‘नकोशी’ : देवाला झाली हवीशी!
शिशुविक्री प्रकरणात वाचविलेल्या ‘त्या’ बालिकेचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : बारा दिवसांपूर्वी पोलीस व जिल्हा बालसंरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिशुविक्री प्रकरणात वाचविलेल्या सव्वा महिन्याच्या शिशुचा गुरुवारी मध्यरात्रीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विवाहपूर्व संबंधातून जन्मल्याने ती नकोशी झाली होती. त्यामुळेच तिची 60 हजारात विक्री करण्यात आली होती. दि. 9 जून रोजी सकाळी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील निसर्ग ढाब्याजवळ या शिशुची विक्री होणार होती. पोलीस व जिल्हा बालसंरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिशुविक्री करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला होता. या प्रकरणी एका डॉक्टरसह पाच जणांना अटक झाली होती. त्याचदिवशी नकोशी एक महिन्याची झाली होती.
विक्री प्रकरणातून वाचविल्यानंतर अधिकाऱ्यांनी तिला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील बालरोग विभागात दाखल केले होते. ती सव्वा महिन्याची झाली होती. गुरुवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला. यासंबंधीची माहिती माळमारुती पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांचे सहकारी शुक्रवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत नकोशीवर दफनविधी करण्यात आला. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्यासह माळमारुतीचे पोलीसही स्मशानात पोहोचले होते. तिचा मृतदेह पाहून पोलिसांनाही अश्रू अनावर झाले. विक्री प्रकरण हाणून पाडल्यानंतर हे प्रकरण हाताळणाऱ्या पोलिसांना तिचा जणू लळाच लागला होता. अचानक मृत्यू झाल्याने त्याचा धक्का बसला आहे.
याप्रकरणी महादेवी ऊर्फ प्रियांका बाहुबली जैनर (वय 37) मूळची रा. नेगिनाळ, ता. बैलहोंगल, सध्या रा. बेळगाव, डॉ. अब्दुलगफार हुसेनसाब लाडखान (वय 46) मूळचा रा. हंचिनाळ, ता. सौंदत्ती, सध्या रा. सोमवार पेठ, कित्तूर, चंदन गिरीमल्लाप्पा सुभेदार (वय 38) रा. तुरकर शिगीहळ्ळी, ता. बैलहोंगल, पवित्रा सोमप्पा मडिवाळर (वय 21) रा. संपगाव, ता. बैलहोंगल, प्रवीण मंजुनाथ मडिवाळर (वय 24) रा. होसट्टी, ता. धारवाड या पाच जणांना अटक केली होती. डॉ. अब्दुलगफारवर बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी कित्तूर पोलीस स्थानकातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गेल्या रविवारी 16 जून रोजी महसूल, पोलीस व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कित्तूरजवळील तिगडोळीनजीकच्या फार्महाऊसमध्ये तपासणी केली होती. गर्भपातानंतर शेतवडीत पुरून ठेवलेले तीन भ्रूण जप्त करण्यात आले होते. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व पाच जणांना 18 व 19 जून रोजी दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत घेऊन कित्तूर व तिगडोळी परिसरात तपासणी केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच नकोशीचा मृत्यू झाला आहे.
युगुलालाही न्यायालयाच्या परवानगीने आणले स्मशानात
ज्या युगुलाच्या विवाहपूर्व संबंधातून 9 मे 2024 रोजी कित्तूर येथील डॉ. अब्दुलगफारच्या दवाखान्यात नकोशीचा जन्म झाला, त्या युगुलालाही न्यायालयाची परवानगी घेऊन शुक्रवारी पोलिसांनी स्मशानात आणले होते. एफआयआर, अटक आदी प्रक्रिया झाल्यानंतर शेवटी आपलेच अपत्य आहे, कारागृहातून बाहेर पडल्यावर आपण त्याचा स्वीकार करू, या मनस्थितीपर्यंत युगुल पोहोचले होते. मात्र, त्याआधीच नकोशीचा मृत्यू झाला. सर्व धार्मिक विधी पूर्ण करून दफनविधी करण्यासाठी पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
Home महत्वाची बातमी ‘नकोशी’ : देवाला झाली हवीशी!
‘नकोशी’ : देवाला झाली हवीशी!
शिशुविक्री प्रकरणात वाचविलेल्या ‘त्या’ बालिकेचा दुर्दैवी मृत्यू बेळगाव : बारा दिवसांपूर्वी पोलीस व जिल्हा बालसंरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिशुविक्री प्रकरणात वाचविलेल्या सव्वा महिन्याच्या शिशुचा गुरुवारी मध्यरात्रीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विवाहपूर्व संबंधातून जन्मल्याने ती नकोशी झाली होती. त्यामुळेच तिची 60 हजारात विक्री करण्यात आली होती. दि. 9 जून रोजी सकाळी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील निसर्ग ढाब्याजवळ या शिशुची विक्री होणार होती. पोलीस […]