जिल्हा रुग्णालयातील आरओ प्लांट नादुरुस्त

जिल्हा रुग्णालयातील आरओ प्लांट नादुरुस्त

बिम्स् प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
बेळगाव : जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज 5 हजारांपेक्षा अधिक नागरिक जिल्हा रुग्णालयाला भेट देतात. या ठिकाणी येणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांसाठी उभारण्यात आलेला आरओ प्लांट गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त झाला असून यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे बिम्स् प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना शुद्ध पाण्याची सोय व्हावी यासाठी प्रसूती विभागासमोर आरओ प्लांट उभारण्यात आला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हा आरओ प्लांट नादुरुस्त झाला आहे. याची मोडतोडही झाली आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेला आरओ प्लांट नादुरुस्त झाल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.
निधी वाया गेल्याची चर्चा
यामुळे गोर-गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबरोबरच बिम्सकडून लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेला शुद्ध पाण्याचा आरओ प्लांट नादुरुस्त अवस्थेत असल्याने खर्च केलेला निधी वाया गेल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. बिम्स् प्रशासनाने रुग्णालयात अनेक अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.  मात्र शुद्ध पाण्याचा आरओ प्लांट बंद अवस्थेत असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.