म्यानमारमधील तरुणांच्या या गटाने लष्कराला करुन टाकले सळो की पळो
भारताशेजारील म्यानमारमध्ये लष्करी राजवट आहे. मात्र, आता ती राजवट उलथावून टाकण्यासाठी म्यानमारमध्ये बंडखोरांचे अनेक गट प्राण पणाला लावून सशस्त्र लढा देत आहेत. खासकरून त्यात तरुणांचा अधिक भरणा आहे. म्यानमारमधील सद्यपरिस्थिती, बंडखोर आणि लष्करातील संघर्ष आणि बदलती परिस्थिती याविषयी…
खडकाळ टेकडीच्या माथ्यावर दोन लाऊड स्पीकर आणण्यात आले. ते आणणाऱ्या माणसांएवढेच ते आकारानं मोठे आहेत. 800 मीटर खाली हपसांग शहरात म्यानमारच्या लष्कराचा तळ पसरला आहे.
प्रचंड उकाड्याचा हा दिवस आहे आणि दिवसाचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर आहे. मागील बाजूस बांबूच्या खांबावर अनेक तरुण बंडखोर मोठ्या आणि जड बॅटरी आणि अॅम्प्लिफायर घेऊन जात आहेत.
या लढाईचं नेतृत्व करणारे ने मायो झिन माजी लष्कारी कॅप्टन आहेत. ते 12 वर्षं लष्करात होते, त्यानंतर या संघर्षात सहभागी झाले आहेत.
खांद्यावर गडद हिरव्या रंगाचे जॅकेट घेऊन व्यासपीठावर सादरीकरण करणाऱ्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत.
खालच्या लष्करी तळावरील देशाच्या सत्ताधारी सैन्याशी एकनिष्ठ असलेल्या सैनिकांना बंडखोरांच्या बाजूनं येण्याचं आवाहन करण्यासाठी ते आले आहेत.
पूर्व म्यानमारच्या कारेन्नी राज्यातील या घनदाट जंगलात अनेक दशकांपासून विविध स्तरांवर सुरू असलेल्या संघर्षात दोन सैन्यं एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत.
मात्र अलीकडच्या काही महिन्यांत बंडखोरांनी केलेली आगेकूच पाहता, यावेळी त्यांना फायदा मिळू शकतो.
अनेक दशकांची लष्करी राजवट आणि क्रूर दडपशाहीनंतर, येथील काही वांशिक गटांनी नव्या तरुण बंडखोरांच्या मदतीनं हुकुमशाहीला जेरीस आणलं आहे. त्यामुळं आग्नेय आशियातील हा देश एक महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपला आहे.
गेल्या सात महिन्यांत जवळपास अर्ध्या ते दोन-तृतियांश देशाला प्रतिकाराचा सामना करावा लागला आहे. 2021 मध्ये लष्करानं बंड करून सत्ता ताब्यात घेतल्यापासून हजारो लोक मारले गेले आहेत. यात लहान मुलांचाही समावेश आहे.
जवळपास 25 लाख लोक विस्थापित झाले आहेत आणि लष्करी राजवट चालवताना लष्करासमोर एक अभूतपूर्व आव्हान निर्माण झालं आहे.
नागरिकांकडून होत असलेला वाढता प्रतिकार आटोक्यात आणण्यासाठी लष्कराकडून नियमितपणे नागरिकांवर, शाळांवर आणि चर्चवर लढाऊ विमानांमधून बॉम्बहल्ले केले जात आहेत.
ने मायो झिन यांचं ध्वनी उपकरण सुरू होण्याआधी ते असलेल्या ठिकाणी लष्कराकडून गोळीबार सुरू होतो.
पण हातात माईक आणि स्विच असलेले झिन जराही विचलित न होता, ओरडतात, “प्रत्येकानं गोळीबार थांबवा, कृपया थांबवा. फक्त 5 मिनिटं ऐका, 10 मिनिटं ऐका.” आश्चर्याची बाब म्हणजे त्यानंतर गोळीबार थांबतोही.
