‘बाझबॉल’ धोरणात बदल करणे आवश्यक

भारतातील दणदणीत पराभवानंतर इंग्लंड प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलमची कबुली वृत्तसंस्था/ धरमशाला इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलम यांनी कबूल केले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेदरम्यान भारताने त्यांच्या कमकुवत दुव्यांचा पर्दाफाश केल्यानंतर आणि पाहुण्यांना नमते घेण्यास भाग पाडल्यानंतर संघाच्या बहुचर्चित ‘बाझबॉल’ दृष्टिकोनात काही बदल करणे आवश्यक झालेले आहे. इंग्लंडने हैदराबादमध्ये रोमहर्षक विजयासह सुऊवात केली होती. परंतु भारताने […]

‘बाझबॉल’ धोरणात बदल करणे आवश्यक

भारतातील दणदणीत पराभवानंतर इंग्लंड प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलमची कबुली
वृत्तसंस्था/ धरमशाला
इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलम यांनी कबूल केले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेदरम्यान भारताने त्यांच्या कमकुवत दुव्यांचा पर्दाफाश केल्यानंतर आणि पाहुण्यांना नमते घेण्यास भाग पाडल्यानंतर संघाच्या बहुचर्चित ‘बाझबॉल’ दृष्टिकोनात काही बदल करणे आवश्यक झालेले आहे.
इंग्लंडने हैदराबादमध्ये रोमहर्षक विजयासह सुऊवात केली होती. परंतु भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा विजय मिळविताना अप्रतिमरीत्या पुनरागमन केल्याने तेथून पाहुण्यांसाठी सारे फासे उलटे पडले. ‘कधी कधी तुम्हाला गोष्टी चालून जाऊ शकतात. मात्र ज्या प्रकारे या मालिकेत घडले त्या पद्धतीने जेव्हा तुमचे कच्चे दुवे उघडे पाडले जातात तेव्हा आम्ही ज्यावर विश्वास ठेवतो त्यावर पक्के राहण्यासाठी सखोल विचार आणि काही बदल करणे आवश्यक ठरते, असे मॅकलमने रविवारी ब्रिटिश पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काही असले तरी, मालिका जसजशी पुढे सरकत गेली तसतसे आम्ही अधिकच नमते घेत गेलो आणि भारतीय सघाने आमच्यावर टाकलेला दबाव हे त्यास कारण ठरले. केवळ गोलंदाजीतच नव्हे, तर भारतीय संघाकडून फलंदाजीतही आमच्यावर प्रचंड दबाव टाकला गेला, असे मॅकलमने म्हटले आहे. मालिका जिंकण्यात भारतीय युवा खेळाडूंनीही महत्त्वाची भूमिका बजावली. विराट कोहली, मोहम्मद शमी आणि के. एल. राहुलसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान या खेळाडूंनी चांगल्या प्रकारे जबाबदारी पेलली.
‘बाझबॉल’ युगातील इंग्लंडचा हा पहिला मालिका पराभव असून बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाला आता तीन मालिकांमध्ये विजय मिळविता आलेली नाही आणि त्यामुळे समीक्षकांनी संघाच्या आक्रमक धोरणावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ‘अशा काही गोष्टी असतात जिथे तुम्हाला तुमच्या बाजूने थोडी जरी नशिबाची साथ मिळाली, तरी तुम्ही बऱ्याच कच्च्या दुव्यांवर पडदा टाकू शकता. मात्र येथे जे घडले त्या प्रकारे जेव्हा कच्चे दुवे उघडे पडतात तेव्हा काही क्षेत्रांत अधिक चांगले बनण्याची गरज आहे याची जाणीव होते’, असे मॅकलमने म्हटले आहे.