महामेळाव्याच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली

महामेळाव्याच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली

प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक सरकारने येथील सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशन भरविले होते. त्याला विरोध म्हणून म. ए. समितीच्यावतीने लेले मैदान येथे महामेळावा भरविण्याचे ठरविण्यात आले. मात्र, पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे रस्त्यावरच मंडप घालून महामेळावा भरविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी म. ए. समितीच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी शनिवारी होती. मात्र, पुन्हा ती पुढे ढकलण्यात आली आहे.
म. ए. समितीच्यावतीने 2021 मध्ये महामेळावा भरविण्यात आला. मात्र रस्त्यावर मंडप घातला म्हणून टिळकवाडी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला. दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, शुभम शेळके, मालोजी अष्टेकर, आर. एम. चौगुले, मदन बामणे, श्रीकांत कदम, प्रकाश शिरोळकर, रणजित चव्हाण-पाटील यांच्यासह 31 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
येथील चौथे जेएमएफसी न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. शनिवारी दोषारोप निश्चित करण्यात येणार होते. मात्र काही कारणास्तव हा खटला पुढे ढकलण्यात आला. कार्यकर्त्यांच्यावतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. एम. बी. बोंद्रे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. वैभव कुट्रे हे काम पाहत आहेत.