भजन कौरचे पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट आरक्षित

भजन कौरचे पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट आरक्षित

वृत्तसंस्था/ अँटेलिया
जुलै महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताची महिला तिरंदाजपटू भजन कौरने आपले तिकीट आरक्षित केले आहे. अँटेलियान सुरु असलेल्या ऑलिम्पिक पात्रतेसाठीच्या तिरंदाजी स्पर्धेत भारताची महिला तिरंदाजपटू भजन कौरने रविवारी वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकाविले.
भजन कौरने या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली. पॅरिस ऑलिम्पिक पूर्वीची ही अंतिम विश्व कोटा तिरंदाजी स्पर्धा आहे. महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारातील अंतिम लढतीत भजन कौरने इराणच्या मोबीना फल्लाचा 6-2 असा पराभव करुन सुवर्णपदकाला गवसणी घातली. भजन कौरने तिसऱ्या फेरीच्या लढतीत मंगोलियाच्या बिशेनडीचा 6-1 तर चौथ्या फेरीत स्लोव्हेनियाच्या कॅव्हिकचा 7-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भजन कौरने पोलंडच्या मिझॉरचा 6-0 असा एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य फेरीत भजन कौरने माल्डोव्हाच्या मिरकाचा 6-2 असा फडशा पाडत अंतिम फेरीत स्थान मिळविले.
भारताची आणखी एक महिला तिरंदाजपटू अंकिता भक्तने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. पण उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इराणच्या मोबीना फल्लाने तिचा 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताच्या दीपिका कुमारीचे वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारातील आव्हान तिसऱ्या फेरीत समाप्त झाले. अझरबेजानच्या रेमाझेनेव्हाने दीपिका कुमारीचा 6-4 असा पराभव केला. अँटेलियातील या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला रिकर्व्ह संघांना कोटा पद्धतीनुसार ऑलिम्पिकसाठी थेट प्रवेश मिळविता आला नाही.