जतजवळ बोलेरो गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार

जतजवळ बोलेरो गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार

जत, प्रतिनिधी

जत विजापूर गुहागर मार्गावरील जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हवालदार वस्ती जवळ बोलोरो गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.
राजेंद्र आनंदराय बिराजदार वय 35 रा. उटगी व दर्याप्पा संगप्पा बिराजदार वय 34 रा. जाडर बोबलाद असे मयत झालेल्यांची नावे आहेत. तर संजय हनुमंत कोळगिरी रा. उटगी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अधिक माहिती अशी, उटगी येथील हे तिघेही मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी बुलेरो गाडी क्रमांक (एम. एच. 04/2121) मधून निघाले होते. जत नागज रस्त्यावरून त्यांची गाडी भरधाव वेगात जात असतानाच, गाडीचे टायर फुटल्याने ती झाडावर जाऊन आदळली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. रात्री अकराच्या सुमारास घडलेली घटना 12:30 च्या आसपास एका वाहनधारकाला लक्षात आल्याने त्यांनी जत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तिघांनाही बाहेर काढले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. पहाटे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यातील मयत राजेंद्र यांचे उटगी येथे कृषी दुकान आहे. तर अन्य दोघे शेती करतात. या घटनेने उटगी व जाडर बोबलाद परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे.