टेडी बेअर आणि शब्दकोडी 20 व्या शतकात समाजासाठी धोकादायक का मानली जायची?

टेडी बेअर आणि शब्दकोडी 20 व्या शतकात समाजासाठी धोकादायक का मानली जायची?

टेडी बेअर आणि शब्दकोडी 20 व्या शतकात समाजासाठी धोकादायक का मानली जायची?

लहान मुलं असो वा प्रौढ व्यक्ती टेडी बेअर सर्वांनाच आवडतात. ही गोल गुबगुबीत वस्तू मुलांच्या सर्वात जास्त आवडीचं खेळणं आहे. फक्त मुलंच नाहीत तर प्रौढ व्यक्तीदेखील टेडी बेअर देऊन एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतात.

 

परंतु, एकेकाळी न्यूयॉर्क टाइम्स आणि ब्रिटिश टाइम्ससारख्या प्रतिष्ठित वृत्तसंस्थांनी देखील या टेडी बेअर्सना असामाजिक, कच-यात टाकण्यायोग्य आणि राष्ट्रीय धोक्याचे प्रतीक ठरवलं होतं.

 

टेडी बेअर्ससह शब्दकोड्यांवरही एकेकाळी वेळ वाया घालवणारी आणि निष्क्रीय करमणूक म्हणून टीका केली गेलेली, परंतु नंतर त्याच्याकडे बौद्धिक मनोरंजन म्हणून पाहिलं गेलं.

 

मनोरंजनाचा अविभाज्य भाग मानल्या जाणार्‍या टेडी बेअर्स आणि शब्दकोड्यांना इतिहासात कधीतरी तीव्र टीकेचा सामना करावा लागलेला. सर्वप्रथम शब्दकोड्यांची हेटाळणी केली गेली, तर निरूपद्रवी असलेल्या टेडी बेअरला नामशेष करण्याचा देखील प्रयत्न झाला.

 

मात्र, पूर्वीच्या काळी त्यांना इतकं वाईट का मानलं जायचं?

 

चला तर मग आधी शब्दकोड्यांबद्दलच्या आकर्षणाबद्दल बोलूया आणि मग टेडी बेअरशी संबंधित अंधश्रद्धा काय होत्या ते पाहूया.

 

स्मरणशक्ती कमी होणं आणि ‘शब्दकोडे निद्रानाश’सारखे भ्रम

एकोणीसाव्या शतकात इंग्लंडमध्ये मुलांचं मनोरंजन करण्यासाठी शब्दकोड्यांची सुरुवात झाली. ‘द न्यूयॉर्क वर्ल्ड’ या अमेरिकन वृत्तपत्राने 21 डिसेंबर 1913 रोजी पहिल्या महायुद्धाच्या पूर्वसंध्येला आपल्या रविवार पुरवणीत पहिलं आधुनिक शब्दकोडं प्रकाशित केलं आणि त्यानंतर ते फक्त प्रौढांसाठीचं मनोरंजन बनलं.

 

युद्धाचा कालावधी जसजसा वाढत गेला तसतशी या शब्दकोड्यांच्या चाहत्यांची संख्याही वाढत गेली. लोक रात्रभर ही कोडी सोडवत बसू लागले आणि 1920 च्या दशकात शब्दकोडे हे गोंधळलेल्या लोकांसाठीचे आश्रयस्थान आणि सुटकेचं ठिकाण बनलं. शब्दकोड्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस शिगेला पोहोचली आणि युद्धबंदीनंतरही त्याचं वेड कमी होऊ शकलं नाही.

 

असं असतानाही, शब्दकोड्यांची रचना आणि प्रसिद्ध करण्याला नकार देणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये ‘न्यूयॉर्क टाईम्स’ हे प्रथितयश वर्तमानपत्रदेखील होतं.

 

वाचकांना आकर्षित करण्यासाठी आणि वर्तमानपत्राचा दर्जा चांगला राखण्यासाठी कोड्यांवर अवलंबून न राहता संपादकांनी लेखांचा दर्जा सर्वोत्तम ठेवण्याचा निर्णय घेतला.