झिन म्हणाले की, उत्तरेतील शान राज्यात 4,000 सैनिकांनी विरोधकांसमोर शरणागती पत्करली आहे. त्याचबरोबर झिन यांनी त्यांना देशाची राजधानी असलेल्या ने पाई तॉव शहरातील लष्करी इमारतींवर बंडखोरांनी अलिकडेच केलेल्या ड्रोन हल्ल्याबद्दल सुद्धा सांगितलं.
आम्ही जिंकतो आहोत, तुमची राजवट हरते आहे आणि आता शरण येण्याची वेळ आली आहे, असा आमचा संदेश आहे, असं ते म्हणाले.
इकडे हपसांग आणि कारेन्नी राज्यांमध्ये किंबहुना देशाच्या बहुतांश भागात लढाया आणि प्रतिकाराचा जोर वाढला आहे. मोठ्या बंडामुळे देशातील लष्करी राजवटीला धोका निर्माण झाला आहे. 2021 मध्ये लष्करानं उठाव करून निवडून आलेल्या नागरी सरकारचा अंत केला होता आणि त्यांच्या नेत्या आंग सान सू की आणि त्यांच्यासोबत इतर राजकीय नेते अजूनही तुरुंगात आहेत.
तसं पाहिलं तर या संघर्षाच्या फारशा बातम्या जगासमोर आलेल्या नाहीत. कारण जगाचं बहुतांश लक्ष रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-गाझा संघर्षावर आहे. म्यानमारमध्ये प्रसारमाध्यमांना फारसं स्वातंत्र्य नाही. परकीय पत्रकारांना इथं अधिकृतपणे येण्यास क्वचितच परवानगी दिली जाते. शिवाय देशात आल्यानंतर त्यांच्यावर प्रचंड निगराणी ठेवली जाते. सरकारमान्य भेटींच्या माध्यमांतून या संघर्षाच्या प्रतिकाराची दुसरी बाजू ऐकून घेण्याचा मार्ग दिसून येत नाही.
आम्ही म्यानमारमध्ये गेलो. तिथे प्रतिकार करणाऱ्या बंडखोरांच्या गटासोबत आम्ही देशाच्या पूर्व भागातील थायलंडच्या सीमेला लागून असलेल्या कारेन्नी राज्यात तसंच चीनच्या सीमेला लागून असलेल्या शान राज्यात महिनाभर राहिलो.
आम्ही जंगलातील पायवाटांवर, आड वळणाच्या वाटांवरून, लष्कर अनेक आठवडे वेढलं गेलं होतं अशा ठिकाणी प्रवास केला. तिथे हपसांग प्रमाणेच बंडखोर वरचढ आहेत.
आणखी उत्तरेत मोएबी प्रमाणे इतर ठिकाणी भूसुंरुंग पेरलेल्या ठिकाणांहून थेट हल्ला चढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे बंडखोरांचं प्रचंड नुकसान झालं आहे. तिथे आणि राज्याची राजधानी असलेल्या लोईकॉवमध्ये बंडखोरांची ताकद आणि त्यांच्या मर्यादा स्पष्ट दिसत आहेत.
हपसांगमध्ये संयमानं प्रतिकार केला जात आहे. बंडखोरांना तिथं त्यांची बाजू वरचढ असल्याचा आत्मविश्वास आहे. लष्करी तळावर जवळपास 80 सैनिक महिन्याहून अधिक काळापासून अडकले आहेत. तिथे जवळपास 100 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं किंवा जखमी झाल्याचं मानलं जातं आहे.
टेकडीच्या माथ्यावर ने मायो झिन त्यांच्या लाऊड स्पीकरचा वापर करून सैनिकांना शरणागतीचं आवाहन करतात. “आम्ही तुम्हाला घेरलं आहे. इथं हेलिकॉप्टर येण्याचीही शक्यता नाही. जमिनीवरून सैनिकांच्या मदतीच्या तुकडीची शक्यता नाही. आम्हाला शरण यायचं की नाही हे ठरवण्यासाठी आज तुमच्याकडे वेळ आहे.”
ने मायो झिन त्यांना मिंग आंग हलाईंग यांना सोडण्याचं आव्हान करतात. जनरल मिंग हे देशातील लष्करी राजवटीचे प्रमुख आहेत.
