अंगणवाडी सेविका-मदतनीसांची भरती रखडली

अंगणवाडींचा कारभार डळमळीत : 1300 जागा रिक्त : प्रक्रियेअभावी इच्छुक प्रतीक्षेत बेळगाव : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्यांचा कारभार डळमळीत झाला आहे. भरती प्रक्रियेसाठी इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. मात्र पुढील प्रक्रियेअभावी इच्छुकांना प्रतीक्षा करावी लागली आहे. जिल्ह्यात 5331 अंगणवाडी केंद्रे आहेत. अलीकडे यामध्ये नवीन अंगणवाडी केंद्रांची भर […]

अंगणवाडी सेविका-मदतनीसांची भरती रखडली

अंगणवाडींचा कारभार डळमळीत : 1300 जागा रिक्त : प्रक्रियेअभावी इच्छुक प्रतीक्षेत
बेळगाव : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्यांचा कारभार डळमळीत झाला आहे. भरती प्रक्रियेसाठी इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. मात्र पुढील प्रक्रियेअभावी इच्छुकांना प्रतीक्षा करावी लागली आहे. जिल्ह्यात 5331 अंगणवाडी केंद्रे आहेत. अलीकडे यामध्ये नवीन अंगणवाडी केंद्रांची भर पडली आहे. मात्र बऱ्याच अंगणवाडी केंद्रांमध्ये सेविका आणि मदतनीसांची कमतरता आहे. त्यामुळे अंगणवाडीच्या शिक्षणावर परिणाम होऊ लागला आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या भरतीसाठी दोनवेळा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, काही कारणास्तव ही प्रक्रिया थांबविण्यात आली. परिणामी अंगणवाडीतील शालेयपूर्व शिक्षण आणि पोषक आहार वितरणात अडचणी येऊ लागल्या आहेत.
जिल्ह्यातील रिक्त जागा भरण्यासाठी हिरवाकंदील मिळाला होता. यानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात आली. प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना सरकारच्या नवीन मार्गसूचीमुळे ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यामुळे इच्छुकांच्या पदरी निराशा पडली. जून 2023 मध्ये अंगणवाडी सेविका 223 तर मदतनीसांची रिक्त 308 पदे भरली जाणार होती. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, शासनाची नवीन मार्गसूची आणि इतर कारणांमुळे ही प्रक्रिया थांबली आहे.
अंगणवाडी केंद्रांमध्ये सेविकांची कमतरता असतानाच काही अंगणवाडी सेविकांवर बीएलओची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडणूक, मतदारयादी, इतर कार्यक्रमांची कामे दिली जात आहेत. त्यामुळे अंगणवाडी बंद ठेवण्याची वेळ सेविकांवर येऊ लागली आहे. त्यामुळे रिक्त जागांवर तातडीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती करावी, अशी मागणी होत आहे. शासनाकडून अधिसूचना जारी झाल्यानंतर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. दरम्यान निवड यादीही तयार करण्यात आली. मात्र महिला व बालकल्याण विभागाच्या सहसंचालकांनी जिल्हा समितीकडे अहवाल सादर केला नाही. त्यामुळे या प्रक्रियेत दिरंगाई झाली आहे. सहसंचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अहवाल सादर करावा, अशी मागणीही इच्छुकांकडून होऊ लागली आहे.
लवकरच अंतिम निवड यादी जाहीर होणार
अंगणवाडी सेविका व मदतनीसांची रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अधिवेशन आणि शासकीय सुट्यांमुळे अंतिम निवड यादी जाहीर करण्यास काहीसा विलंब झाला आहे. जिल्हा निवड समितीची लवकरच बैठक बोलाविली जाणार आहे. त्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे.
-नितेश पाटील, जिल्हाधिकारी