 

नोव्हेंबर 1924 मध्ये त्यांनी ‘अ कॉमन फॉर्म ऑफ मॅडनेस’ नावाचा लेखही प्रकाशित केला.

 

लेखात असं म्हटलंय की, शब्दकोडे हा एक प्रकारचा वेडेपणा आहे ज्यामध्ये लोकं शब्द शोधण्यात आपला वेळ वाया घालवतात आणि हे एक प्रकारचं पाप आहे.

 

‘हा एक अतिशय साधारण बौद्धिक व्यायाम असून त्यातून अधिक काही साध्य होत नाही आणि लोकांनी त्यांचा फावला वेळ घालवण्यासाठी ज्या कंटाळवाण्या गोष्टी करायला हव्यात त्यापैकीच हे एक आहे.’, असंही त्यात म्हटलं होतं.

 

दोन महिन्यांनंतर कॅलिफोर्नियाच्या ‘सॅक्रामेंटो स्टार’ने एक लेख प्रकाशित केला ज्यात दावा केलेला की, शब्दकोड्यांमुळे एखाद्या व्यक्तीच्या स्मरणशक्तीला हानी पोहोचू शकते.

 

लेखात एका रूग्णालयातील रूग्णाबद्दल डॉक्टरांनी केलेल्या निदानाचा संदर्भ देण्यात आलेला की, त्या माणसाला शब्दकोड्यांच्या ‘व्यसनामुळे’ स्मृतिभ्रंशाचा गंभीर आजार झालेला.

 

‘शब्दकोडे निद्रानाश’ची अनेक प्रकरणं देखील त्याकाळात नोंदवली गेली, तर नेत्ररोग तज्ज्ञांनी इशारा दिला की या छंदामुळे डोकेदुखी आणि दृष्टी कमकुवत होऊ शकते.

 

अमेरिकेला शब्दकोड्यांचं वेड

या घटनेने अटलांटिकच्या पलिकडे याची चर्चा सुरू झाली. न्यूयॉर्क टाइम्ससारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राने 1924 मध्ये ‘ए स्लेव्ह अमेरिका’ नावाचा लेख प्रकाशित केला.

 

‘द टाइम्स ऑफ लंडन’ने बातमी केली की ‘संपूर्ण अमेरिका शब्दकोड्याच्या प्रभावाखाली वावरतेय.’

 

लेखात म्हटलंय की, “काही हुशार, आळशी लोकांचं मनोरंजन करण्याच्या नादात शब्दकोडी हे राष्ट्रासाठी धोकादायक गोष्ट ठरू पाहत्येय.”

 

यामागचं कारण म्हणजे, असा अंदाज बांधला गेला की एक दशलक्षाहून अधिक लोकांनी दररोज अर्धा तास शब्दकोड्यांसाठी खर्च केला जो राष्ट्रउभारणीसाठी उपयुक्त ठरू शकला असता.

 

‘कामगारांच्या संपामध्ये जितका वेळ वाया जातो त्यापेक्षा अधिक वेळ शब्दकोडी सोडवण्यात जातो.’

 

पुढील वर्षी, ग्रेट ब्रिटनचा राजा जॉर्ज पंचम यांची पत्नी क्वीन मेरी, तसंच राजघराण्यातील इतर सदस्यांना या छंदाचं व्यसन लागलेलं.

 

तरिही, सर्वात कंटाळवाणी आणि असह्य सवय म्हणून या खेळाचा तिरस्कार केला गेला.

 

शब्दकोड्यांमुळे सर्वप्रथम इंग्लंमधील एक जोडपं न्यायालयात गेलं. एका पत्नीने रात्री उशीरा म्हणजे 11 वाजेपर्यंत शब्दकोडं सोडवत बसल्याबद्दल तिच्या पतीवर खटला दाखल केला होता.

