भंडाऱ्याच्या उधळणीत श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा

काकती येथील यात्रेत ‘विठ्ठल-बिरोबाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष : भाविकांची अमाप गर्दी वार्ताहर /काकती धनगरी ढोल, कैताळाचा गगनाला भिडलेला निनाद, भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि विठ्ठल बिरोबाच्या नावानं चांगभलंचा गजर करीत विठ्ठल-बिरोबाची दोन दिवस चाललेल्या यात्रेचा सांगता सोमवारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. काकती येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेची सुरुवात […]

भंडाऱ्याच्या उधळणीत श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा

काकती येथील यात्रेत ‘विठ्ठल-बिरोबाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष : भाविकांची अमाप गर्दी
वार्ताहर /काकती
धनगरी ढोल, कैताळाचा गगनाला भिडलेला निनाद, भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि विठ्ठल बिरोबाच्या नावानं चांगभलंचा गजर करीत विठ्ठल-बिरोबाची दोन दिवस चाललेल्या यात्रेचा सांगता सोमवारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. काकती येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेची सुरुवात भावकाई गल्ली येथील देवस्थानात झाली. यावेळी रविवार दि. 12 रोजी सकाळी देवाला अभिषेक घालण्यात आला. विधीवत परंपरेनुसार दिवसभर धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर बहरून गेले होते. रात्री 10 वाजल्यापासून काकती, मुतगा, पिरनवाडी, कडोली येथील धनगरी ओव्यातील गाण्यात सहभागी होऊन भाविकांची मने जिंकली. सोमवार दि. 9 रोजी सकाळपासून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. दुपारी 12 च्या दरम्यान विठ्ठल-बिरदेवाची पालखी सिध्देश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यास तब्बल एक तास लागला. दरम्यान सिध्देश्वर देवाची भेट घेतली. भंडारा व नैवेद्य अर्पण करण्यात आला.
भंडाऱ्याच्या उधळणीने रस्त्यावर सडा
गावातील सर्व गल्लीतून सुवासिनींनी मनोभावे आरती ओवाळून औक्षण केले. जात, भाषा, धर्म, पंथ बाजूला ठेवून पंचक्रोशीतील भाविक सोहळ्यात सहभागी होऊन भंडाऱ्याची उधळण करत ‘विठ्ठल-बिरोबाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करीत होते. यावेळी मोठ्या भक्तिभावाने उधळलेल्या भंडाऱ्याने पिवळ्या रंगाचा सडा गल्ली-रस्त्यातून पडला होता.
पालखी सोहळा-महाप्रसाद
देवस्थानच्या ठिकाणी ढोल-कैताळाचा एक लयीतील जागराला नवं उधाणं आले होते. हा क्षण पाहताना सारे विसरून विठोबाच्या भक्तीत तल्लीन झाले होते. देवस्थानच्या ठिकाणी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा पार पडला. सायंकाळपासून सुरू झालेल्या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी रात्री उशीरापर्यंत घेतला. ग्रा. पं. अध्यक्षा वर्षा मुचंडीकर, देवस्थान पंच आदींनीही देवाचे दर्शन घेऊन महाप्रसादाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.