फॉर्मात असलेल्या ‘आरसीबी’समोर आज अस्थिर दिल्लीचे आव्हान

फॉर्मात असलेल्या ‘आरसीबी’समोर आज अस्थिर दिल्लीचे आव्हान

वृत्तसंस्था/ बेंगळूर
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा सामना आज रविवारी दिल्ली कॅपिटल्सशी होणार असून चार विजय मिळवून प्ले-ऑफच्या शर्यतीतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यात आरसीबीने यश मिळविलेले असले, तरी अस्थिर दिल्ली कॅपिटल्स त्यांच्यासमोर वेगळे आव्हान उभे करेल. या सामन्यानंतर आरसीबीची एकच लढत बाकी राहणार आहे. मागील चार सामन्यांत आरसीबीने गुजरात टायटन्सला दोनदा, तर पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादला प्रत्येकी एकदा पराभूत केलेले आहे.
आरसीबी सध्या 12 सामन्यांतून 10 गुणांसह सातव्या स्थानावर आहे, मागील चार सामन्यांतील विजयांमुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. या आयपीएलमध्ये 634 धावांसह आघाडीवर असलेले विराट कोहली हा त्यांचा मुख्य आधार आहे. कोहलीसह कर्णधार फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन व दिनेश कार्तिक यांनीही धावा काढलेल्या आहेत. गेल्या चार सामन्यांत आरसीबीच्या गोलंदाजांनी घडविलेले परिवर्तनही उल्लेखनीय आहे. मोहम्मद सिराजला 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर सूर सापडला आहे आणि त्याला वेगवान गोलंदाज यश दयाल व डावखुरा फिरकीपटू स्वप्नील सिंग यांचे उत्कृष्ट समर्थन मिळाले आहे.
 
त्यांच्या कौशल्याची पहिली चाचणी जॅक फ्रेझर-मॅकगर्कविरुद्ध लागेल. 235.87 च्या प्रभावी स्ट्राइक-रेटने सात सामन्यांत 309 धावा केलेल्या मॅकगर्कमुळे दिल्लीला अनुभवी डेव्हिड वॉर्नरची अनुपस्थिती एकदाही जाणवलेली नाही. त्याचा सलामीचा जोडीदार अभिषेक पोरेलनेही 157 स्ट्राइक रेटने धावा केल्या असल्या, तरी संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून अधिक सातत्याची अपेक्षा असेल. कर्णधार रिषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांनीही चांगल्या धावा केलेल्या आहेत. फिरकीपटू कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी 24 बळी घेतलेले असल्याने गोलंदाजीत आपले पारडे थोडे अधिक जड असल्याचे दिल्लीला वाटेल. जोडीला खलील अहमद व मुकेश कुमार हे त्यांचे वेगवान गोलंदाज जर प्रभाव पाडू शकले, तर दिल्लीचा संघ आरसीबीला बऱ्यापैकी अडविण्याची आशा धरू शकतो.
संघ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.
दिल्ली कॅपिटल्स : रिषभ पंत (कर्णधार), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, सुमित कुमार, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद, कुमार कुशाग्र, प्रवीण दुबे, ललित यादव, लिझाद विल्यम्स, डेव्हिड वॉर्नर, झ्ये रिचर्डसन, एन्रिक नॉर्टजे, यश धूल, मिचेल मार्श, रिकी भुई, रसिख दार सलाम, विकी ओस्तवाल, स्वस्तिक चिकारा.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.