खडकांमध्ये कोरण्यात आलेले ‘गुलाबाचे शहर’

खडकांमध्ये कोरण्यात आलेले ‘गुलाबाचे शहर’

1 हजाराहून अधिक थडगी, शतकांपर्यंत होते नजरेच्या आड
जगातील 7 आश्चर्यांपैकी एक पेट्रा जॉर्डनमधील सर्वात प्रसिद्ध पुरातत्व स्थळांपैकी एक आहे. या शहराला ‘हरवलेले शहर’ किंवा ‘गुलाब शहर’ म्हटले जाते. हे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असून याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या वारसास्थळांमध्येही सामील करण्यात आले आहे. खडकांमध्ये कोरण्यात आलेल्या या  शहराचा केवळ 15 टक्के हिस्सा जगाला ज्ञात आहे. हे प्रत्यक्षात थडग्यांचे शहर असल्याचे सांगण्यात येते.
पेट्राला जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक मानले जाते. या शहराची स्थापना ख्रिस्तपूर्व 321 झाली होती असे पुरातत्व तज्ञांचे मानणे आहे. पेट्रा पहिलया शतकाच्या आसपास समृध्द होऊ लागले होते. चौथ्या शतकात झालेल्या भूकंपाने पेट्राचे मोठे नुकसान घडविले होते. याला 1812 मध्ये स्वीस शोधकर्ते जोहान्स  बर्कहार्ट यांनी पुन्हा शोधले होते, तेव्हापासून याला द लॉस्ट सिटी या नावाने ओळखण्यात येते.
पेट्रा हे नाव मुख्यत्वे दगडाच्या रंगामुळे देण्यात आले आहे. या दगडातच हे शहर कोरण्यात आले आहे. शहराच्या अनेक संरचना सूर्यास्त आणि सुर्योदयावेळी एक सुंदर आणि गुलाबी रंग धारण करतात, याचमुळे याला गुलाब शहर असेही नाव मिळाले आहे.
पेट्रा नाव ‘पेट्रोस’द्वारेही मिळाले असून याचा ग्रीक भाषेतील अर्थ ‘खडक’ असा होतो. शहराला हे नाव बहुधा याच्या नक्षीदार बलुआ खडक आणि खडकांमधील संरचनामुळे देण्यात आले होते. पेट्रा 1985 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात सामील झाले आणि याला  युनेस्कोकडून मानवी सांस्कृतिक वारशामधील सर्वात मौल्यवान सांस्कृती संपत्तींपैकी एक घोषित करण्यात आले. पेट्राला 2007 मध्ये चीनची महान भिंत, क्राइस्ट रिडीमरचा पुतळा, कोलोसियम, माचू पिच्चू, ताजमहाल आणि चिचेन इट्जासोबत जगातील नव्या सात आश्चर्यांच्या यादीत सामील करण्यात आले होते.
पेट्राचा प्रसिद्ध खजिना प्रत्यक्षात एक मकबरा आहे. हा खजिना अल-खजनदेह नावानेही ओळखला जातो. पेट्रामध्ये हे सर्वात सुंदर ठिकाण आहे. याला प्रत्यक्षात नाबातियनने एक मकबरा आणि तळघर म्हणून निर्माण केले होते. नाबातियन लोक परलोकावर विश्वास ठेवायचे आणि स्वत:च्या मृतांची विशेष देखभाल करायचे. पेट्रामध्ये त्यांनी  1 हजाराहून अधिक थडगी निर्माण करविली होती.
पेट्राचे प्रवेशद्वार 1.2 किलोमीटरच्या अरुंद मार्गातून जाते, ज्याला सिक म्हटले जाते, याचा अर्थ खोरे असा होतो. पाऊस आणि वाऱ्यामुळे हे प्रवेशद्वार निर्माण झाले असून याच्या दोन्ही बाजूला उंच टेकड्या आहेत. पेट्राचा बायबलशी संबंध असल्याचे मानले जाते,
पेट्रा एकेकाळी उद्यानांनी वेढलेले होते आणि यात एक जटिल सिंचन प्रणाली होती. या प्रणालीतून निघणाऱ्या पाण्यातून भव्य फवारे आणि स्वीमिंग पूल चालविले जायचे. नाबातियन लोक सूर्य आणि त्याच्या प्रकाशाला महत्त्व द्यायचे आणि याला पवित्र मानायचे. पेट्रामध्ये निर्मित संरचनांचा अनेक सौर पॅटर्नसोबत ताळमेळ आढळून आला आहे, जेणेकरून सूर्यप्रकाश थेट उपलब्ध व्हावा अशीच संरचना आहे.
पेट्रा ग्रीसला दक्षिण आशियाशी जोडणारा एक प्रसिद्ध ऐतिहासिक व्यापारी मार्ग होता. हे एक खास व्यापारी केंद्र होते, जेथून चिनी रेशीम, भारतीय मसाले आणि अरबी धूप आफ्रिका, पश्चिम युरोप आणि मध्यपूर्वेपर्यंत पोहोचविले जायचे. पुरातत्वतज्ञ अद्याप पेट्राचा केवळ 15 टक्के हिस्साच शोधू शकले आहेत. उर्वरित हिस्सा भूमिगत आहे.