“तुम्हा सर्वांना नक्कीच जीवनदान दिलं जाईल, असं वचन मी देऊ शकतो. म्हणून मूर्खपणा करू नका. जुलमी मिंग आंग हलाईंग यांच्या अन्यायकारक संपत्तीचं तुम्ही शेवटच्या श्वासापर्यत रक्षण करणार आहात का? आता तुमचं स्वागत करण्याची मी वाट पाहतो आहे.”
काही क्षणांनी टेकडीच्या माथ्यावर फक्त माशांचा आवाज येत होता. लष्करातील सैनिक या पर्यायाचा विचार करत होते. हा निर्णय सोपा नाही. त्यांनी शरणागती पत्करली आणि लष्कराच्या नियंत्रणात असलेल्या भागात ते परतले तर त्यांना कदाचित मृत्यूदंड दिला जाईल.
सैनिकांचं उत्तर मोठ्या आणि ठाम आवाजात आलं. बंडखोरांच्या खडकाळ चौकीवर त्यांनी पुन्हा गोळीबार केला. त्या गोळीबारापासून वाचण्यासाठी बंडखोर झुकू लागले. सैनिक आज शरण येणार नाहीत.
ने मायो झिन आवाहन करणं सुरू ठेवतात. कारवाईच्या कमांडरनं लष्करी तळ ताब्यात घेण्यासाठी रेडिओवर वेगळा मार्ग अवलंबला. सैनिक रेडिओवर ज्या फ्रिक्वेंन्सिचा वापर करत होते, त्या फ्रिक्वेन्सीवर ते त्यांना अपमानास्पद शब्द बोलू लागले.
या शाब्दिक हल्ल्यात बंडखोरांचा कमांडर सैनिकांना मिन आंग हलाईंगचं संरक्षण करणारी कुत्री असल्याचा आरोप करतो आणि ते देशाचा विश्वासघात करत असल्याचा म्हणतो.
सैनिकदेखील अपमानास्पद भाषेचा वापर करून प्रत्युत्तर देतात. सैनिकी मदत आणि अन्नाचा पुरवठा अशी रसद नसताना ते लढतहोते. देशावर राज्य करणं हा लष्कराचा अधिकार आहे असा दृढ विश्वास बाळगून सैनिक लढत असतात.
पण या दोन्ही बाजूंमधील वैचारिक दरी सांधण्यापलीकडची आहे.
बंडखोरांनी माघार घेण्याआधी पुढील 30 मिनिटं किंवा त्यांना आमिष दाखवण्याचा आणि त्याचवेळी धमकावण्याचा खेळ सुरू होता.
सैनिकांना शरण येण्याचं आवाहन करताना उत्साहात ने मायो झिन यांनी अनावधानानं सैनिकांना त्यांची लपण्याची जागा सांगितली. ते म्हणाले होते, मी लाऊड स्पीकर्सशेजारी 400 यार्डांवर आहे.
त्यामुळं सैनिक त्या ठिकाणी तोफगोळ्यानं हल्ला करतील, अशी काळजी बंडखोरांना होती. त्या संध्याकाळी टेकडीवर थेट हल्ला झाला, पण कोणीही जखमी झालं नाही.
बंडखोरांच्या गटांनी लष्करी राजवटीला प्रदीर्घ काळापासून विरोध केला आहे. यातील बहुतांश सदस्य 25 वर्षांखालील आहेत.
कारेन्नी नॅशनलिस्ट डिफेन्स फोर्समधील (केएनडीएफ) 22 वर्षीय नाम री यानं बंडखोरांसोबत जाण्याचं कारण सांगितलं.
“द डॉग्ज [लष्कराचा अपमान करण्यासाठी वापरला जाणारा शब्द] अन्यायकारक आहे. त्यांनी बेकायदेशीर उठाव केला आहे. आम्ही तरुण त्यावर नाराज आहोत,” असं त्यानं म्हटलं.
त्यानं बार्सिलोना एफसी टी शर्टसह ट्राऊझर परिधान केल्या होत्या. इतरांपेक्षा वेगळे असे बॅलेस्टिक हेल्मेट त्याच्या वेगळे होते.