 

शब्दकोडी प्रेमींना आळा घालण्यासाठी वाचनालयातून भाडेतत्त्वावर आणलेली वर्तमानपत्र, सार्वजनिक ग्रंथालयातील वर्तमापत्रातील शब्दकोड्यातील रिकामे रकाने हाताने खोडण्याचं जणू युद्धच सुरू झालं.

 

1 फेब्रुवारी 1930 रोजी ‘द टाइम्स ऑफ लंडन’ने गपचूपपणे पहिलं शब्दकोडं प्रकाशित केलं.

 

दुसरीकडे, न्यूयॉर्क टाईम्स हे आणखी एका दशकासाठी शब्दकोडं नसलेले अमेरिकेचं एकमेव मोठं शहरी वृत्तपत्र कायम राहिलं, परंतु 15 फेब्रुवारी 1942 रोजी पर्ल हार्बरवरील हवाई हल्ल्याच्या दोन महिन्यांनंतर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने आपली भूमिका मवाळ केली.

 

‘न्यू यॉर्क वर्ल्ड’च्या संपादकांनी 30 वर्षांपूर्वी म्हटल्याप्रमाणे, शेवटी ऑगस्टमध्ये त्यांनी निर्णय घेतला की अशा प्रकारची शब्दकोडी निरर्थक नसून त्यामुळे मानसिक विचलन न होता अंधकारमय काळात वाचकांसाठी तो एक आवश्यक आणि सकारात्मक मानसिक व्यायाम आहे.

 

टेडी बेयरचं वेड

आता टेडी बेअरबद्दल पसरलेल्या गैरसमजांकडे वळूयात.

 

अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट 1902 मध्ये मिसिसिपी येथे अस्वलाच्या शिकारीसाठी गेले असता या सगळ्याला सुरूवात झाली, परंतु त्यावेळी त्यांना एकही अस्वल सापडलं नाही.

 

राष्ट्राध्यक्षांची शिकार करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सहाय्यकांनी एका काळ्या अस्वलाला झाडाला बांधलं आणि त्याला गोळ्या घालण्यास सांगितलं. परंतु, रूझवेल्ट यांनी असं करण्यास नकार दिला आणि हे शिकारीच्या तत्त्वात बसत नसल्याचं म्हटलं.

 

या घटनेची बातमी सर्वदूर पसरली आणि त्याला वॉशिंग्टन पोस्ट हे कारणीभूत होतं. त्यांनी ब्रुकलिन कँडी स्टोअरचे मालक मॉरिस मॅकटॉम यांना टेडी बेयर तयार करण्याची विनंती करुन घटनेला अनुसरून एक व्यंगचित्र काढून घेतलं.

 

रुझवेल्ट यांना त्यांचे टोपणनाव वापरण्याची परवानगी मागितल्यानंतर, दुकानदाराने आपल्या खेळण्याला टेडी बेअर असं नाव दिलं आणि त्याची मोठ्या प्रमाणात विक्री करायला सुरूवात केली. ती कल्पना यशस्वी ठरली.

 

आणि अल्पावधीतच टेडी अस्वल अमेरिकन मुलांच्या खेळण्यांचा अविभाज्य भाग बनलं, परंतु यामुळे मायकेल जी. एस्पर नावाच्या पाद्रीला राग आला.

मिशिगनमधील सेंट जोसेफ चर्चच्या व्यासपीठावरून पाद्रीने त्यांच्याविरुद्ध जोरदार अपप्रचाराला सुरूवात केली.

 

ते म्हणाले की आज या देशासमोरील सर्वात मोठा धोका म्हणजे ‘अमेरिकन लोकांचा वंशच्छेद’ आणि यातूनच आमच्या बालपणातील ‘टेडी बेअर’ नावाची बाहुली जन्माला आली. अशा प्रकारे घृणास्पद राक्षसीपणाचे फॅशनमध्ये रूपांतर झालंय आणि आता त्याला प्रोत्साहन दिलं जातंय.’

 

मुलींना लैंगिक फरक ओळखण्यापासून वंचित ठेवणं आणि त्यांच्यातील मातृत्वाची इच्छा कमी करण्यासाठी टेडी अस्वल कारणीभूत आणि दोषी आहे, अशी भीती त्यांना वाटत होती.

