नियम धाब्यावर? तर मग पोलीस रस्त्यावर!

नियम धाब्यावर? तर मग पोलीस रस्त्यावर!

वाहतूक पोलिसांची धडक कारवाई : सिग्नलवर जनजागृती, मनमानी पार्किंग करणाऱ्यांकडून दंडवसुली : 271 हून अधिक वाहनचालकांवर कारवाई 
बेळगाव : शहरातील प्रमुख ट्रॅफिक सिग्नलवर गुरुवारी वाहतूक पोलिसांनी जागृतीची मोहीम राबविली. याबरोबरच वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. दिवसभरात एकूण 271 हून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे एसीपी पवन एन., वाहतूक दक्षिणचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील बारा प्रमुख ट्रॅफिक सिग्नलवर जागृतीची मोहीम राबविली.
ट्रॅफिक सिग्नलवर वाहतूक नियम मोडण्याचे प्रकार वाढले आहेत. हिरवा सिग्नल पडण्याअगोदरच वाहने पुढे नेली जातात. अनेकजण सिग्नलवर युटर्न करतात. झेब्रा क्रॉसिंग हे पादचाऱ्यांसाठी असते. मात्र, झेब्रा क्रॉसिंगवरच आपली वाहने उभी करतात. या सर्व नियमांविषयी ट्रॅफिक सिग्नलवर ध्वनीक्षेपकावरून माहिती देण्यात आली. हिरवा सिग्नल सुरू होण्याआधी वाहनचालकांनी पुढे जाऊ नये, पादचाऱ्यांना जाण्यासाठीच्या झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करू नयेत, पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवर पार्किंग करू नये, आदींविषयी अधिकारी व पोलिसांनी वाहनचालकांना माहिती दिली. वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी सहा ट्रॅफिक सिग्नलवर तर उत्तर विभाग पोलिसांनी पाच वाहतूक सिग्नलवर जनजागृतीची मोहीम राबविली. काही रस्त्यांवर सम-विषम पार्किंगची व्यवस्था असते. मात्र, याचा विचार न करता रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच पायी चालत जाणाऱ्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. वारंवार आवाहन करूनही नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती एसीपी पवन एन. यांनी दिली.
वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
वाहतूक उत्तर विभाग पोलिसांनी दिवसभरात 126 वाहनचालकांवर कारवाई करून 52 हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी 145 वाहनचालकांवर कारवाई करून 74 हजार रुपये दंड वसूल केला आहे. कॉलेज रोडवर पवन हॉटेलपासून यंदे खूटपर्यंत मनमानी पार्किंग करणाऱ्या दुचाकीस्वारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या वाहनांना लॉक लावल्यामुळे दुचाकीस्वारांची पंचाईत झाली.