घटप्रभा नदीपात्रात ट्रॅक्टर गेला वाहून

मुडलगीजवळील अवरादीमध्ये घटना : एक कामगार बेपत्ता बेळगाव : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे. काही ठिकाणी तर नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. ट्रॅक्टरमधून घटप्रभा नदीवरील पूल ओलांडताना ट्रॅक्टर नदीत पडून 13 कामगार वाहून गेले आहेत. रविवारी सकाळी अवरादी, ता. मुडलगीजवळ ही घटना घडली आहे. वाहून गेलेल्या 13 पैकी 12 कामगारांनी पोहून काठ गाठला आहे. […]

घटप्रभा नदीपात्रात ट्रॅक्टर गेला वाहून

मुडलगीजवळील अवरादीमध्ये घटना : एक कामगार बेपत्ता
बेळगाव : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे. काही ठिकाणी तर नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. ट्रॅक्टरमधून घटप्रभा नदीवरील पूल ओलांडताना ट्रॅक्टर नदीत पडून 13 कामगार वाहून गेले आहेत. रविवारी सकाळी अवरादी, ता. मुडलगीजवळ ही घटना घडली आहे. वाहून गेलेल्या 13 पैकी 12 कामगारांनी पोहून काठ गाठला आहे. तर एक कामगार बेपत्ता झाला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी बेपत्ता कामगाराचा शोध घेत होते. धोका ओळखून कुलगोड पोलिसांनी पुलावर उभे केलेले बॅरिकेड्स हटवून नदी ओलांडण्याचा अट्टहास या कामगारांच्या अंगलट आला आहे. चुरका शरण (वय 27) रा. पश्चिम बंगाल असे पाण्यात वाहून गेलेल्या कामगाराचे नाव आहे. पश्चिम बंगालमधील कामगार यादवाड येथे मुक्कामाला आहेत.
हाय टेन्शन वायरचे काम करण्यासाठी ट्रॅक्टरमधून हे सर्व जण बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूरला जात होते. रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास मुडलगी तालुक्यातील अवरादीजवळ ही घटना घडली. मुडलगी तालुक्यातील अवरादी व बागलकोट जिल्ह्यातील नंदगाव या दोन्ही गावांच्यामध्ये घटप्रभा नदीवर हा पूल आहे. कामगारांना घेऊन महालिंगपूरला जाण्यासाठी ट्रॅक्टरमधून जाताना पुलावरून पाणी जात होते. त्यावेळी दोन ट्रॅक्टर नदी ओलांडण्यासाठी काठावर थांबले होते. पोलिसांनी कोणीही पूल पार करण्याचे धाडस करून नये म्हणून बॅरिकेड्स उभे केले होते. ते बॅरिकेड्स हटवून एका ट्रॅक्टरचालकाने नदी पार केली. त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमधील कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचालकानेही नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. पुलाच्या मधोमध येताच ट्रॅक्टर वाहून गेला. 13 पैकी 12 कामगारांनी पोहून नदीकाठ गाठला. तर एक कामगार वाहून गेला आहे. कुलगोड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी उभे केलेले बॅरिकेड्स हटवून नदी पार करण्याचा अट्टहास केल्यामुळे ही घटना घडल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.