70 टक्के परीक्षा झाल्या कॉपीमुक्त; शिक्षक, कर्मचाऱ्यांना पेपरफुटीची धास्ती

शिवाजी विद्यापीठातील परीक्षा प्रमाद समितीचा पारदर्शी कारभार; पेपर फुटीच्या प्रकरणात बडतर्फ होण्याची भीती कायम अहिल्या परकाळे कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातील परीक्षा पारदर्शी व्हाव्या म्हणून परीक्षा विभागाने महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी तीन जिल्ह्यासाठी तीन बैठ्या पथकांची नियुक्ती केली आहे. अतिसंवेदनशील परिसरातील महाविद्यालयांवर करडी नजर ठेवली जात आहे. गतवर्षी दोन महाविद्यालयात पेपरफुटीचा प्रकार घडल्यानंतर परीक्षा […]

70 टक्के परीक्षा झाल्या कॉपीमुक्त; शिक्षक, कर्मचाऱ्यांना पेपरफुटीची धास्ती

शिवाजी विद्यापीठातील परीक्षा प्रमाद समितीचा पारदर्शी कारभार; पेपर फुटीच्या प्रकरणात बडतर्फ होण्याची भीती कायम
अहिल्या परकाळे कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठातील परीक्षा पारदर्शी व्हाव्या म्हणून परीक्षा विभागाने महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी तीन जिल्ह्यासाठी तीन बैठ्या पथकांची नियुक्ती केली आहे. अतिसंवेदनशील परिसरातील महाविद्यालयांवर करडी नजर ठेवली जात आहे. गतवर्षी दोन महाविद्यालयात पेपरफुटीचा प्रकार घडल्यानंतर परीक्षा प्रमाद समितीसमोर दोषींची सुनावणी झाली. चौकशीअंती संबंधीत महाविद्यालयातील दोषींना बडतर्फ केल्यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी पेपरफुटीची धास्तीच घेतली आहे. परीक्षेतील कॉपीबहाद्दरांवरही त्वरीत कारवाई होत आहे. परीक्षार्थींमधील कॉपीबहाद्दरांवर विद्यापीठाची करडी नजर असल्याने 70 टक्के परीक्षा कॉपीमुक्त झाल्या आहेत.
शिवाजी विद्यापीठांतर्गत काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कॉपीकडे दुर्लक्ष केले जायचे. परिणामी गेल्या तीन वर्षात पेपरफुटीसारखे प्रकार उघडकीस आले. संबंधीत कॉपीबहाद्दरांवर कडक कारवाई झालीच, पण पेपरफुटी प्रकरणात महाविद्यालयांतील काही दोषींना नोकरीवरून बडतर्फ केले. त्याचाच धसका कर्मचारी, शिक्षकांनी घेतला आहे. त्यामुळे बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी.च्या परीक्षेत एकही पेपरफुटीचा प्रकार आढळला नसल्याचे समोर आले आहे.
एसआरपीडीवरील प्रश्नपत्रिकांची प्रिंट, झेरॉक्सही काही प्राचार्य आणि शिक्षक स्वत: काढत आहेत. सर्वच महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे निर्वाणीचा इशारा दिल्याने परीक्षेतील पेपरफुटीला आळा बसल्याचे निदर्शनास येत आहे. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी.च्या सर्व परीक्षा सोमवारी संपल्या आता पदव्युत्तर पदवी, एम.ए.च्या परीक्षांना प्रारंभ होत आहे. विद्यापीठ परीक्षा विभागातील अधिकारीही अचानक परीक्षा केंद्रांना भेटी देत असल्याने कारवाईची भीतीही महाविद्यालयांना आहे. महाविद्यालयीन पातळीवर कॉपीचे प्रकार घडत होते. अशा महाविद्यालयांत परीक्षा अतिशय कडक नियमांमध्ये घेतली जात आहे. गतवर्षी मात्र 3 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचे निदर्शनास आले होते. यातील दोषींवर परीक्षा प्रमाद समितीने कडक कारवाई केल्याने आतापर्यंत सुमारे 200 कॉपीचे प्रकार उघडकीस आले. त्यामुळे कॉपीचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे.
परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रयत्न
विद्यापीठ परीक्षा पारदर्शी व्हावी यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. प्रत्येक केंद्र कॉपीमुक्त व्हावे यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. त्यामुळे यंदा 70 टक्के परीक्षेत कॉपीचे प्रमाण कमी झाले आहे. कॉपीसह पेपर फुटी प्रकरणात संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करत परीक्षा द्यावी.
डॉ. अजितसिंह जाधव (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ)
तेरा दिवसात निकाल जाहीर करण्याचा निर्धार
विद्यापीठाने स्वत:ची एसआरपीडीची सिस्टीम विकसित केली आहे. त्यामुळे सुरू असलेल्या परीक्षांचे निकाल 13 दिवसात जाहीर करण्याचा निर्धार परीक्षा विभागाने केला आहे. विद्यार्थ्यांना वेळेत निकाल मिळेल अन त्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग रिकामा होणार आहे.