केएनडीएफ ही तरुण बंडखोरांची नवी फळी आहे. लष्कराच्या विरोधात बंडखोर कारेन्नीमध्ये दशकांपासून लढत आहेत. पण केएनडीएफनं त्यांनी युद्धभूमीवर यशस्वीपणे एकत्रित बांधलं आहे.
गेल्यावर्षी 27 ऑक्टोबरला देशाच्या उत्तरेकडील बंडखोर गटांनी लष्करी तळ आणि सीमेवरील चौक्या ताब्यात घेण्यात सुरूवात केल्यानंतर या संघर्षानं वेगळं वळण घेतलं.
तेव्हापासून देशभरातील इतर अनेक शहरं सशस्त्र बंडखोरांच्या ताब्यात आली आहेत. अर्थात अजूनही देशातील महत्त्वाच्या शहरांवर लष्कराचं नियंत्रण आहे. मात्र देशाचा आतील भाग आणि म्यानमारच्या सीमेवरील भागावरील नियंत्रण लष्कर गमावत आहे.
केएनडीएफ (KNDF)आणि इतर बंडखोर गटांच्या मते, 90 टक्के कारेन्नी प्रांतावर त्यांचं नियंत्रण आहे. हा कदाचित देशातील सर्वात छोटा प्रांत असेल मात्र तो कडव्या प्रतिकाराचं केंद्र बनला आहे.
आंब्याच्या सावलीत भरभक्कम देहयष्टी असलेला डेप्युटी कमांडर मोई फो थाइके बसलेला होता. अमेरिकेत हवामानशास्त्राचं शिक्षण घेतलेल्या मोईनं तीन वर्षांपूर्वी बंदूक हाती घेतली.
लष्कराची सत्ता त्यांना अमान्य आहे. देशातील काही समुदायांवर त्यांनी अत्याचार केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
संपूर्ण देश आता लष्कराविरोधात लढत असल्याचं ते म्हणत आहेत.
“आता पद्धत बदलत आहे. सर्व हल्ले नियोजनबद्धरित्या केले जात आहेत,” असं ते म्हणाले.
केएनडीएफकडं सैनिकांची कमतरता नाही. पण शस्त्त्राचा प्रचंड तुटवडा आहे.
“आमच्यात खूप हिम्मत आहे. आमच्याकडे माणुसकीही आहे. त्याच्या जोरावरच आम्ही त्यांचा पराभव करणार आहोत,” असं मोई म्हणतात.
म्यानमार लोकशाहीकडं वळत होता, त्या काळापासून त्यांच्या हातावर फ्री थिंकर म्हणजे मुक्त विचार करणारा असं लिहिलेलं आहे. मी त्यांना विचारलं की, तुम्ही अजूनही मुक्त विचार करणारे आहात का? त्यांनी उत्तर दिलं, “या गणवेशात, नाही. पण गणवेश नसताना मी नक्कीच स्वतंत्र माणूस आहे. तेच आमचं स्वप्न आहे. आम्ही ते पुन्हा निर्माण करू.”
म्यानमारमध्ये प्रवेश करणं म्हणजे फक्त विस्मृतीत गेलेल्या युद्धाचा प्रवास नाही, तर बाहेरच्या जगापासून वेगळ्या पडलेल्या देशाचा प्रवास करण्यासारखं आहे.
म्यानमारमधील कारेन्नी राज्यातील मोबाईल नेटवर्क, इंटरनेट आणि विजेचा पुरवठा खंडित झालेला आहे. बंडखोरांबरोबरच्या संघर्षात कदाचित लष्कराची पीछेहाट झाली असेल. पण, उर्वरित लष्करी तळांकडं राज्यातील मुख्य रस्त्यांचं नियंत्रण आहे.
हपसांगपासून आणखी उत्तरेला डेमोसो शहरापर्यत 60 किमी (37 मैल) अंतराच्या प्रवासासाठी मातीच्या वाटा, टेकड्या आणि नद्या-खोऱ्यांमधून प्रवास करताना 10 तासांहून अधिक वेळ लागला.
