इचलकरंजीत लढत एकास एक की बहुरंगी…! विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांच्या विरोधात कोण रिंगणात येणार ?
अनेक उमेदवार इच्छुक
संजय खूळ इचलकरंजी
राज्य पातळीवर पक्षात पडलेली फूट, अनेकांना लागलेले आमदारकीचे वेध अशा पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणाऱ्या इचलकरंजी विधानसभेतील यावेळचे चित्र काय असणार याबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांच्या विरोधात एकास एक लढत होणार की बहुरंगी लढत होणार, यावरच या मतदारसंघाचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत कोणत्या पद्धतीने राजकीय व्यूहरचना होते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्राची वस्त्रनगरी म्हणून लौकिक असलेल्या इचलकरंजी शहर व लगतची पाच गावे एवढेच या मतदारसंघाचे कार्यक्षेत्र आहे. शहरालगतची असलेली गावे म्हणजे इचलकरंजी शहराचा एक भाग आहेत. अशा पार्श्वभूमीवर इचलकरंजीत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा परिणाम या गावावर होतच असतो. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या तयारी सुरू झाल्या आहेत. संभाव्य उमेदवार कोण कोण असतील याबाबतची ही नावे आता ठळकपणे पुढे येऊ लागली आहेत. परंतु एकूणच निवडणूक जाहीर होईपर्यंत राजकीय हालचाली काय काय होणार आणि त्यातून कोणता निर्णय होणार यावरच या मतदारसंघाचे भवितव्य ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीचा आढावा घेताना गेल्या अनेक निवडणुकीतील चित्र आवाडे गट विरुद्ध विरोधी गट असेच स्वरूप राहिले आहे. सातत्याने या मतदारसंघात काँग्रेसच्या माध्यमातून आपले वर्चस्व ठेवणाऱ्या प्रकाश आवाडे यांना 2009 च्या निवडणुकीत मोठा धक्का बसला. मिरज दंगलीचा फटका इचलकरंजी शहरालाही मोठा बसला होता. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश हाळवणकर यांनी या वेळच्या लढतीत रिंगणात उतरून निर्विवादपणे आपला विजय मिळवला. 2014 मध्येही हाळवणकर यांनाच मतदारांनी निवडून दिले. दोन निवडणुकीत बसलेला फटका पाहून विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी 2019 च्या निवडणुकीत अतिशय चांगल्या पद्धतीने मोर्चेबांधणी केली. थेट लोकांच्या संपर्कातून त्यांनी राबवलेले काही उपक्रम आणि सहकारी संस्थांच्या जाळ्याच्या माध्यमातून त्यांनी मोर्चेबांधणीचा चांगला फायदा त्यांना मिळाला आणि तब्बल 50 हजार मताधिक्य घेऊन ते या मतदारसंघात पुन्हा एकदा निर्विवादपणे निवडून आले.
2019 च्या निवडणुकीत राज्यातील एकूण राजकीय चित्र पाहता ताराराणी पक्षाच्या माध्यमातून स्वतंत्रपणे निवडणूक लढवून विजयी झालेले आमदार आवाडे यांनी पहिल्याच टप्प्यात भाजपला पाठिंबा दिला. परंतु राज्यातील घडामोडीत भाजप पक्ष बाजूलाच गेला आणि त्यांना विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावावी लागली. अशा पार्श्वभूमीवर पहिल्या दोन ते अडीच वर्षात आमदार प्रकाश आवाडे यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात विविध कामे करताना त्यांना अनेक अडथळे आले. परंतु त्यानंतर पुन्हा भाजप सत्तेवर आल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील विकासकामांना जोर लावला आहे.
इचलकरंजी मतदारसंघातील इचलकरंजी बरोबरच कोरोची, चंदुर, कबनूर, तारदाळ व खोतवाडी या गावांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आवाडे यांना निधी आणण्यास यश मिळाले आहे. त्याचबरोबर इचलकरंजी शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांच्या कामांनाही गेल्या काही महिन्यात जोरदार गती मिळाली आहे. या गावांमध्ये विविध विकास कामासाठी ही त्यांनी निधी दिला आहे.
इचलकरंजी नगरपालिकेचे आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित झाल्यावर त्याचा मोठ्या प्रमाणात कायापालट झाला आहे .सध्या सर्व सुविधांनीयुक्त आणि अत्याधुनिक सेवेसाठी आयजीएम रुग्णालय एक पाऊल पुढे टाकत आहे. अर्थातच यासाठी यापूर्वी आमदार म्हणून असताना हाळवणकर त्यानंतर विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनीही मोठे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे कात टाकलेले आयजीएम रुग्णालय याचे श्रेय दोघेही घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. महापूर आल्यानंतर मळे भाग त्याचबरोबर जुन्या चंदूर रस्त्याला बसणारा मोठा फटका यावर उपाय म्हणून आमदार प्रकाश आवाडे यांनी यशोदा पुलाची पुनर्रचना करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्याची सुरू झालेली कार्यवाही शहराच्या काही भागाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत मतदार संघात आवाडे यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार कोण असणार यावरच एकूणच राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. सद्यस्थितीत आवाडे हे राज्य आणि देशपातळीवर भाजपच्या नेत्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर त्यांनी दुसरा पर्याय म्हणून ताराराणी पक्ष तेवढाच सक्षम ठेवला आहे. भाजपच्या वतीने सक्षम उमेदवार म्हणून सुरेश हाळवणकर यांचेही नाव पुढे येते. काँग्रेसच्यावतीने यावेळी माजी नगरसेवक संजय तेलनाडे त्यांच्या पत्नी स्मिता तेलनाडे याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष संजय कांबळे यांची नावे चर्चेत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मदन कारंडे तर अजित पवार गटाकडून विठ्ठल चोपडे यांची नावे चर्चेत आहेत. गेल्या काही महिन्यांत राजकीय टोलेबाजींना प्रारंभ झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर आवाडे गटाकडून व विरोधी गटाकडून जोरदारपणे टीकेची झोड सुरू झाली आहे. त्यातच आमदार आवाडे आणि विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यावरही टीका केले आहे. त्यामुळे या सर्वांचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीत कसे उमठणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
एकास एक की बहुरंगी
इचलकरंजी शहरात आवाडे यांना पराभूत करण्यासाठी पुन्हा एकास एक लढतीचा पर्याय पुढे येतो का? हा ही मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. जर एकास एक लढत झाली तर सक्षम पर्याय म्हणून उद्योजक सतीश डाळ्या, आरएसएसचे कार्यकर्ते भगतराम छाबडा व माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांचीही नावे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु या तीन उमेदवारांपैकी कोण रिंगणात येण्याची मानसिकता ठेवतात यावर बरेचसे चित्र अवलंबून असणार आहे.
पाणी प्रश्न गाजणार…
इचलकरंजी शहरातील सर्वात संवेदनशील प्रश्न म्हणून पिण्याचा पाण्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. सुमारे तीन लाख लोकसंख्या असलेल्या या शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी कुठून मिळणार याबाबत गेली अनेक वर्षे विषय चर्चेला येतो. कोणतीही योजना सुरू झाली की त्याला बाहेरून विरोध सुरू होतो आणि त्यामुळे योजना रेंगाळत जाते. शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी देण्यासाठी दूधगंगा नदीतून पाणी योजनेला शासनाने मान्यताही दिली आहे. परंतु या योजनेला अद्यापही गती मिळालेली नाही. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत शुद्ध आणि मुबलक पाणी हाच विषय गाजण्याची शक्यता आहे.