राजधानीत ‘ओस्सय ओस्सय’चा नाद!

आयोजकांकडून जय्यत तयारी पण, रोमटामेळ पथकांमुळे चित्ररथ मिरवणुकीस उशीर प्रतिनिधी/ पणजी राज्याच्या प्रमुख उत्सवांपैकी एक असलेल्या शिमगोत्सवाला राजधानी पणजीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजधानीत ‘ओस्सय ओस्सय’, ‘घुमचे कटर घुम’चा निनाद घुमला. ढोलताशे आणि कासाळ्याच्या एकत्रित वादनाने निर्माण झालेल्या ‘घुमचे कटर घुम’च्या निनादाने पणजी शहर भारावून गेले. गोवा सरकारचे पर्यटन खाते व पणजी शिमगोत्सव समितीतर्फे शनिवारी  शिमगोत्सवाचे […]

राजधानीत ‘ओस्सय ओस्सय’चा नाद!

आयोजकांकडून जय्यत तयारी पण, रोमटामेळ पथकांमुळे चित्ररथ मिरवणुकीस उशीर
प्रतिनिधी/ पणजी
राज्याच्या प्रमुख उत्सवांपैकी एक असलेल्या शिमगोत्सवाला राजधानी पणजीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजधानीत ‘ओस्सय ओस्सय’, ‘घुमचे कटर घुम’चा निनाद घुमला. ढोलताशे आणि कासाळ्याच्या एकत्रित वादनाने निर्माण झालेल्या ‘घुमचे कटर घुम’च्या निनादाने पणजी शहर भारावून गेले.
गोवा सरकारचे पर्यटन खाते व पणजी शिमगोत्सव समितीतर्फे शनिवारी  शिमगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा प्रथमच दयानंद बांदोडकर ते कांपाल परेड मैदानावर शिमगोत्सव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी पणजी शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, पणजी महानगरपालिकेचे आयुक्त क्लेन मदेरा, समितीचे कार्याध्यक्ष मंगलदास नाईक, सचिव शांताराम नाईक, खजिनदार संदीप नाईक, सहखजिनदार सतीश चोपडेकर, सह खजिनदार प्रशांत नाईक, सदस्य किशोर नार्वेकर, सुनील नाईक, महेश आमोणकर, तिमोतियो फर्नांडिस, दिलीप परब, चित्रा क्षीरसागर, सुधीर अघीकर, अवधुत आंगले, शशिकांत सरदेसाई आदी उपस्थित होते.
राज्याची लोकसंस्कृती, लोकपरंपरा यांचे प्रतिबिंब जनमानसापर्यंत पोहोचविण्याऱ्या तसेच सांस्कृतिक परंपरा असलेल्या शिमगोत्सवातील चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य पथकांनी आपल्या कलेचे दर्शन घडवले. वेशभूषा आणि चित्ररथ स्पर्धकांनीही उपस्थितांकडून वाहवा मिळवली. शिमगोत्सव समितीने निटनेटके आयोजन करून शहरात शिमगोत्सवापूर्वीच वातावरण निर्मिती केली होती. दयानंद बांदोडकर मार्गावर तसेच 18 जून रस्त्यांवरही आकर्षक सजावट केली होती.
गोव्याचा सांस्कृतिक उत्सव म्हणून शिमगोत्सव साजरा केला जातो. गोव्याच्या शिमगोत्सवाची ओळख सातासमुद्रापार असल्याने या उत्सवात उत्तमप्रकारे सादरीकरण व्हावे, यासाठी प्रत्येक पथक व कलाकार आपल्या कलेचे दर्शन उत्कृष्टपणे घडवतात. पणजीतील शिमगोत्सवातील मिरवणूक पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबरच पर्यटकांनीही गर्दी केली होती.
आयोजकांकडून जय्यत तयारी
लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता असल्याने पणजी शिमगोत्सव समितीने वेळेचे बंधन पाळण्यासाठी शिमगोत्सवाची तयारी जय्यत व वेळेत केली होती. परंतु रोमटामेळ पथकांमुळे चित्ररथ मिरवणुकीला विलंब झाला. समितीने ठरवून दिलेल्या स्थळी संध्याकाळी पाच वाजता पथकांनी हजेरी लावली होती. परंतु रोमटामेळ पथकाच्या सादरीकरणाला उशिर झाल्याने शिमगोत्सव वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. रात्री अकरापर्यंत चित्ररथ मिरवणूक चालली.
पोलिसांकडून चोख व्यवस्था
पणजी शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असल्याने यंदा प्रथमच दरवर्षी होणाऱ्या 18 जून रस्त्याऐवजी शहरातील मुख्य रस्ता असलेल्या दयानंद बांदोडकर मार्गावर शिमगोत्सव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मुख्य रस्त्यांवरून वाहतूक बंद ठेवताना त्याला पर्याय म्हणून वाहतूक पोलिसांनी शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून वाहतूक वळवली होती. वाहतूक पोलिसांच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे वाहतूक कोंडीसारखी समस्या निर्माण झाली नाही. पार्किंग व्यवस्थाही उत्तम होती.