खानापूर तालुक्यात उद्यापासून लाळ्याखुरकतवर लसीकरण

खानापूर तालुक्यात उद्यापासून लाळ्याखुरकतवर लसीकरण

खानापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगातून जनावरांचे रोगांपासून संरक्षण व्हावे, यासाठी जनावराना लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी दि. 1 ते 30 एप्रिलपर्यंत लाळ्याखुरकतवर लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी  तालुक्यात पशुसंगोपन खात्याकडून सर्व यंत्रणा सिद्ध करण्यात आली असून तालुक्यातील सर्व जनावरांना एक महिन्यात लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी लसीचा आवश्यक पुरवठा केंद्राकडून करण्यात आला असल्याचे पशुसंगोपन खात्याचे साहाय्यक संचालक डॉ. ए. एस. कोडगी यांनी सांगितले. डॉ. कोडगी माहिती देताना म्हणाले, तालुक्यांत गायी 40 हजार 235 तर म्हशी 42 हजार 539 असे एकूण 82 हजार 674 जनावरे आहेत. खानापूर संगोपन खात्यात कुलिंग सिस्टीम असून येथूनच लस पुरवठा करण्यात येणार आहे. सध्या लसीचा साठा 84 हजार उपलब्ध आहे आणि त्याची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. खानापूर तालुक्यात एकूण 15 पशुचिकित्सालये असून लसीकरणासाठी 36 पथके तयार करण्यात आली असून एका पथकात एक अधिकारी व एक कर्मचारी असणार आहेत. असे 71 जण घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहेत. या लसीकरण मोहिमेत पशुपालकांनी सहकार्य करून आपल्या सर्व जनावरांना लसीकरण करून घ्यावे, या लसीकरण मोहिमेत एकही जनावर चुकू नये, याची खबरदारी घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना केलेली आहे. राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ्या खुरकतच्या पाचव्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेत  घरोघरी जाऊन गाई, बैल, म्हशींना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पशुपालकांनी खबरदारी म्हणून सर्व जनावरांना लाळ्dया प्रतिबंधक लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. लसीकरण मोफत असून पशुपालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंगोपन खात्याच्यावतीने करण्यात आले आहे.