पाकिस्तान संघाला झालंय तरी काय?

आयसीसीची कुठलीही स्पर्धा असो, भारत आणि पाकिस्तानपैकी कुठला तरी एक संघ किंबहुना दोन्ही संघ कमीतकमी सुपर एटमध्ये यावे अशीच मांडणी करण्याचा प्रयत्न आयसीसीचा असतो. 2007 साली विंडीजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ सुऊवातीलाच बाद झाले होते. आणि त्या विश्वचषकाचा जो विचका  झाला होता तो आपण सर्वांनीच बघितला. पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी सर्वात […]

पाकिस्तान संघाला झालंय तरी काय?

आयसीसीची कुठलीही स्पर्धा असो, भारत आणि पाकिस्तानपैकी कुठला तरी एक संघ किंबहुना दोन्ही संघ कमीतकमी सुपर एटमध्ये यावे अशीच मांडणी करण्याचा प्रयत्न आयसीसीचा असतो. 2007 साली विंडीजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ सुऊवातीलाच बाद झाले होते. आणि त्या विश्वचषकाचा जो विचका  झाला होता तो आपण सर्वांनीच बघितला. पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून क्रिकेटला पसंती दिली जाते. त्याचप्रमाणे पोलो आणि स्क्वॅश हे खेळही तेवढेच लोकप्रिय आहेत. स्क्वॅशमध्ये तर जहांगीर खानने बरीच वर्षे मत्तेदारी गाजवली होती.
पाकिस्तान आणि क्रिकेटचा विचार केला तर एक काळ असा होता की त्यांच्याकडे मुदस्सर नझर, मोहसीन खान, सलीम मलिक, जावेद मियांदाद, रमीज राजा, झहीर अब्बास यांच्यासारख्या कलात्मक फलंदाजांची मांदियाळी होती. त्या काळात मनगटी फटक्यांची सुऊवात मोहसीन खानने करून दिली होती. वेगवान गोलंदाजांचा विचार केला तर इम्रान खान, सरफराज नवाज, सिकंदर बक्त असे नामवंत गोलंदाज त्यांच्या भात्यात होते. 1982-83 मध्ये भारताने केलेल्या पाकिस्तान दौऱ्यात इम्रान खानचे इनकटर कोण विसरणार. त्याच इम्रान खानने 1992 मध्ये न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या विश्वचषक स्पर्धेवर आपल्या देशाचे नाव कोरले होते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, या पूर्ण स्पर्धेत इम्रान खान पूर्णत: फिट नव्हता. पूर्ण स्पर्धा तो पेनकिलर घेऊन खेळला. त्याच इम्रान खानचा वारसा पुढे अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर यांनी पुढे कायम ठेवला. पुढे इम्रान खान देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर क्रिकेटसाठी काही वेगळं करेल असे वाटलं होतं परंतु तसं काही घडलं नाही.
मागच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत पोचणारा पाकचा संघ मात्र पुढील सहा महिन्यात त्यांची कामगिरी फारच सुमार दर्जाची राहिली. भारतात झालेल्या एकदिवशीय विश्व चषक स्पर्धेत आणि आता चालू टी-20 विश्वचषकात  साखळीतच त्यांना गाशा गुंडाळावा लागला. काही महिन्यापासून पाकिस्तान संघात ऑल इज नॉट वेल हेच दिसून आले. बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी असे दोन गट पाकिस्तान क्रिकेटमध्ये दिसू लागलेत. भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर बाबर आझमची हकालपट्टी करण्यात आली होती. आणि त्याच्या जागेवर शाहीन आफ्रिदीला नियुक्त करण्यात आले होते. परंतु पुन्हा एकदा चालू विश्वचषक स्पर्धेत बाबर आझमला कर्णधारपद दिले गेले. यातच भर की काय, काही वर्षापासून दूर असलेल्या मोहम्मद आमीर आणि इमाद वसीम यांना संघात घेतल्यामुळे तणाव आणखीनच वाढला. अर्थात ज्यावेळी पाक संघाची घोषणा झाली होती त्याचवेळी हा संघ सुपरएटपर्यंत पोचेल की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. आणि नेमकं घडलंय तसंच. अमेरिकेविऊद्धच्या सामन्यात झालेला बोचरा पराभव त्यांच्या स्पर्धेतील गच्छंतीस कारणीभूत ठरला. सर्वच खेळाडूंनी केलेली सुमार दर्जाची कामगिरी हे पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांसाठी न उलगडणारं कोडं आहे. त्यातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या या खराब कामगिरीमुळे त्यांच्या मानधनात कपात करण्याचा विचार केला आहे. अशीच जर खराब कामगिरी कायम चालू राहिली तर मात्र आयसीसीच्या इव्हेंटमध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांना पात्रता फेरीला सामोरे जावे लागेल एवढे मात्र खरं.