ज्याच्याशी जुळली गाठ, त्यानेच केला घात

ज्याच्याशी जुळली गाठ, त्यानेच केला घात

अल्पवयीन मुलीचा युवकाकडून शिरच्छेद : साखरपुडा लांबणीवर पडल्याच्या रागातून कृत्य
प्रतिनिधी/  बेंगळूर
साखरपुडा पुढे ढकलल्याच्या रागातून एका युवकाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा शिरच्छेद केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी रात्री घडली आहे. कोडगू जिल्ह्याच्या सोमवारपेठ तालुक्यातील सुर्लब्बी येथे ही घटना घडली आहे. प्रकाश (वय 32) असे आरोपीचे नाव आहे. प्रकाश याने स्वत:चा साखरपुडा निश्चित झालेल्या अल्पवयीन मुलीचा शिरच्छेद करून शिरासह पलायन केले. त्याने आत्महत्या केल्याची चर्चा असली तरी याविषयी स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आरोपीविरुद्ध हत्येप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
आरोपी प्रकाश याचा गुरुवारी 16 वर्षीय मुलीशी साखरपुडा होणार होता. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती मिळताच महिला आणि बालकल्याण अधिकाऱ्यांनी मुलीच्या घराला भेट दिली. तिच्या कुटुंबीयांची समजूत काढली. दोन्ही कुटुंबीयांनी मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रकाशसोबत विवाह करून देण्याचे मान्य केल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतले. यानंतर प्रकाशचे कुटुंबीय व नातेवाईक निघून गेले.
यामुळे संतप्त झालेल्या प्रकाशने सायंकाळी 5:30 वाजता मुलीच्या घरात शिरुन   तिच्या घरच्यांशी भांडण केले. नंतर शस्त्रास्त्रs दाखवून त्यांच्यावर हल्ला केला. साखरपुडा निश्चित झालेल्या मुलीला घरापासून 100 मीटर अंतरापर्यंत ओढत नेले. तिथेच शस्त्राने तिचे डोके धडावेगळे करून हत्या केली. मृतदेह तेथेच टाकून डोके घेऊन फरार झाला. मुलीचे धड ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून शीर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आरोपीची आत्महत्या?
16 वर्षीय मुलीची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या आरोपी प्रकाश याने आत्महत्या केल्याचे वृत्त पसरले आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. आरोपीचा मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आलेल्या परिसरात शोध घेतला जात आहे. मात्र, कोठेही मृतदेह सापडलेला नाही, अशी माहिती कोडगू जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी दिली.
दहावी निकालाच्या दिवशीच…
गुरुवारी दहावीचा निकाल जाहीर झाला होता. परीक्षेत मुलगी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती. शिवाय मुलीचा साखरपुडा होणार असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, ज्याच्याशी साखरपुडा निश्चित झाला होता, त्यानेच मुलीची निर्दयीपणे हत्या केली. त्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे भयभीत झालेल्या मुलीच्या पालकांना इस्पितळात दाखल करून उपचार केले जात आहेत.