नीट घोटाळ्यासंबंधी यादवांनी सोडले मौन

वृत्तसंस्था / पाटणा राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नीट घोटाळ्यासंबंधातील त्यांचे मौन सोडले आहे. या प्रकरणावर त्यांनी प्रथमच शुक्रवारी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. गुरुवारी त्यांच्यावर बिहारचे विद्यमान उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी आरोप केले होते. यादव यांचे स्वीय सचिव प्रीतम कुमार यांचा या घोटाळ्यात हात आहे, असा त्यांचा आरोप होता. […]

नीट घोटाळ्यासंबंधी यादवांनी सोडले मौन

वृत्तसंस्था / पाटणा
राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नीट घोटाळ्यासंबंधातील त्यांचे मौन सोडले आहे. या प्रकरणावर त्यांनी प्रथमच शुक्रवारी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. गुरुवारी त्यांच्यावर बिहारचे विद्यमान उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी आरोप केले होते. यादव यांचे स्वीय सचिव प्रीतम कुमार यांचा या घोटाळ्यात हात आहे, असा त्यांचा आरोप होता.
मात्र, सिन्हा हे मूळ मुद्द्यापासून लोकांचे लक्ष इतरत्र हटविण्यासाठी आपल्यावर आरोप करीत आहेत, असे प्रतिपादन यादव यांनी केले. त्यांनी बिहारचे आणखी एक उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सम्राट चौधरी यांचे नीट घोटाळ्यातील एका आरोपीसमवेतचे छायाचित्र प्रसिद्धीस दिले. या घोटाळ्यात कोणाचा हात आहे, हे या छायाचित्रावरुन स्पष्ट होईल, असा दावा त्यांनी केला.
सूत्रधार कोण ?
विजय सिन्हा यांनी प्रीतम कुमार यांचा जवळचा नातेवाईक सिकंदर यादवेंदू हा या घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार आहे, असा आरोप केला होता. तसेच त्याची चौकशी करण्याचा आदेशही दिला होता. मात्र, तेजस्वी यादव यांच्या म्हणण्यानुसार प्रमुख आरोप अमित आनंद हा असून त्याची चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. प्रीतम कुमार याचा यादव यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला.
भाजपने फेटाळले आरोप
तेजस्वी यादव यांनी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रावरुन काहीही सिद्ध हेत नाही. नेत्यांच्या सामाजिक जीवनात अनेक लोक त्यांच्यासमवेत छायाचित्र काढून घेतात. तथापि, अशा लोकांनी केलेल्या घोटाळ्यांमध्ये नेत्याचा हात असतो असे म्हणता येणार नाही. या प्रकरणातील मुख्य संशयित सूत्रधार सिकंदर यादवेंदू हाच असून त्याचा बंधू अनुराग यादव याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाशी असलेला राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांचा संबंध लवकरच स्पष्ट होईल. सरकार कोणालाही सोडणार नाही, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले.
आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता
नीट प्रश्नपत्रिका फूट आणि इतर आरोपीत गैरव्यवहार प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये आणखी 10 ते 12 जणांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गैरप्रकारांचे लाभार्थी असलेल्या नीट परीक्षार्थींचीही चौकशी केली जात असून अनेकांनी त्यांनी केलेल्या गैरप्रकारांची कबुली दिली आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.