‘नीट’मध्ये हेराफेरी करणाऱ्यांना सोडणार नाही!

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा इशारा : वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ‘नीट-युजी 2024’च्या निकालांमध्ये हेराफेरीच्या आरोपांदरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘एनटीए’वर निशाणा साधला आहे. ‘नीट’ प्रकरणात कोणीही चूक केली तर त्यांना सोडले जाणार नाही. मुलांच्या भविष्याशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी रविवारी दिला. याप्रसंगी शिक्षणमंत्र्यांनी ‘एनटीए’वरही नाराजी व्यक्त करत कोणी दोषी असेल तर […]

‘नीट’मध्ये हेराफेरी करणाऱ्यांना सोडणार नाही!

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा इशारा :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘नीट-युजी 2024’च्या निकालांमध्ये हेराफेरीच्या आरोपांदरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘एनटीए’वर निशाणा साधला आहे. ‘नीट’ प्रकरणात कोणीही चूक केली तर त्यांना सोडले जाणार नाही. मुलांच्या भविष्याशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी रविवारी दिला. याप्रसंगी शिक्षणमंत्र्यांनी ‘एनटीए’वरही नाराजी व्यक्त करत कोणी दोषी असेल तर त्याला सोडले जाणार नाही, असे सांगितले.
नीट-युजी परीक्षेतील हेराफेरीबाबत सध्या देशभरात निदर्शने होत आहेत. यावेळी परीक्षेला 24 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. अनेक गैरप्रकारांच्या आरोपांमुळे ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. हा मुद्दा आता न्यायालयापर्यंत पोहोचला असून अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. काही परीक्षार्थींनीही स्वतंत्र याचिका दाखल करत योग्य न्याय देण्याची मागणी केली आहे.
‘एनटीए’मध्ये खूप सुधारणांची गरज
‘एनटीए’च्या भूमिकेबाबतही आम्ही गंभीर असून सर्व मुद्दे निर्णायक टप्प्यावर नेऊ. या हेराफेरीमध्ये मोठे अधिकारी सहभागी असले तरी त्यांना सोडले जाणार नाही. कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही. त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, अशी अपेक्षा बाळगा असे सांगतानाच एनटीएमध्ये खूप सुधारणा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.
‘नीट’संदर्भात दोन प्रकारची अनियमितता समोर आली आहे. सुरुवातीला प्राथमिक माहितीमध्ये काही विद्यार्थ्यांना कमी वेळेमुळे ग्रेस मार्क्स देण्यात आल्याचे समजले जात होते. मात्र त्यात आणखीही बऱ्याच बाबी उघड झाल्या असून त्यात अनेक जणांचा सहभाग दिसून येत आहे. सध्या ‘एनटीए’च्या कारभारात अनियमितता समोर आल्या असून त्यांचा निपटारा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. सरकारने हे प्रकरण फार गांभीर्याने घेतल्याने यातून कोणीही सुटणार नाही असे आश्वासन मी विद्यार्थी आणि पालकांना देतो, असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
‘नीट-युजी’बाबत काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्यामुळे यंदा विक्रमी 67 उमेदवारांनी पूर्ण गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला आहे. सहा परीक्षा केंद्रांवर परीक्षांना उशीर झाल्यामुळे वाया गेलेल्या वेळेची भरपाई करण्यासाठी 1,500 हून अधिक विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस गुणांवर प्रŽचिन्ह निर्माण झाल्यामुळे परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.