बाजारपेठेत टोमॅटो, कांद्याचे दर चढेच…!
पणजी बाजारपेठेत पावसाळी भाज्या दाखल, हंगामी भाज्या पिकवण्यासाठी फलोत्पादन महामंडळाडून अनोखी योजना
पणजी : बदलते हवामान, अवकाळी पाऊस यांचा फटका शेतीला बसल्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले आहे. टोमॅटो सामान्यांपासून दुरावत असून 80 रुपये प्रतिकिलो दराने सध्या पणजी बाजारपेठेत विकला जात आहे. त्याचबरोबर गेल्या आठवड्यापासून कांदा अर्ध शतकावर स्थिरावला असून 50 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. पुढील काही दिवसांत टोमॅटो आणि कांदा दोन्हींचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भाज्यांचे दर वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
कर्नाटक, महाराष्ट्रात भाज्यांचे उत्पादन घटले आहे. परिणामी त्याचा फटका गोव्याला सहन करावा लागत आहे. गोव्यासह, महाराष्ट्र आणि कर्नाटकात मान्सून दाखल झालेला आहे. परंतु अद्याप पावसाने जोर धरला नसला तरी भाजीपाला उत्पन्नावर परिणाम झाला असून भाज्यांचे दर वाढलेले आहे. राज्यात कांदा, बटाटा, टोमॅटो यांसारख्या भाज्यांचे उत्पादन होत नाही. त्यामुळे त्यांच्या दरावर फलोत्पादन मंडळ नियंत्रण ठेऊ शकत नाही. त्यामुळे पावसामुळे या भाज्यांचे नुकसान झाल्यास दरवाढ राज्यात करावी लागते. परंतु ज्या भाज्या राज्यात पिकवल्या जातात त्यात भेंडी, चिटकीसह मिरची यांचे उत्पादन घेतले जाते. त्यांच्या दरावर नियंत्रण राज्य फलोत्पादन महामंडळातर्फे ठेवण्यात येते, असे फलोत्पादन मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात टोमॅटो 60 रुपये प्रतिकिलो दराने विकला होता. त्यात 20 रुपयांनी वाढ झाली असून सध्या 80 रु. प्रतिकिलो दराने विकला जात आहे. गेल्या आठवड्यात कोथिंबीर 50 रु. प्रति जुडी अशा दराने विकली जात होती. त्यात 10 रुपयांनी घट झाली असून 40 रु. प्रति जुडी अशा दराने विकली जात आहे. बटाटे गेल्या आठवड्यात 50 रु. प्रतिकिलो दराने विकले जात होते. त्यातदेखील 10 रुपयांनी घट झाली असून 40 रु. प्रतिकिलो दराने बटाटे विकले जात आहे. वालपापडी गेल्या आठवड्यात 160 रु. प्रतिकिलो दरान विकली जात होती. त्यात 20 रुपयांनी वाढ झाली असून 180 रु. प्रतिकिलो दराने विकली जात आहे.
ढबू आणि मिरची या दोन्ही भाज्या गेल्या आठवड्यात 120 रु. प्रतिकिलो दराने विकल्या जात होत्या. त्यात 20 रुपयांनी घट झाली असून 100 रु. प्रतिकिलो दराने दोन्ही भाज्या विकल्या जात आहेत. गाजर गेल्या आठवड्याप्रमाणे 80 रु. प्रतिकिलो आहे. भेंडी गेल्या आठवड्यात 100 रु. प्रतिकिलो दराने विकली जात होती. त्यात 20 रुपयांनी घट झाली असून 80 रु. प्रतिकिलो दराने विकली जात आहे. आले आणि लसूणाचे दर गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेले आहेत.
पणजी बाजारपेठेत पावसाळी भाज्यां दाखल…
पणजी बाजारपेठेत पावसाळी भाज्या दाखल झाल्या असून ग्राहकांकडून या भाज्या खरेदी केल्या जात आहे. यात अळूची पाने, तायकिळा, कुरडू, अळसांद्याची पाने या प्रामुख्यांने विक्रीस उपलब्ध आहे. अळूची पाने 30 रु. जुडी, तायकिळा 30 रु. जुडी, कुरडू 20 रु. जुडी तर अळसांद्याची भाजी 30 रुपयांना दोन जुडी अशा दरात उपलब्ध आहे. या हंगामी भाज्या असून अनेक गुणधर्मांनी उपयुक्त असतात. त्यामुळे ग्राहकांकडून अशा भाज्यांना मागणी वाढली आहे.
हंगामी भाज्या पिकवण्यासाठी फलोत्पादन महामंडळाडून योजना जाहीर…
तायकिळा, अळू, कुरडू यांसह विविध गावठी आणि हंगामी भाज्यांना पावसाळ्यात मोठी मागणी असते. ग्रामीण भागात या भाज्या सहज पिकत असतात.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या परिसरात पिकवल्या जाणाऱ्या या भाज्या फलोत्पादन मंडळाला आणून द्याव्यात. त्यांचा त्यांना योग्य मोबदला दिला जाईल. अशी अनोखी योजना राज्य फलोत्पादन महामंडळातर्फे जाहीर करण्यात आली आहे. या भाज्या राज्यभरातील फलोत्पादन महामंडळाच्या सर्व दालनांवर विक्रीस उपलब्ध असणार असून स्थानिक कष्टकरी शेतकऱ्यांना ही योजना फलदायी ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलोत्पादन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी बाजारपेठेत टोमॅटो, कांद्याचे दर चढेच…!
बाजारपेठेत टोमॅटो, कांद्याचे दर चढेच…!
पणजी बाजारपेठेत पावसाळी भाज्या दाखल, हंगामी भाज्या पिकवण्यासाठी फलोत्पादन महामंडळाडून अनोखी योजना पणजी : बदलते हवामान, अवकाळी पाऊस यांचा फटका शेतीला बसल्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले आहे. टोमॅटो सामान्यांपासून दुरावत असून 80 रुपये प्रतिकिलो दराने सध्या पणजी बाजारपेठेत विकला जात आहे. त्याचबरोबर गेल्या आठवड्यापासून कांदा अर्ध शतकावर स्थिरावला असून 50 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. पुढील काही दिवसांत टोमॅटो आणि कांदा दोन्हींचे दर आणखी […]