जि. पं. सभागृहाला अत्याधुनिक टच

नव्या सभागृहामध्ये विविध सुविधा : एसी, प्रोजेक्टर, टेबल माईकची सोय : 90 टक्के काम पूर्ण बेळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा पंचायत सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून जिल्हा पंचायत सभागृहाला अत्याधुनिक सभागृहाचा टच देण्यात आला आहे. एसी, साऊंड सिस्टीम, प्रोजेक्टर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 90 टक्के काम पूर्ण झाले असून […]

जि. पं. सभागृहाला अत्याधुनिक टच

नव्या सभागृहामध्ये विविध सुविधा : एसी, प्रोजेक्टर, टेबल माईकची सोय : 90 टक्के काम पूर्ण
बेळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा पंचायत सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून जिल्हा पंचायत सभागृहाला अत्याधुनिक सभागृहाचा टच देण्यात आला आहे. एसी, साऊंड सिस्टीम, प्रोजेक्टर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करून सभागृह बैठकींसाठी खुले केले जाणार आहे. जिल्हा पंचायत कार्यालयात असणाऱ्या प्रशस्त सभागृहामध्ये जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकी घेण्यास अत्यंत सोयीचे ठिकाण आहे. या सभागृहात जिल्हाधिकारी, प्रादेशिक आयुक्त, खासदारांची विकास आढावा बैठक यासह जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठकींचे आयोजन केले जाते. तर जिल्हा पंचायतीच्या सर्वसाधारण सभा याच सभागृहात घेतल्या जातात. त्यामुळे हे सभागृह सोयीचे ठिकाण बनले आहे. सभागृहाच्या छताला गळती लागल्याने ठिकठिकाणी छताला छिद्रे पडली होती. सभागृहातील माईक व्यवस्थाही कोलमडली होती. त्यामुळे दोन महिन्यांपासून सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांच्या सभा व बैठका जुन्या जिल्हा पंचायत कार्यालयातील सभागृहात घेतल्या जात आहेत. बहुतांश बैठकी जिल्हाधिकारी कार्यालयामध्येही घेतल्या जात होत्या. सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले आहे. नव्या सभागृहामध्ये अत्याधुनिक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. जुने फॅन काढून त्याठिकाणी एसी, विद्युत योजना, साऊंड सिस्टीम, प्रोजेक्टर बसविण्यात आला आहे. तसेच प्रत्येक आसनावर माईक बसविण्याचे काम सुरू आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण करून सभागृह बैठकींसाठी उपलब्ध करून दिले जाईल, असे जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.