मोएबी शहराजवळच्या लष्करी तळावर अयशस्वी हल्ल्यानंतर आम्ही पोहोचलो होतो. या चकमकीत 27 बंडखोर मारले गेले होते.
जंगलातील हॉस्पिटलमधील घाणेरड्या फरशीवरील बेडवर केएनडीएफचे तरुण झोपलेले असतात. यातील काही स्मित हास्य करतात आणि अंगठा वर करून थम्ब्स अप करतात. यातील अनेकांना हातपाय गमवावे लागले आहेत.
लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात पायाच्या फेमोरल धमनीवर तोफगोळ्याचा तुकडा पडल्यानं 23 वर्षाच्या ऑंग नगलेचा पाय सुजला आहे. तो इतका आजारी आहे की बोलूही शकत नाही. मात्र, जसा तो रडू लागला तसे तीन सहकारी त्याच्याकडं आले आणि त्याला धीर देत त्याचं सांत्वन केलं. इथं त्याच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकणार नाही. पुढील उपचारांसाठी त्याला थायलंडपर्यतचा लांब प्रवास करावा लागेल.
तो जगेल का असं मी डॉक्टरांना विचारलं. त्यावर डॉक्टर म्हणाले, “तो बरा होईल. मात्र तो आता लढू शकणार नाही यामुळे तो निराश झाला आहे.”
अनेक बाबतीत हा संघर्ष अतिशय तीव्र आणि क्रूर स्वरुपाचा आहे. मोएबीमधील लढाई अनेक दिवस चालली. हा अतिशय अटीतटीचा संघर्ष झाला. लष्कराच्या बंकर्सवर बंडखोरांच्या तुकडीनं टेकडीवर समोरून हल्ला चढवला होता.
एका व्यक्तीला हाताला, पायाला आणि पोटाला असंख्य जखमा झाल्या आहेत. तो म्हणाला की, या जखमा एका हँड ग्रेनेडमुळं झाल्या आहेत. त्यांच्या एका कमांडरच्या पायाला जखमा झाल्या होत्या. परत आणण्यासाठी गेले असताना ही घटना घडली होती. “हा अपघात फारच जवळून घडला होता. फक्त 30 फुटांवर,” असं तो म्हणाला.
आम्ही जसजसं उत्तरेकडून दक्षिणेतील शान राज्यातील हसिसेंग शहराकडं प्रवास करत गेलो, तसं आम्हाला युद्धाची तीव्रता कमी आहे, असं जाणवलं. राज्याची राजधानी असलेल्या लॉईकाव्हकडं जाणारा मार्ग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यामुळं लष्करानं तिथे प्रतिकार वाढवला आहे.
केएनडीएफ गटाचं राज्य नसलं तरी डारथावर या लढवय्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी इथं आघाडी घेतली आहे. इतरांप्रमाणे डारथावर देखील आधीच्या हल्ल्यांमध्ये जखमी झाले होते. त्यांच्या टी-शर्टच्या बाहीखालून एक गडद लाल रंगाचा डाग डोकावत होता.
“या ठिकाणाचं रक्षण करणं हे आमच्यासाठी आमच्या घराचं रक्षण करण्यासारखंच आहे,” असं ते म्हणाले. ते किंवा त्यांच्या माणसांकडे चिलखत नाही. आमच्याकडे सुद्धा नाही.
एका छोट्या टेकडीच्या माथ्यावर केळीच्या बागेजवळ आम्ही उभे होतो. तेव्हा 1.5 किमी (0.9 मैल) अंतरावरील एका लष्करी तळाकडं त्यांनी बोट दाखवलं. जवळच तोफगोळे पडू लागले आणि काही उथळ खंदकांमध्ये झुंबड उडाली. तोफगोळे जवळ पडू लागले.
सैनिकांची एक तुकडी भूसुंरुगांमधून मार्ग काढत आमच्या तळाकडे आगेकूच करत असल्याचं स्पष्ट झालं. तोफगोळ्यांचा मारा सुरू असतानाच आम्ही वेगानं वाहन चालवू लागलो. एक तोफगोळा आमच्या वाहनांच्या अगदी पुढेच थेट रस्त्यावर पडला.
