रॉ अन् एनआयएच्या माजी प्रमुखांना झेड सुरक्षा

खलिस्तानी दहशतवाद्यांकडून धोका : केंद्र सरकारने घेतला निर्णय वृत्तसंस्था /नवी दिल्ली खलिस्तानी दहशतवादी संघटनांवरील कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या माजी भारतीय अधिकाऱ्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निवृत्त अधिकाऱ्यांना खलिस्तानी दहशतवाद्यांकडून धोका असल्याचे समोर आले आहे. वाढलेला धोका पाहता रॉचे माजी प्रमुख सामंत गोयल आणि एनआयएचे माजी प्रमुख दिनकर गुप्ता यांना झेड श्रेणीची […]

रॉ अन् एनआयएच्या माजी प्रमुखांना झेड सुरक्षा

खलिस्तानी दहशतवाद्यांकडून धोका : केंद्र सरकारने घेतला निर्णय
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
खलिस्तानी दहशतवादी संघटनांवरील कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या माजी भारतीय अधिकाऱ्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निवृत्त अधिकाऱ्यांना खलिस्तानी दहशतवाद्यांकडून धोका असल्याचे समोर आले आहे. वाढलेला धोका पाहता रॉचे माजी प्रमुख सामंत गोयल आणि एनआयएचे माजी प्रमुख दिनकर गुप्ता यांना झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. आता या दोन्ही निवृत्त अधिकाऱ्यांना सीआरपीएफची सुरक्षा प्राप्त होणार आहे. पंजाब, चंदीगढ आणि दिल्लीत दिनकर गुप्ता यांच्यासाठी झेड सुरक्षा लागू राहणार आहे. सरकारच्या आदेशानुसार मार्च 2024 पासून ही व्यवस्था लागू झाली आहे. 1987 च्या तुकडीचे पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी दिनकर गुप्ता हे जून 2022 पासून 31 मार्च 2024 पर्यंत एनआयएचे प्रमुख होते. तसेच गुप्ता यांनी पंजाबचे पोलीस महासंचालक (गुप्तचर) म्हणूनही सेवा बजावली आहे.
खलिस्तानी दहशतवादी संघटनांकडून वाढलेला धोका पाहता सरकारने हे पाऊल उचलले आहे. महत्त्वाच्या पदांवर काम केलेल्या अधिकाऱ्यांना दहशतवादी गटांकडून धोका असल्याचा इनपूट सरकारला मिळाला आहे. विशेषकरून कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर उग्रवादी गट अधिक आक्रमक झाले आहेत. खलिस्तानसमर्थक संघटना यापूर्वीच कॅनडा, ब्रिटनमध्ये विविध भारतीय राजनयिक अधिकाऱ्यांना धमकी देत आहेत. तर सामंत गोयल आणि दिनकर गुप्ता यांनी अत्यंत संवेदनशील पदांवर काम केले आहे. एनआयएकडून खलिस्तानी दहशतवादी संघटनांच्या विरोधात तपास केला जात आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येच्या कथित कटाप्रकरणी माजी रॉ प्रमुखांचे नाव यापूर्वीच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी घेतले आहे.
झेड श्रेणीची सुरक्षा
झेड श्रेणीच्या सुरक्षेत 22 जवान सामील असतात, यात एनएसजीचे 4-5 कमांडो देखील असतात. अतिरिक्त सुरक्षा दिल्ली पोलीस किंवा सीआयएसकडून पुरविली जाते. सुरक्षेत एक एस्कॉर्ट कार देखील सामील असते. कमांडोज सब मशीनगन आणि आधुनिक संचाराच्या साधनांनी सज्ज असतात. याचबरोबर त्यांना मार्शल आर्टने प्रशिक्षित केलेले असते.