सुमीत नागल उपविजेता

सुमीत नागल उपविजेता

वृत्तसंस्था/ पेरुगिया (इटली)
रविवारी येथे झालेल्या पेरुगिया चॅलेंजर पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या टॉप सिडेड सुमीत नागलला एकेरीमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. इटलीच्या लुसियानो डेरडेरीने नागलचा सरळ सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. सोमवारी घोषित करण्यात आलेल्या एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सुमीत नागलने 71 वे स्थान मिळविले आहे. मानांकनातील नागलची ही सर्वोच्च कामगिरी आहे. त्याने आतापर्यंत 777 एटीपी गुण नोंदविले आहेत.
इटलीच्या डेरडेरीने 26 वर्षीय नागलचा अंतिम सामन्यात 6-1, 6-2 असा पराभव केला. हा अंतिम सामना 65 मिनिटे चालला होता. या स्पर्धेत नागलने स्पेनच्या मीरालेसचा पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली होती. सुमीत नागलने चालू वर्षाच्या प्रारंभी झालेल्या चेन्नई चॅलेंजर टेनिस स्पर्धा जिंकली होती तर ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत त्याने एकेरीची दुसरी फेरी गाठली होती.