सरकार स्थापनेबाबत योग्यवेळी निर्णय!

‘इंडिया’च्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गे यांचे स्पष्टीकरण : बैठकीला 19 पक्षांचे 33 नेते उपस्थित वृत्तसंस्था/ नवी दिल्ली एकीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू असतानाच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बुधवारी संध्याकाळी 6 वाजता ‘इंडिया’चे नेते एकवटले होते. या नेत्यांची बैठक तब्बल दीड तास चालली. 19 पक्षांचे 33 नेते बैठकीत सहभागी झाले होते. बैठक […]

सरकार स्थापनेबाबत योग्यवेळी निर्णय!

‘इंडिया’च्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गे यांचे स्पष्टीकरण : बैठकीला 19 पक्षांचे 33 नेते उपस्थित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एकीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू असतानाच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बुधवारी संध्याकाळी 6 वाजता ‘इंडिया’चे नेते एकवटले होते. या नेत्यांची बैठक तब्बल दीड तास चालली. 19 पक्षांचे 33 नेते बैठकीत सहभागी झाले होते. बैठक आटोपल्यानंतर खर्गे यांनी ‘पॅसिस्ट शक्तींविऊद्धचा लढा सुरूच राहील, भाजप सरकार जनतेच्या इच्छेनुसार योग्य पावले उचलत नसल्याचे दिसून आल्यावर आम्ही योग्य वेळी योग्य ती पावले उचलू.’ असे स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत देशभरात ‘इंडिया’ आघाडीला प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात जनतेने जनादेश दिला आहे. ‘इंडिया’ला लोकसभा निवडणुकीत 234 जागा मिळाल्या. आघाडीला सरकार स्थापनेसाठी 272 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. मात्र, हे संख्याबळ गाठणे ‘इंडिया’ आघाडीच्यादृष्टीने असाध्य दिसत आहे. या पार्श्वभूमीवर इंडियाचे नेते सत्तास्थापनेचा दावा करू शकणार नाहीत. मात्र, नजिकच्या काळात मोदींना पाठिंबा देणारे काही खासदार गळाला लागल्यास इंडिया आघाडीकडून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न होऊ शकतात.
मोदींविरोधात जनादेश : खर्गे
‘इंडिया’च्या बैठकीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व सहकारी पक्षांचे स्वागत केले. आघाडीतील सर्व पक्ष एकीने, समन्वयाने आणि पूर्ण ताकदीने लढल्याचे त्यांनी सुरुवातीला सांगितले. तसेच 18व्या लोकसभा निवडणुकीतील जनमत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आहे. त्यांनी स्वत:च्या नावावर आणि चेहऱ्यावर निवडणूक लढवली. त्यामुळेच जनतेने भाजपला बहुमत न देता नेतृत्वाचा स्पष्ट संदेश दिला आहे, असा दावाही त्यांनी केला. वैयक्तिकरित्या मोदीजींसाठी हा केवळ राजकीयच नाही तर नैतिक पराभवही आहे. पण त्यांच्या सवयी आपण सर्वच जाणून आहोत. हे जनमत नाकारण्याचा ते सर्वतोपरी प्रयत्न करतील, असेही त्यांनी सांगितले.
खर्गे यांच्याशिवाय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार, द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे नेते उपस्थित होते. या बैठकीला मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि राघव चढ्ढा, शिवसेना (युबीटी) नेते संजय राऊत आणि इतर अनेक नेतेही सहभागी झाले होते.