 

‘मुलगी प्राण्याला मिठी मारताना आणि चुंबन घेतानाही दाखवली आहे’

पाद्रीने असा युक्तिवाद केला की, टेडी बेअरचा ध्यास अमेरिकन लोकांच्या नरसंहाराला गती देईल. ‘जाहीरपणे एक मुलगी एखाद्या प्राण्याला मिठी मारताना आणि चुंबन घेताना दाखवण्यात आली आहे यापेक्षा घृणास्पद गोष्ट मी कधीच पाहिली नाही.’

 

पण अमेरिकेतील एका छोट्या शहरातील पाद्रीने जे सांगितलं ते इतकं महत्त्वाचं का ठरलं?

 

पाद्रीच्या भाषणाची बातमी स्थानिक पातळीवर व्हायरल झाली आणि हा इशारा अगदी प्रतिष्ठित वृत्तपत्रांपर्यंत पोहोचला, ज्यांनी त्यावर ‘धोक्याची घंटा’ म्हणून शिक्कामोर्तब केलं.

 

काही सभ्य आणि परंपराविरोधी मीडिया कंपन्यांनी त्यांच्या मूर्खपणाची थट्टा केली, तर न्यूज पॅलेडियम सारख्या इतरांनी रूझवेल्ट यांच्या मौनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

 

अमेरिकन अध्यक्ष कदाचित अधिक महत्त्वाच्या बाबींमध्ये व्यस्त असतील, परंतु उपस्थित केलेला प्रश्न योग्य होता की, रोझ विलेट यांनी ज्या अमेरिकन वंशवादाचा कायम तिरस्कार केला त्याचीच जाहिरात टेडी बेअरमार्फत का करण्यात येतेय.

ही संकल्पना युजेनिक्स चळवळीतून जन्माला आली. या चळवळीनुसार, जेव्हा संपूर्ण वंश मुलांना जन्म देत नाही, तेव्हा त्यांच्यामध्ये आत्महत्येचे प्रमाणही वाढतं आणि मृत्यूदर आणि जन्मदर समान असल्याने ती जात धोक्यात येते.

 

त्यानंतर सुमारे तीन दशकं रुझवेल्ट यांनी अत्यंत कठोर शब्दांत, भाषणं आणि त्यांनी लिहिलेल्या पत्रांद्वारे वारंवार या धोक्याचा इशारा दिला.

 

“जे स्त्री किंवा पुरुष जाणूनबुजून विवाह टाळतो आणि ज्यांच्यामध्ये कोणत्याही लैंगिक भावना उत्पन्न होत नाहीत आणि जे अतिश स्वार्थी आहेत की त्यांना मुलांना जन्माला घालणं आवडत नाही, ते खरोखरच मानवजातीचे गुन्हेगार आहेत अशांना अपमानित करून, सर्व निरोगी लोकांनी त्यांच्यापर्यंत हा द्वेषाचा संदेश पोहोचवायला हवा.’

 

पण जेव्हा पत्रकारांनी त्यांना आदरणीय एस्पर यांच्या विधानांबद्दल विचारलं तेव्हा ते हसले. रुझवेल्ट यांनी सर्वकाही बारकानं वाचलं परंतु टेडी बेअरच्या बाजूने किंवा विरोधात काहीही बोलले नाही, हे पत्रकारांनी बरोबर हेरलं.

 

 

Published By- Priya DIxit 

 

 

 

 

 

 

 

 

 

टेडी बेअर आणि शब्दकोडी 20 व्या शतकात समाजासाठी धोकादायक का मानली जायची?
लहान मुलं असो वा प्रौढ व्यक्ती टेडी बेअर सर्वांनाच आवडतात. ही गोल गुबगुबीत वस्तू मुलांच्या सर्वात जास्त आवडीचं खेळणं आहे. फक्त मुलंच नाहीत तर प्रौढ व्यक्तीदेखील टेडी बेअर देऊन …

Go to Source