“त्यांचे सैनिक जखमी झाले आणि त्यामुळंच ते सर्वत्र अंदाधुंद गोळीबार करत आहेत,” असं डारथावर यांनी सांगितलं.
जंगलात स्वच्छ केलेल्या कडक जमिनीवरील परेड ग्राऊंडवर प्रदवीप्रदान समारंभात, नव्यानं भरती झालेले बंडखोर सैनिक शिस्तीत रांगेत कदमताल करत होते. केएनडीएफच्या नेतृत्वाला सलामी देत होते.
त्यांचे रबर सोल असलेले कॅनव्हासचे बूट जमिनीवरील धूळ उडवत होते. त्यात तरुण आणि तरुणी होत्या. यातील बहुतांश नुकतेच 18 वर्षांचे झाले आहेत. ते “वॉरियर” या इंग्रजी गाण्याच्या धूनवर कदमताल करत होते.
तिथं 500 हून अधिक नव्यानं भरती झालेले सैनिक आहेत. नव्यानं भरती झालेल्या सैनिकांची ही विक्रमी संख्या आहे. सैनिकांची कमतरता भासत असताना, भरतीचा हुकूम काढल्यानं, बंडखोर प्रदेशात पळून जाणाऱ्या शेकडो तरुणांना या क्रांतिकारी कार्यात सहभागी होण्यासाठी पाठवलं आहे.
मी सैन्याला शेवटचं पाहिलं तेव्हा ते बांबूच्या रायफलनं प्रशिक्षण घेत होते. आता त्यांच्याकडं खऱ्या रायफली आहेत.
त्यांचा कमांडर माउई म्हणाला की, त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी जास्त वेळ नाही. “आमची व्यूहरचनाच, अशी आहे की आम्ही एक महिन्याचं सखोल प्रशिक्षण देतो आणि मग लढायला जातो.”
नव्यानं भरती झालेल्या सैनिकांचा प्रदवीप्रदान समारंभात सर्वांचा मूड अतिशय उत्साही असतो. एसी कायर ले या तरुण रॅपरनंदेखील प्रशिक्षण घेतलं. तो नव्यानं भरती झालेल्या सैनिकांत जल्लोष निर्माण करतो.
हा उठाव कुठपर्यत जाईल यांचा अंदाज वर्तवणं कठीण आहे. दोन्ही बाजूंसाठी हे अस्तिवाचं युद्ध आहे. हे युद्ध रक्तपात आणि कटुतेनं भरलेलं आहे. पण, इथून परतीचा मार्ग नाही असं दिसतं.
साडेतीन आठवड्यानंतंर आम्ही हपसांगमध्ये परतलो. आम्ही निघाल्यानंतर ज्या लष्करी तळावर बंडखोरांकडून हल्ला केला जाणार होता, तो तसाच उभा राहिला होता.
लष्करानं जवळपास 100 सैनिकांची मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र बंडखोरांबरोबरच्या लढाईत त्यातील 57 पकडले गेले आणि उर्वरित पळून गेले किंवा मारले गेले.
लष्करी तळावर मदत पोहोचवण्यात लष्कराला अपयश आलं. मात्र बंडखोरांच्या सैन्याबरोबरच्या चकमकीचा आणखी एक परिणाम झाला. याचा अर्थ सशस्त्र बंडखोरांचा दारूगोळा संपला होता आणि त्या चौकीवर ते पुन्हा हल्ला करू शकले नाहीत.
आम्ही पोहोचण्याच्या एक दिवस आधी, लष्कराच्या लढाऊ विमानांनी हपसांगच्या वरील टेकडीवर बॉम्बहल्ला केला होता. त्यात 3 तरुण बंडखोर मारले गेले होते आणि 10 जण जखमी झाले होते.
त्याआधी सालवीन नदीच्या काठावरील त्यांच्या तळांवर सेलिब्रेशन झालं होतं. ते शत्रूची अगदी आरामात वाट पाहत होते.
मात्र, आता त्यांची मन:स्थिती गंभीर झाली होती. आता शरणागतीची अधिक आवाहनं शक्य नव्हती. आता थेट मृत्यूपर्यंतची लढाई असणार होती.
Published By- Priya Dixit