संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी समन्वयाने काम करा

जिल्हा समीक्षा नियंत्रण अधिकाऱ्यांची बैठक बेळगाव : पावसाला सुरुवात झाल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. यामुळे संसर्गजन्य रोग वाढत आहेत. यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांची दखल घेऊन परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर द्यावा. त्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्यात यावी, अशी सूचना अप्पर जिल्हाधिकारी डॉ. एस. एस. गडेद यांनी केली.येथील जि. पं. सभागृहामध्ये जिल्हा समीक्षा व तंबाखू नियंत्रणाधिकारी, आंतर […]

संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी समन्वयाने काम करा

जिल्हा समीक्षा नियंत्रण अधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव : पावसाला सुरुवात झाल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. यामुळे संसर्गजन्य रोग वाढत आहेत. यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांची दखल घेऊन परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर द्यावा. त्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्यात यावी, अशी सूचना अप्पर जिल्हाधिकारी डॉ. एस. एस. गडेद यांनी केली.येथील जि. पं. सभागृहामध्ये जिल्हा समीक्षा व तंबाखू नियंत्रणाधिकारी, आंतर खाते समन्वय समितीच्या बैठकीमध्ये विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पावसाळ्यामध्ये संसर्गजन्य रोग वाढण्याची अधिक शक्यता असते. यासाठी या रोगांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया असे संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी वेळीच यावर उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वयाने कार्य केले पाहिजे. तरच या रोगांवर नियंत्रण मिळणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी जि. पं. योजनाधिकारी बसवराज व्ही. अडवीमठ यांनी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. जागृती करण्यासाठी भित्तीपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. तंबाखू नियंत्रणासाठी कोटपा कायदा अनुष्ठान आणि राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम याबाबत विविध खात्यांचे पात्र याबाबत माहिती देण्यात आली. दि. 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संबंधित खात्यांनी घ्याव्या लागणाऱ्या उपक्रमांची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. समन्वय समिती बैठकीमध्ये जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. संजय दोडमनी, जिल्हा रोग नियंत्रणाधिकारी डॉ. विवेक होन्नळ्ळी, कीटक शास्त्रज्ञ गणपती बारकी, डॉ. श्वेता पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.