मतमोजणीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी

उद्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासह ओळखपत्रांचे होणार वितरण प्रतिनिधी/ बेळगाव आता लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे वेध लागले आहेत. मंगळवार दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघांतील मतदान यंत्रे आरपीडी महाविद्यालयाच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली […]

मतमोजणीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी

उद्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासह ओळखपत्रांचे होणार वितरण
प्रतिनिधी/ बेळगाव
आता लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे वेध लागले आहेत. मंगळवार दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघांतील मतदान यंत्रे आरपीडी महाविद्यालयाच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली आहेत. आठ विधानसभा मतदारसंघांतील मतदान यंत्रांसाठी सोळा स्ट्राँगरूम निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यासाठी तितक्याच प्रमाणात कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.
मतमोजणीसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ सज्ज असून दोन टप्प्यांमध्ये मतदान यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सोमवार दि. 3 रोजी शेवटचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सर्व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. यापूर्वी प्रशिक्षण दिलेल्या कर्मचाऱ्यांनाही यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक असणारी साधनसामग्री निवडणूक विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली असून मतमोजणीसाठी नेमणूक केलेल्यांना ओळखपत्र वितरित केले जाणार आहे.
सोमवारी होणाऱ्या प्रशिक्षणादरम्यान ओळखपत्र वितरण करून मंगळवार दि. 4 रोजी सकाळी 6 वाजता मतमोजणी केंद्रावर सदर कर्मचाऱ्यांना हजर राहण्याची सूचना केली जाणार आहे. याबरोबरच राजकीय पक्ष व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्ट्राँगरूम उघडली जाईल व त्यानंतर मोजणीला सुरुवात होईल, असे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले.