लवकरच वीजदरवाढीचा शॉक?

लवकरच वीजदरवाढीचा शॉक?

मार्चअखेरीस नवीन दर : आक्षेप नोंदविण्यासाठी हुबळीत बैठक
बेळगाव : राज्यात लवकरच वीजदरवाढ केली जाणार आहे. यासाठी वीजवितरण कंपन्यांनी कर्नाटक विद्युत नियामक मंडळाकडे (केईआरसी) दरवाढीचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटी नवीन दरवाढ लागू करण्याची तयारी विद्युत मंडळांकडून केली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांना वीजदरवाढीचा धक्का बसणार आहे. राज्य सरकारने घरगुती विद्युत ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज दिली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांचे थोडेफार विद्युत बिल येत आहे. परंतु, व्यावसायिक ग्राहकांच्या विद्युत बिलात मात्र मोठी वाढ करण्यात आली होती. या दरवाढीविरोधात बेळगावसह राज्यातील सर्वच चेंबर ऑफ कॉमर्सने आंदोलन केले होते. परंतु, त्याचे विशेष काही फलित दिसून आले नाही. केईआरसीकडून वीजखरेदीतील दराप्रमाणे वर्षातून एकदा किंवा दोनदा दरवाढ केली जाते. घरगुती व व्यावसायिक ग्राहकांसाठी स्वतंत्र पद्धतीने दरवाढ केली जाते. प्रत्येक वर्षी 1 एप्रिलपासून नवे विद्युत दर मागील काही वर्षांपासून लागू केले जात आहेत. काही वेळा निवडणूक आचारसंहितेमुळे दरवाढ पुढे ढकलली असली तरी दरवाढ होणार, हे निश्चित असते. यावर्षीही दरवाढ करण्यासाठी केईआरसीने प्रयत्न सुरू केले आहेत.
आक्षेप नोंदविण्यासाठी बुधवारी बैठक
कर्नाटक विद्युत नियामक मंडळ, बेंगळूर यांच्यावतीने विभागीय स्तरावर आक्षेप नोंदविले जात आहेत. हुबळी विभागाची बैठक बुधवार दि. 21 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता हुबळी येथील हेस्कॉमच्या कॉर्पोरेट कार्यालयात बैठक होणार आहे. यावेळी उद्योजक, व्यापारी तसेच नागरिकांनी आपले आक्षेप नोंदवावेत, असे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे.