विनापरवाना ट्रेकिंग ठरतेय धोकादायक!

जंगलात धाडस न दाखविण्याचे वनखात्याचे आवाहन : अतिउत्साही तरुणांना आवर घालणे गरजेचे : बेफिकीर वृत्तीमुळे जीवावर बेतण्याची शक्यता बेळगाव : खानापूर तालुक्यातील घनदाट जंगल परिसरात विनापरवाना ट्रेकिंग (जंगल सफारी) चे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ट्रेकिंगप्रेमींच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नियम धाब्यावर बसवून विनापरवाना जंगलात उतरणे धोकादायक ठरू लागले आहे. दोन दिवसांपूर्वी बेळगावातील नऊ तरुणांना […]

विनापरवाना ट्रेकिंग ठरतेय धोकादायक!

जंगलात धाडस न दाखविण्याचे वनखात्याचे आवाहन : अतिउत्साही तरुणांना आवर घालणे गरजेचे : बेफिकीर वृत्तीमुळे जीवावर बेतण्याची शक्यता
बेळगाव : खानापूर तालुक्यातील घनदाट जंगल परिसरात विनापरवाना ट्रेकिंग (जंगल सफारी) चे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ट्रेकिंगप्रेमींच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नियम धाब्यावर बसवून विनापरवाना जंगलात उतरणे धोकादायक ठरू लागले आहे. दोन दिवसांपूर्वी बेळगावातील नऊ तरुणांना ट्रेकिंगचा आनंद अंगलट आला होता. त्यामुळे जंगल ट्रेकिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घनदाट जंगलात कोणीही जाऊ नये, असे आवाहनही वनखात्याने केले आहे. खानापूर तालुक्यातील नागरगाळी, जांबोटी, कणकुंबी, लोंढा आदी परिसरात वनक्षेत्र अधिक आहे. त्यामुळे निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी जंगलात विनापरवाना जाण्याकडे तरुणाईचा ओघ वाढू लागला आहे. मात्र, घनदाट जंगलात वाट चुकणे, हिंस्त्र प्राण्यांचा हल्ला होणे अशा घटना घडू लागल्या आहेत. शिवाय तरुण-तरुणी फिरत असल्याने वाईट प्रकार समोर येऊ लागले आहेत. यापूर्वी ट्रेकिंगसाठी गेलेल्या अनेकांना वाट चुकून मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे जंगलात कोणीही जाऊ नये, असे आवाहन खात्याने केले आहे.
विशेषत: कणकुंबी परिसरात जैवविविधता आढळून येते. निसर्गरम्य परिसर आणि धबधबे असल्याने साऱ्यांची पावले याकडे आकर्षित होतात. त्यामुळे वनखात्याची नजर चुकवून घनदाट वन्यप्रदेशात फिरणाऱ्या तरुणांची संख्या वाढू लागली आहे. मात्र, जंगलात वाट चुकून अनेक जण भरकटू लागले आहेत. दुर्दैवाने काहींना जीवदेखील गमवावा लागत आहे. वनखात्याने सातत्याने जागृती करूनदेखील बेफिकीर वृत्तीमुळे असे प्रकार वाढू लागले आहेत. जंगलात धोकादायक ट्रेकिंग करणे जीवाला घातक आहे. पूर्वपरवानगीशिवाय जंगलात प्रवेश करणे कायदेशीर गुन्हा आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून तरुणाई जंगलात प्रवेश करू लागली आहे. घनदाट जंगलातील रस्ता चुकून भरकटलेल्यांना शोधणे वनखात्याला डोकेदुखीचे ठरू लागले आहे. विशेषत: जंगल परिसरात मोबाईल नेटवर्क नसल्याने संपर्क होत नाही. अशा परिस्थितीत भरकटलेल्यांना शोधणे अधिक कठीण जात आहे. खानापूर येथील नागरगाळी, लोंढा, कणकुंबी, जांबोटी परिसरात वनक्षेत्र वाढू लागले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्याही टिकून आहे. वाघ, बिबटे, हत्ती, कोल्हा, अस्वल, गवी, रानडुक्कर, साळींदर आदी वन्यप्राणी वाढले आहेत. त्यामुळे जंगल परिसरात ट्रेकिंगला गेलेल्यांना या प्राण्यांपासून धोका आहे. वन्यप्रदेशात बारमाही पाणी टिकून असल्याने हरिण, चितळ आणि सांबरांची संख्याही वाढली आहे. यावर उपजीविका करणाऱ्या वाघांची संख्याही टिकून आहे. यापूर्वी वाघ, अस्वल आणि हत्तींनी हल्ला केल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे आरक्षित जंगल परिसरात फिरणे धोकादायक आहे. परवानगीविना कोणीही जंगल क्षेत्रात उतरू नये.
यापूर्वीही घडल्या होत्या अशा प्रकारच्या घटना

2016 मध्ये धारवाड येथील सात तरुण ट्रेकिंगसाठी नागरगाळी परिसरात गेले होते. मात्र, वाट चुकून त्यातील तिघे जण दुसरीकडे भरकटले. सुदैवाने दुसऱ्या दिवशी सर्व तरुणांचा शोध लागला.
2017 मध्ये 11 ते 13 वयोगटातील सात मुलींनी जंगलात प्रवेश केला होता. पुढे त्या रस्ता चुकल्या. 17 तासांच्या अथक प्रयत्नानंतर गोवा आणि बेळगावच्या वनअधिकाऱ्यांनी त्यांना जंगलातून बाहेर काढले. मात्र, अन्न-पाण्याविना आरोग्य समस्येला त्यांना सामोरे जावे लागले होते.
2018 मध्ये बेळगाव येथील आठ तरुणांनी कणकुंबीनजीक वन्यप्रदेशात प्रवेश केला. मात्र, वाट चुकल्याने ते तरुण आठ तास भरकटत राहिले. यावेळीही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सुटका केली होती.
फेब्रुवारी 2021 मध्ये चार तरुण सुरल परिसरात दाखल झाले होते. त्यापैकी एक तरुण बेपत्ता झाला होता.
2021 मध्ये जंगल परिसरात ट्रेकिंगला गेले असता मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यातून पळून जाताना एका तरुणाचा पाय घसरून तो दरीत कोसळला होता.
जुलै 2023 मध्ये परवानगीविना जंगलात गेलेल्या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाट चुकून भरकटलेले तरुण सुखरुप परतले तरी आरोपी म्हणून त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले होते.
29 डिसेंबर 2023 बेळगाव येथील नऊ तरुण पारवाड येथे जंगल परिसरात उतरले होते. भरकटलेल्या तरुणांना 24 तासांच्या अथक परिश्रमानंतर वनविभागाने शोधून काढले होते.

तरुण-पालकांना आवाहन
घनदाट जंगल परिसरात ट्रेकिंग करणे अत्यंत धोकादायक आहे. पूर्व परवानगीशिवाय जंगलात प्रवेश करणे गुन्हा आहे. याची जाणीव तरुण आणि पालकांनीही घेणे गरजेचे आहे.
– संतोष चव्हाण (एसीएफ, खानापूर)
जंगलात जाणे धोक्याचे
कणकुंबी परिसर निसर्गरम्य आणि अनेक धबधबे असल्याने तरुण वन्यप्रदेशात जातात. मात्र, हा आरक्षित वन्यप्रदेश आहे. या ठिकाणी जाणे धोकादायक आहे. इन्स्टाग्राम आणि गुगलचा वापर करून जंगलात उतरणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वनखात्याचीही डोकेदुखी वाढू लागली आहे.
– गिरीधर कुलकर्णी (वन्यप्रेमी)