‘सुपर किलर’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

‘रुद्रम-2’ करणार हायपरसोनिक वेगाने शत्रूचा नाश : अवघ्या काही सेकंदात लक्ष्यभेद वृत्तसंस्था /भुवनेश्वर डीआरडीओने बुधवारी सकाळी 11.30 वाजता ओडिशाच्या किनाऱ्यावर भारतीय वायुदलाच्या सुखोई-30 एमकेआय या लढाऊ विमानातून रुद्रम-2 हे हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. लढाऊ विमानातून डागण्यात आलेल्या रुद्रम-2 या क्षेपणास्त्राने हायपरसोनिक वेगाने काही सेकंदात लक्ष्याचा भेद केला आहे. हे क्षेपणास्त्र […]

‘सुपर किलर’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

‘रुद्रम-2’ करणार हायपरसोनिक वेगाने शत्रूचा नाश : अवघ्या काही सेकंदात लक्ष्यभेद
वृत्तसंस्था /भुवनेश्वर
डीआरडीओने बुधवारी सकाळी 11.30 वाजता ओडिशाच्या किनाऱ्यावर भारतीय वायुदलाच्या सुखोई-30 एमकेआय या लढाऊ विमानातून रुद्रम-2 हे हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. लढाऊ विमानातून डागण्यात आलेल्या रुद्रम-2 या क्षेपणास्त्राने हायपरसोनिक वेगाने काही सेकंदात लक्ष्याचा भेद केला आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूचे कुठलेही अस्त्र, बंकर, विमान, युद्धनौका, आयुध डेपो नष्ट करू शकते. रुद्रम-2 हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र 6791.4 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहे. हे एक अँटी-रेडिएशन क्षेपणास्त्र असून ते रडार सिस्टीम, उपग्रह, हवाई सुरक्षा यंत्रणा, रेडिओ फ्रिक्वेंसी सिस्टीम किंवा अन्य कुठल्याही संचार सिस्टीमकडून ट्रॅक केले जाऊ शकत नाही. रुद्रम-2ला भारताचे नवे सुपर किलर क्षेपणास्त्र संबोधले जात आहे.
लक्ष्य भेदण्याची अचूक क्षमता
रुद्रम-2 क्षेपणास्त्राची एकूण लांबी 18 फूट असून ते 155 किलोग्रॅमच्या भारासह उ•ाण करू शकते. यात प्री-फ्रॅगमेंटेड वॉरहेड लावले जाते. याचा वेग अत्यंत धोकादायक आहे. हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपट अधिक वेगाने लक्ष्याला गाठू शकते. यात आयएनएस आणि सॅटनैव गायडेन्स सिस्टीम लावण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राचा मारक पल्ला 300 किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र 5 मीटरच्या अचूकतेसह मारा करू शकते. म्हणजेच हे क्षेपणास्त्र लक्ष्यापासून 5 मीटर अंतरावर कोसळले तरीही लक्ष्य उद्ध्वस्त करते.
डीआरडीओकडून निर्मिती
रुद्रम-2 एअर-टू-सरफेस क्षेपणास्त्राला डीआरडीओने डिझाइन केले आहे. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि अदानी डिफेन्स अँड एअरोस्पेसने मिळून ते निर्माण केले आहे.
लढाऊ विमानांमध्ये तैनात
तेजस लढाऊ विमान, एएमसीए आणि टेडबीएफ लढाऊ विमानात हे क्षेपणास्त्र जोडण्याची भारतीय वायुदलाची योजना आहे. सध्या हे क्षेपणास्त्र मिग-29, मिराज, जग्वार आणि सुखोई विमानांमध्ये तैनात करण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राचा मुख्य उद्देशच शत्रूच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला नष्ट करणे आहे.