एफएमसीजी उद्योग शहरापेक्षा ग्रामीणमध्ये तेजीत

एफएमसीजी उद्योग शहरापेक्षा ग्रामीणमध्ये तेजीत

जानेवारी ते मार्चमध्ये ग्राहकोपयोगी वस्तुंची मागणी वाढली: निलसेन आयक्युचा अहवाल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय एफएमसीजी (फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स) उद्योगाने 2024 च्या जानेवारी-मार्च कालावधीत राष्ट्रीय स्तरावर 6.5 टक्के वाढ नोंदवली आहे. यासह, पाच तिमाहीत प्रथमच, ग्रामीण वापराने शहरी मागणीला मागे टाकले आहे. निलसेनआयक्यूने एका अहवालात हे मूल्यांकन मांडले आहे. ग्राहकांशी संबंधित माहिती पुरवणाऱ्या एनआयक्यू या फर्मने दैनंदिन उपभोगाच्या उत्पादनांवरील  त्रैमासिक अहवालात म्हटले आहे की, अन्न आणि बिगर-खाद्य या दोन्ही क्षेत्रांनी खप वाढण्यास हातभार लावला, परंतु त्या तुलनेत गैरखाद्याचे प्रमाण अधिक होते. अन्न श्रेणीतील वाढ जवळजवळ दुप्पट होती.
देशांतर्गत एफएमसीजी उद्योगाचे मूल्य मार्च तिमाहीत 6.6 टक्क्यांनी वाढले  आहे. एफएमसीजी उद्योगाची वाढ जानेवारी-मार्च तिमाहीतील उपभोगाच्या ट्रेंडमुळे झाली आहे, ग्रामीण भागांनी पाच तिमाहीत प्रथमच शहरातील ग्राहकांच्या मागणीला मागे टाकले आहे, असे एनआयक्यू ग्राहक विभागाचे प्रमुख रुझवेल्ट डिसोझा म्हणाले.
डिसोझा म्हणाले की, विशेषत: बाजारात मागणी पाहिल्यास होम आणि पर्सनल केअर (एचपीसी) वस्तुंनी खाद्यवस्तुंना मागे टाकले आहे. खाद्य श्रेणींमध्ये अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत तर एचपीसी श्रेणीत मोठ्या पॅकेजड उत्पादनांना मागणी अधिक राहिली आहे. एनआयक्यूने म्हटले आहे की शहरस्तरावर आणि आधुनिक व्यवसायांमध्ये खप मंदावला आहे तर ग्रामीण आणि पारंपारिक व्यवसाय तेजीत आहेत.
मोठ्या कंपन्यांची कामगिरी
अहवालात असे म्हटले आहे की, अखिल भारतीय स्तरावर, अन्न आणि बिगर-खाद्य या दोन्ही क्षेत्रांनी उपभोगाच्या वाढीस हातभार लावला आहे, परंतु अन्नाच्या तुलनेत बिगर-खाद्यमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. एनआयक्यूने म्हटले आहे की एफएमसीजी उद्योगातील छोट्या कंपन्यांपेक्षा मोठ्या कंपन्या चांगली कामगिरी करत आहेत. तथापि, गेल्या दोन तिमाहीत मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत लहान कंपन्यांनी नॉन-खाद्य श्रेण्यांमध्ये जास्त वाढीचा दर पाहिला आहे.