शिल्प बसविण्याबाबत ‘रेल्वे’ला इशारा

शिवसैनिक-भीमसैनिकांकडून पंधरा दिवसांचा अल्टीमेटम : अधिकाऱ्यांना धरले धारेवर बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प, तसेच जगद्ज्योती बसवेश्वर यांची प्रतिमा अद्याप बसविण्यात आलेली नाही. हा या राष्ट्रपुरुषांचा अवमान असून येत्या पंधरा दिवसांत रेल्वे प्रशासनाने याची दखल न घेतल्यास शिवशक्ती व भीमशक्तीच्यावतीने या प्रतिमा व शिल्प बसविण्यात येतील, असा इशारा […]

शिल्प बसविण्याबाबत ‘रेल्वे’ला इशारा

शिवसैनिक-भीमसैनिकांकडून पंधरा दिवसांचा अल्टीमेटम : अधिकाऱ्यांना धरले धारेवर
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प, तसेच जगद्ज्योती बसवेश्वर यांची प्रतिमा अद्याप बसविण्यात आलेली नाही. हा या राष्ट्रपुरुषांचा अवमान असून येत्या पंधरा दिवसांत रेल्वे प्रशासनाने याची दखल न घेतल्यास शिवशक्ती व भीमशक्तीच्यावतीने या प्रतिमा व शिल्प बसविण्यात येतील, असा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शिवशक्ती व भीमशक्ती रेल्वेस्थानक परिसरात एकवटली होती. सकल मराठा समाजाचे संयोजक रमाकांत कोंडुसकर व दलित समाजाचे नेते मल्लेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी रेल्वे प्रशासनाला पंधरा दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला. येत्या पंधरा दिवसांत प्रतिमा न बसविल्यास स्वत: प्रतिमा बसवू, असा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला.
अधिकाऱ्यांची हतबलता
शिव व भीमप्रेमींनी सोमवारी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रेल्वे अधिकाऱ्यांनी दोन्ही शिल्प बसविण्यासाठी अद्याप रेल्वे बोर्डने परवानगी दिली नसल्याचे सांगितले. यावेळी इतर शिल्प बसविताना कोणाची परवानगी घेतली होती? असा प्रतिप्रश्न अधिकाऱ्यांना करण्यात आला. तेव्हा अधिकाऱ्यांनी आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही समस्या मांडू, असे आश्वासन दिले. प्रतिमा बसविण्याबाबत आपल्याला अधिकार नसल्याचे सांगून रेल्वे अधिकाऱ्यांनी हतबलता व्यक्त केली.
रेल्वे विभागाने घेतली धास्ती…
शिवभक्ती व भीमशक्ती एकत्रितरित्या शिल्प बसविण्यासाठी आंदोलन करणार असल्याने रेल्वेस्थानक परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेतली होती. रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे पोलीस, तसेच स्थानिक पोलीस असे मिळून दीडशेहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते. यामुळे आंदोलकांपेक्षा पोलिसांचीच संख्या रेल्वेस्थानकावर अधिक होती. यामुळे प्रवाशांमधून याविषयीची चौकशी केली जात होती.