मुजरा पावसाचा…जयघोष शिवरायांचा!

मुजरा पावसाचा…जयघोष शिवरायांचा!

शिस्तबद्धपणे फडकणारे भगवे ध्वज, झांज, ढोलताशांचा गजर : मर्दानी खेळातून शिवकालाची आठवण
प्रतिनिधी/ बेळगाव
शिस्तबद्धपणे फडकणारे भगवे ध्वज, झांज, ढोलताशा, करेला व विविध कसरतींच्या प्रात्यक्षिकांसह बेळगावच्या शिवप्रेमी तरुणाईने शिवजयंती चित्ररथ मिरवणूक यशस्वी केली. पावसाने जरी व्यत्यय आणला तरी ‘भीती न आम्हा मुळी तुझीही कडकडणाऱ्या नभा’ असे म्हणत तरुण मंडळांनी चित्ररथ मिरवणुकीची तयारी केली व पावसाने थोडी उसंत घेताच मिरवणूक सुरू केली. त्यामुळे ‘मुजरा पावसाचा… जयघोष शिवरायांचा’ असे चित्र मिरवणुकीत पहायला मिळाले.
सालाबादप्रमाणे शिवजयंती उत्सव महामंडळाने मिरवणुकीचे नियोजन निश्चित केले. वास्तविक नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांची बरीच दमछाक झाली. पण आपले आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्यावरील निष्ठेने त्यांच्या दमणुकीवर मात केली आणि मंडळांनी चित्ररथ मिरवणुकीची तयारी सुरू केली.
दरम्यान, शनिवारी सकाळपासून मिरवणुकीची सर्व तयारी पूर्ण होत असतानाच गेल्या कित्येक दिवसांपासून हुलकावणी देत असणाऱ्या पावसाने नेमकी शनिवारी दमदार हजेरी लावली. तथापि, पावसाचाही शिवरायांना मुजरा अशी भावना मनोमन बाळगत मंडळांनी पावसाने विश्रांती घेईपर्यंत प्रतीक्षा केली व साधारण 9.30 नंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून मंडळांनी आपले गाडे मारुती गल्ली येथे मिरवणूक मार्गात लावले होते. यावर्षी तरी वेळेत मिरवणुकीला सुरुवात करावी, या उद्देशाने गाडे लावण्यात आले खरे. परंतु, पावसामुळे रात्री उशिरा देखाव्यांना सुरुवात झाली.
शिवचरित्रातील प्रसंग सजीव देखाव्यांच्या माध्यमातून सादर करून मंडळांनी शिवप्रेमींची मने जिंकली. विनायक मार्ग, समर्थनगर येथील मंडळाने सादर केलेला शूरवीर कोंढाजी फर्जंद यांचा देखावा सादर केला. शिवाजी रोड बेळगाव येथील सह्याद्रीपुत्र युवक मंडळाने अप्रतिम पद्धतीने देखावा सादर करून शिवप्रेमींना इतिहासाची आठवण करून दिली. ताशिलदार गल्ली मंडळाने प्रतापराव गुर्जर यांच्या त्यागाची आठवण करून देणारा देखावा सादर केला. पाटील गल्ली येथील भगतसिंग युवक मंडळाच्यावतीने अफझलखानाचा वध, कांगली गल्ली  बापट गल्ली, अनंतशयन गल्ली व विष्णू गल्ली, वडगाव या मंडळांनी एकाहून एक सरस सजीव देखावे सादर केले.
ढोलताशाचा गजर
बेळगावची शिवजयंती मिरवणूक ही वैशिष्ट्यापूर्ण ढोलताशाच्या वादनासाठी ओळखली जाते. शनिवारी पावसाचा व्यत्यय असतानाही ढोलताशा पथकांनी सुंदर वादन केले. वज्रनाद, जुने बेळगाव-वडगावातील शिवगर्जना, शिवमुद्रा ढोलताशा पथकाने वादन केले. नरवीर ढोलताशा पथक व ध्वजपथकाने यावर्षीही शेकडो वादकांच्या उपस्थितीत गजर सादर केला. ढोलताशा पथकांचा गजर मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू होती.
मर्दानी खेळातून शिवकालाची आठवण
करेला, दांडपट्टा, तलवारबाजी यासह इतर मर्दानी खेळ सादर करून शिवकालीन कलांची आठवण करून देण्यात आली. कॅम्प येथील के. टी. पुजारी लाठीमेळा, मंथन मर्दानी खेळ, अनगोळ, गणेशपूर येथील शिवनिश्चय पथकाने मर्दानी खेळ सादर केले. प्रतिवर्षी शिवभक्तांकडून मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखविले जात असते.
डीजेला फाटा देत इस्कॉनचे भजन
भांदूर गल्ली येथील मंडळाने यावर्षी डीजेला फाटा देत इस्कॉनच्या भजनावर फेर धरला. ‘हरि बोल’चा गजर करत इस्कॉनच्या मृदंगावर तालबद्धरीत्या तरुणाई भजनात दंग झाली होती. त्यामुळे एरवी डीजेवर थिरकणारी तरुणाई शनिवारी इस्कॉनच्या भजनामध्ये तल्लीन झालेली दिसून आली. यामुळे या मंडळाचे सर्व थरातून कौतुक होत होते.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे हिंदू धर्मीयांना गायींचे महत्त्व पटवून देण्यासाठी चित्ररथ मिरवणुकीत फलक मोहीम राबविण्यात आली. प्रत्यक्ष गायींनाच मिरवणुकीत सहभागी केले जाणार होते. परंतु, पावसामुळे ते शक्य न झाल्याने काही तरुण व तरुणी गायींचे महत्त्व सांगणारे फलक घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. गोमाता ही देशाची कृषीशास्त्र असून गायीला पशु न मानता तिचा सांभाळ करण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रेक्षक गॅलरीमुळे शिवभक्तांची झाली सोय
धर्मवीर संभाजी चौक येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी महानगरपालिकेच्यावतीने प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली होती. यामुळे शिवभक्तांना चित्ररथ मिरवणूक पाहणे सोयीचे झाले. चित्ररथ धर्मवीर संभाजी चौकात पोहोचेपर्यंत 11.30 वाजले तरी प्रेक्षकांनी मात्र गॅलरीमध्ये मोठी गर्दी केली होती. वयोवृद्ध तसेच लहान मुलांना या ठिकाणाहून चेंगराचेंगरीविना मिरवणूक पाहणे सोयीचे ठरले.