तैवानमध्ये 25 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप

7.7 रिश्टर स्केल तीव्रता : 9 ठार, 700 जखमी वृत्तसंस्था/ तैपेई तैवानच्या उत्तरेकडील किनारपट्टीला बुधवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला असून त्यात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ख्वालियनमध्ये 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. ख्वालियन हे शहर भूकंपाच्या केंद्रापासून जवळ होते. हा भूकंप गेल्या 25 वर्षांतील बेटावर आलेला सर्वात […]

तैवानमध्ये 25 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप

7.7 रिश्टर स्केल तीव्रता : 9 ठार, 700 जखमी
वृत्तसंस्था/ तैपेई
तैवानच्या उत्तरेकडील किनारपट्टीला बुधवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला असून त्यात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ख्वालियनमध्ये 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. ख्वालियन हे शहर भूकंपाच्या केंद्रापासून जवळ होते. हा भूकंप गेल्या 25 वर्षांतील बेटावर आलेला सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे बोलले जात आहे. तैवानमधील पर्वतीय भाग भूकंपाच्या तडाख्याने हादरला आहे. राजधानी तैपेईमध्ये इमारती हादरल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत.
तैवानमध्ये बुधवारी सकाळी जाणवलेल्या भूकंपामुळे शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. दक्षिण जपान आणि फिलिपाईन्ससाठी सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपामुळे फोन नेटवर्कही पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेकांचा संपर्क तुटला आहे. तैवानमधील भूकंपानंतरची काही छायाचित्रे समोर आली आहेत. भूकंप किती तीव्र झाला असावा हे या चित्रांवरून स्पष्टपणे दिसून येते. ‘भूकंप जमिनीच्या अगदी जवळ होता. संपूर्ण तैवान आणि शेजारच्या बेटांवर तो जाणवला. गेल्या 25 वर्षांतील हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे,’ असे तैपेई सिस्मॉलॉजिकल सेंटरचे संचालक वू चिन फू यांनी सांगितले.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
भूकंपानंतर मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. सुरुवातीला मृतांची संख्या नऊ इतकी जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर जखमींची संख्या 700 हून अधिक झाली आहे. जखमींचा आकडा मोठा असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. प्राधिकरणाने भूकंपाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तातडीने पावले उचलली. काही भागात काही तास वीजपुरवठा खंडित झाला होता. मेट्रो, हायस्पीड टेन पुन्हा सुरू झाल्या आहेत.
हुलिन आणि तैपेई सारख्या ठिकाणांहून येणारी चित्रे भीतीदायक आहेत. काही इमारतींची पडझड झालेली दिसत असून मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पूर्व तैवानला भूकंपाचा धक्का बसल्यानंतर न्यू तैपेई शहरातील एका खराब झालेल्या इमारतीत अडकलेल्या एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. आपत्कालीन कर्मचारी कोसळलेल्या इमारतींमध्ये वाचलेल्यांचा शोध घेत आहेत.