देशाच्या अपमानाचा कलंक कारसेवकांनी पुसला!
प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांचे प्रतिपादन : गोव्यातील 680 कारसेवकांचा जाहीर सन्मान,जय श्रीरामच्या घोषाने सारा परिसर राममय
पणजी : श्रीराम मंदिरामुळे हिंदू जागृत झाले असून, देशाला लागलेला अपमानाचा कलंक कारसेवकांनी पुसला आहे. एक कारसेवा झाली, आता काशी मथुरा बाकी आहे. त्या कारसेवेसाठी तयार राहणे हे समस्त हिंदूंचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन भारत माता की जय संघटनेचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले. श्रीराम जन्मभूमी कारसेवक सन्मान समितीतर्फे गोव्यातील 680 कारसेवकांचा सन्मान करण्यासाठी कला अकादमीत काल रविवारी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. सुभाष वेलिंगकर बोलत होते. अयोध्येतील आचार्य, कारसेवक, जगद्गुरु आचार्य परमहंस महाराज, अयोध्येतील महंत नारायण दास महाराज, बजरंग दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश पाटील, सन्मान समितीचे अध्यक्ष गोविंद देव, संयोजक नितीन फळदेसाई, सहसंयोजक श्रीगणेश गावडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष परेश रायकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना वेलिंगकर म्हणाले, सांकवाळ येथे अवर लेडी ऑफ हेल्थ या चर्चच्या जागी श्रीविजयादुर्गा देवीचे मंदिर होते, पण पोर्तुगीजांनी अचानक वीज कोसळून ते एका रात्रीत नष्ट झाले असे सांगून तेथे चर्च उभारली आहे. पण आमच्या हिंदू बांधवांनी त्याला विरोध केला. त्याची दखल घेऊन सरकारने पुरातत्व विभागाला त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यांनी अहवाल तयार केला. तो आम्ही मिळवला आहे. त्यात वस्तुस्थिती मांडली गेली आहे. जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडून टाकण्याचे आदेशही सरकारने दिल्याचे ऐकिवात आहे. पण तेवढ्यावर थांबून चालणार नाही. सरकारने प्रत्यक्ष कृती करायला हवी. सरकार जर ते करत नसेल तर पुन्हा हिंदूंनी त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. त्या ठिकाणी पुन्हा देवीचे मंदिर झालेच पाहिजे, आणि त्यासाठी आम्हाला कुणीच रोखू शकत नाही. हिंदूंनी जन्म हिंदू म्हणून न राहता कर्म हिंदू म्हणून समाजात वावरावे, असे त्यांनी नमूद केले आहे.
काशी, मथुरा बाकी आहे…
अयोध्येत मंदिर उभारण्याच्या कामात कार सेवकांचे अथक प्रयत्न आहेत. ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांचे आक्रमण हे भारतीय संस्कृतीवर ग्रहण होते. हिंदू धर्म वैदिक काळापासून आहे. अयोध्या भारतात आहे आणि भारत ही भगवान श्रीरामाची भूमी आहे. आम्ही इतकी वर्षे मानवता धर्म जपला. सर्वधर्म समभाव जपला. आमच्या धर्मातील बालकसुद्धा विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करतो. अयोध्या झाली आता लवकरच काशी आणि मथुरा ताब्यात घेणे गरजेचे आहे, असे अयोध्येतील आचार्य, कारसेवक, जगद्गुरु आचार्य परमहंस महाराज यांनी नमूद केले आहे. यावेळी राज्यभरातील कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. त्यात पणजीतील 37 कारसेवकांचा सत्कार करण्यात आला, तिसवाडी 33, फोंडा 131, शिरोडा 13, सत्तरी 56, पर्वरी 31, बार्देश 67, डिचोली 54, सांखळी 21, पेडणे 48, दोडामार्ग 12, मुरगाव 28, मडगाव 15, कुंकळ्ळी 2, काणकोण 26, सांगे 80 तर केपे तालुक्मयातील 26 अशा एकूण 680 कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. यात 637 पुऊष, 43 महिला आणि 118 दिवंगत कारसेवकांचा समावेश होता. या कारसेवकांचा जगद्गुरु आचार्य परमहंस महाराज व नारायण दास महाराज यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
श्रीराम लढा ग्रंथाचे प्रकाशन
कारसेवकांचे अनुभव एकत्रित करून श्री विद्या प्रतिष्ठानतर्फे तयार केलेल्या ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक आमोणकर यांनी केले. संपूर्ण सभागृह जय राम श्री राम, भारत माता की जय, यासारख्या घोषणांनी दुमदुमले.
कारसेवकांचा, कार्यकर्त्यांचा विसर न पडो
अयोध्येत 1990, 1992 व 2002 अशी तीन वेळा कारसेवा झाली. या कारसेवेत राज्यातील कारसेवकांचा मोठा सहभाग घेतला होता. मनाचा निग्रह, मनोबल, इच्छाशक्ती असलेले कारसेवक तिकडे पोहोचले. त्यांनी सहन केलेल्या यातना शब्दात सांगणे कठिण आहे. पण त्यांच्या कार्यांचा विसर होऊ नये यासाठी हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यातून मोठ्या प्रमाणात कारसेवकांची यादी देखील तयार झाली आहे, याचा उपयोग सरकारला व आम्हाला होणार आहे, असे सुभाष वेलिंगकर म्हणाले.
देशातील, माणसांच्या मनातील कचरा साफ होणार
गोव्यात सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा करायला हवा. भाजपा सरकार आल्यापासून बरेच बदल झालेत. देशातील आणि माणसात असलेल्या वाईट प्रवृत्तींचा कचरा साफ होणारच आहे. देशात होणाऱ्या अश्लीलतेवर प्रतिबंध हवेत. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील घसरण चिंताजनक आहे. संस्कृतीयुक्त शिक्षणामुळे भारत सुखरूप राहिला आहे. मानवता रक्षणासाठी अमानवीय कृत्ये करणाऱ्यांना मारायचे आहे. सनातन धर्म अन्याय करणार नाही आणि होऊ देणार नाही हे लक्षात घ्यावे, असे आवाहन अयोध्येतील आचार्य, कारसेवक जगदगुरु आचार्य परमहंस महाराज यांनी यावेळी केले.
Home महत्वाची बातमी देशाच्या अपमानाचा कलंक कारसेवकांनी पुसला!
देशाच्या अपमानाचा कलंक कारसेवकांनी पुसला!
प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांचे प्रतिपादन : गोव्यातील 680 कारसेवकांचा जाहीर सन्मान,जय श्रीरामच्या घोषाने सारा परिसर राममय पणजी : श्रीराम मंदिरामुळे हिंदू जागृत झाले असून, देशाला लागलेला अपमानाचा कलंक कारसेवकांनी पुसला आहे. एक कारसेवा झाली, आता काशी मथुरा बाकी आहे. त्या कारसेवेसाठी तयार राहणे हे समस्त हिंदूंचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन भारत माता की जय […]