धुमाकूळ घातलेला हत्ती अद्याप सीमाहद्दीतच

महाराष्ट्र वन खात्याने गांभीर्य घेणे गरजेचे बेळगाव : मागील आठ-दहा दिवसांपासून सीमाहद्दीत धुमाकूळ घातलेल्या हत्तीचा वावर अद्याप सीमाहद्दीतच असल्याचे दिसत आहे. रविवारी कौलगे परिसरात हत्ती पुन्हा निदर्शनास पडला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व्यक्त होऊ लागली आहे. सैरभैर झालेल्या हत्तीला त्याच्या मूळ अधिवासात सोडून द्यावे, अशी मागणीही होत आहे. आजरा तालुक्यातील असलेला हा हत्ती सीमाहद्दीत […]

धुमाकूळ घातलेला हत्ती अद्याप सीमाहद्दीतच

महाराष्ट्र वन खात्याने गांभीर्य घेणे गरजेचे
बेळगाव : मागील आठ-दहा दिवसांपासून सीमाहद्दीत धुमाकूळ घातलेल्या हत्तीचा वावर अद्याप सीमाहद्दीतच असल्याचे दिसत आहे. रविवारी कौलगे परिसरात हत्ती पुन्हा निदर्शनास पडला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व्यक्त होऊ लागली आहे. सैरभैर झालेल्या हत्तीला त्याच्या मूळ अधिवासात सोडून द्यावे, अशी मागणीही होत आहे. आजरा तालुक्यातील असलेला हा हत्ती सीमाहद्दीत दाखल झाला आहे. शिवाय शुक्रवारी अलतगा, जाफरवाडी, कंग्राळी व बेकिनकेरे भागात मुक्तसंचार केला होता. विशेषत: बेकिनकेरे येथे धुमाकूळ घालून वाहनांचे नुकसान केले होते. दरम्यान वन खात्याने तत्परता दाखवत डोंगर परिसरात हत्तीला पिटाळून लावले होते. मात्र त्यानंतर पुन्हा हत्ती या भागातच फिरू लागला आहे. परिणामी शेतीपिकांचे नुकसान होऊ लागले आहे. आजरा वनक्षेत्रातील ‘चाळोबा गणेश’ नावाने या हत्तीची ओळख आहे. सैरभैर होऊन तो चंदगड तालुक्यातून बेळगाव परिसरात दाखल झाला आहे. सध्या सीमाहद्दीत सातत्याने निदर्शनास येत आहे. याबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक वन खाते गांभीर्य घेत नसल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र हद्दीतील असणाऱ्या हत्तीला महाराष्ट्र शासनाच्या वनखात्याने पकडणे गरजेचे आहे. या हत्तीला पकडून त्याच्या मूळ अधिवास असलेल्या वनक्षेत्रात सोडून द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आजरा वनक्षेत्रात नेण्यासाठी प्रयत्न सुरू
सीमाहद्दीत आलेला हत्ती सध्या कौलगे डोंगर परिसरात स्थिरावला आहे. हा मूळचा आजरा वनक्षेत्रातील आहे. त्याला आजऱ्याकडे नेण्यासाठी वाट मोकळी करून दिली जाणार आहे. आजरा वनक्षेत्रात नेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
– प्रशांत आवळे, वनक्षेत्रपाल-पाटणे