दिवसांपूर्वीच बेंगळूर येथे पाठविण्यात आले होते. सदर पाच कैदी बेळगाव, बैलहोंगल, गोकाक, कुमठा, बेंगळूर येथील रहिवासी असून हिंडलगा कारागृहात खून प्रकरणामध्ये शिक्षा भोगत होते.
सद्वर्तनाच्या आधारावर पाच कैद्यांची सुटका
सद्वर्तनाच्या आधारावर हिंडलगा कारागृहातील पाच कैद्यांची सुटका करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार त्यांना सुटका करण्याचे निश्चित करून दोन दिवसांपूर्वी बेंगळूरला पाठविण्यात आले होते. तेथून त्यांची सुटका करण्यात आली आहे.
-कोट्रेश बी. एम. (हिंडलगा कारागृह अधीक्षक)