कळंबे तर्फ ठाणे गावचे श्रद्धास्थान श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या यात्रेला ऐतिहासिक महत्व
कळंबे तर्फ ठाणेचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या यात्रेला बुधवार 8 मे पासून सुरूवात झाली. आज 14 मे रोजी या यात्रेची सांगता होत आहे. या यात्रेचे हे सतरावे वर्ष आहे. आज मंगळवार 14 रोजी होणाऱ्या महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त…
कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) गावचे ग्रामदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे. येथील अंबाबाई मंदिराला सुमारे 121 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. सुरुवातीला कौलारु, दगड, मातीचे साधे मंदिर उभारले. त्यानंतर या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार करत 14 मे 2007 रोजी भव्य व प्रशस्त मंदिर उभारण्यात आले. त्यांनतर देवीच्या यात्रा उत्सवास प्रारंभ करण्यात आला. या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचा होमहवन व महाप्रसाद होत आहे.
करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ ठाणे येथील ग्रामदैवत महालक्ष्मी अंबाबाई देवीसंदर्भात अनेक ग्रंथांत संदर्भ सापडतात. त्यापैकी श्री महालक्ष्मी देवीच्या करवीर महात्म्य ग्रंथात पौराणिक कथेची नोंद आहे. त्यामध्ये कळंबेश्वरी देवी कोल्हासुराची पत्नी असल्याचे सांगितले जाते. कळंबेश्वरी व कोल्हासूर यांनी करवीर निवासिनी महालक्ष्मीची तपश्चर्या केल्यावर श्री महालक्ष्मीने प्रसन्न होऊन या पती-पत्नींना वरदान मागण्यास सांगितले.
कोल्हासूर आणि कळंबेश्वरी यांनी करवीर देशाचे निष्कलंक राज्य करण्यास मिळावे (आताचे कोल्हापूर) असा वर महालक्ष्मी अंबाबाई देवीकडे मागितला अन् तसे महालक्ष्मीनेही या दांपत्याला वरदान दिले; पण कोल्हासुराच्या दोन पुत्रांनी देवदेवतांवर हल्ला करून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केल्याने श्री महालक्ष्मीने कोल्हासुराच्या या दोन्ही पुत्रांचा वध केला. कोल्हासुराला आपल्या पुत्रांचा झालेला वध सहन झाला नाही. त्याने याच रागातून महालक्ष्मीबरोबर अन्य देवदेवतांवर आक्रमण केले. यावेळी झालेल्या तुंबळ लढाईमध्ये कोल्हासुराचा वध झाला; पण याही परिस्थितीत शिवभक्त असणाऱ्या कळंबेश्वरीचे देवता म्हणून स्थान अबाधित राहिले.
कालांतराने कळंबेश्वरी देवीला लक्ष्मीचे एक रूप मानले जाऊ लागले. सुमारे 18 हजार लोकसंख्या असणाऱ्या कोल्हापूर शहरापासून अगदी जवळच असलेले संस्थानकालीन गाव म्हणून कळंबे तर्फ ठाणे कळंबा (तलाव) ओळखले जाते. अंदाजे सुमारे 120 वर्षांपूर्वी कळंबेश्वरी देवीची स्थापना केल्याचे जाणकारांतून सांगितले जाते. पूर्वी कळंबा हे गाव सध्या असणाऱ्या कळंबा तलावाच्या जागेवर वसाहती स्वरूपात वसले होते. येथे त्यावेळी छोटे जलाशय होते. या जलाशयाच्या तीरावर कळंबेश्वरी देवीचे छोटे मंदिर होते. ते आजही आहे. या जलाशयाचे मोठ्या तलावात रूपांतर झाले. त्याची ओळख कळंबा तलाव अशी बनली. त्यानंतर येथून ही वसाहत स्थलांतरीत करून आताचे वसलेले गाव कळंबे तर्फ ठाणे (कळंबा) हे कळंबेश्वरी देवीच्या नावाने कळंबा गाव म्हणून प्रसिद्ध झाले. या गावच्या मध्य ठिकाणी कळंबेश्वरी देवीचे श्री महालक्ष्मी अंबाबाई या नावाने मोठे मंदिर आहे. मंदिरातील देवीची मूर्ती चर्तुभूज असून उभी आहे. देवीच्या उजव्या हातात गदा तर डाव्या हातात अमृतपात्र आहे. देवीची मूर्ती उत्तराभिमुखी आहे. मूर्तीचे सिंह वाहन असून मूर्तीचे वज्रलेपाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
वज्रलेपानंतर मूर्तीचे देखणे स्वरूप असून, 15 हजार चौरस मीटरमध्ये मंदिर परिसरात सात हजार चौरस मीटर मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मुख्य गाभारा, भव्य मंडप, प्रवेशद्वारावर जय-विजय यांच्या देखण्या मूर्ती आहेत. मुख्य दरवाजाजवळ दोन सिंहांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या आहेत. मंदिरात महालक्ष्मीच्या मूर्तीबरोबर विठ्ठल-रखुमाई, गणपती व शिवलिंग रूपात महादेव आहे. तर मंदिर परिसरात पश्चिम बाजूला वटवृक्षाखाली नृसिंहाची मूर्ती आहे.
पूर्वी हे मंदिर कौलारू मातीच्या भितीमध्ये बांधले होते. त्यानंतर दगडी भिंतीमध्ये पुन्हा बांधकाम करून 2003 पासून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली. गाववर्गणी, देणगीदार ग्रामस्थांच्या पुढाकाराने भव्य अशा या मंदिराचे काम 14 मे 2007 मध्ये पूर्ण झाले. तेव्हापासून या मंदिरामध्ये प्रतिवर्षी 14 मे रोजी होमहवन व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. थोडक्यात कळंबे तर्फ ठाणे गावची ही वार्षिक यात्रा म्हणून गेली 16 वर्षे कळंबावासीय करत आले आहेत. यंदा या यात्रेचे 17 वे वर्ष आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस झाला असून मंगळवारी, 14 रोजी यात्रेची सांगता होत आहे.
मंदिरातील पूजेचा मान गुरव समाजाकडे आहे. मंदिरात रोज सकाळी 7 वाजता व संध्याकाळी 7.45 वाजता आरती केली जाते. तसेच प्रत्येक अमावस्येला पालखी सोहळा व प्रसाद आयोजित केला जात असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
संकलन : सागर पाटील, कळंबा
Home महत्वाची बातमी कळंबे तर्फ ठाणे गावचे श्रद्धास्थान श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या यात्रेला ऐतिहासिक महत्व
कळंबे तर्फ ठाणे गावचे श्रद्धास्थान श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या यात्रेला ऐतिहासिक महत्व
कळंबे तर्फ ठाणेचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या यात्रेला बुधवार 8 मे पासून सुरूवात झाली. आज 14 मे रोजी या यात्रेची सांगता होत आहे. या यात्रेचे हे सतरावे वर्ष आहे. आज मंगळवार 14 रोजी होणाऱ्या महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त… कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) गावचे ग्रामदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीला ऐतिहासिक […]