श्रीलंकेचा बांगलादेशला क्लीनस्वीप

श्रीलंकेचा बांगलादेशला क्लीनस्वीप

दुसऱ्या कसोटीत 192 धावांनी दणदणीत विजय : मालिकेत 2-0 ने यश : कमिंदू मेंडिसला सामनावीर व मालिकावीर पुरस्कार
वृत्तसंस्था/ चित्तगाव
येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेने बांगलादेशचा 192 धावांनी पराभव केला. बुधवारी चित्तगाव येथील मैदानावर झालेल्या सामन्याच्या पाचव्या दिवशी बांगलादेशचा संघ श्रीलंकेने दिलेल्या 511 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करु शकला नाही आणि 318 धावांत सर्वबाद झाला. या विजयासह श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. दरम्यान, श्रीलंकेने पहिला सामना 328 धावांनी जिंकला होता. 25 वर्षीय अष्टपैलू कमिंडू मेंडिस श्रीलंकेचा सामनावीर व मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. विशेष म्हणजे, घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बांगलादेशला दोन्ही कसोटी प्रभावी कामगिरी करता आली नाही व त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
प्रारंभी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व  पहिल्या डावात 531 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला पहिल्या डावात केवळ 178 धावा करता आल्या. लंकन संघाला पहिल्या डावात 353 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. यानंतर श्रीलंकेने आपला दुसरा डाव 7 बाद 157 धावांवर घोषित केला आणि बांगलादेशला 511 धावांचे लक्ष्य दिले.
विजयी आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने चौथ्या दिवशी 7 गडी गमावत 268 धावापर्यंत मजल मारली होती. पाचव्या दिवशी या धावसंख्येवरुन त्यांनी पुढे खेळायला सुरुवात केली पण अवघ्या 50 धावांची भर घातल्यानंतर त्यांचा दुसरा डाव 85 षटकांत 318 धावांवर संपला. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात मेहंदी हसन मिराजने सर्वाधिक नाबाद 81 धावा केल्या. याशिवाय, मोमिनल हक 50, शकीब अल हसन 36, लिटॉन दासने 38 धावांचे योगदान दिले. इतर खेळाडूंनी मात्र सपशेल निराशा केल्याने बांगलादेशला दुसऱ्या कसोटीत तब्बल 192 धावांनी हार पत्कारावी लागली. श्रीलंकेकडून वेगवान गोलंदाज लाहिरु कुमाराने 4 बळी घेतले. तर कमिंदू मेंडिसने 3 बळी घेतले. प्रभात जयसूर्याने 2 आणि विश्वा फर्नांडोने 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका पहिला डाव 531 व दुसरा डाव 7/157 घोषित
बांगलादेश पहिला डाव 178 व दुसरा डाव 85 षटकांत सर्वबाद 318 (मेहंदी हसन मिराज नाबाद 81, मोमीनल हक 50, शकीब अल हसन 36, लिटन दास 38, लहिरु कुमारा 50 धावांत 4 बळी, कमिंदू मेंडिस 32 धावांत 3 बळी).
  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत श्रीलंकेची चौथ्या स्थानी झेप
बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका एकतर्फी जिंकल्यानंतर श्रीलंकन संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. याआधी लंकन संघ सहाव्या स्थानी विराजमान होता. पण, या मालिकेत एकतर्फी यश मिळवल्यानंतर त्यांना दोन स्थानाचा फायदा झाला आहे. भारतीय संघ अव्वलस्थानी असून ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे.