बंधाऱ्यावरून वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह शिरटीला सापडला

बंधाऱ्यावरून वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह शिरटीला सापडला

रविवारी सकाळी युवक नदीपात्रात पडला होता

सांगली प्रतिनिधी

येथील कृष्णा नदीवरील सांगली बंधाऱ्यावरून सांगलीवाडीकडील बाजूला मैत्रिणीबरोबर सेल्फी घेताना तोल गेल्याने रविवारी कृष्णा नदीच्या पात्रात पडलेल्या मोईन गौसपाक मोमीन वय 24, रा. हनुमाननगर सांगली या तरूणांचा मृतदेह 48 तासानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडीनजीक असणाऱ्या शिरटी गावातील कृष्णानदीत आढळून आला. तीन दिवसापासून शोध सुरू होता. मंगळवारी सकाळी मृतदेह आढळून आला. त्याच्या शोधमोहिमेत स्पेशल रेस्क्यू फोर्स, आयुष हेल्पलाईन टीमकडून सहभाग घेण्यात आला.
मोईन हा बॉक्सिंगचा प्रशिक्षक होता. सांगलीतील एका मैत्रिणीसोबत तीन दिवसापूर्वी कृष्णा नदीकाठावरील बंधाऱ्यावर तो आला होता. सांगलीवाडीच्या बाजूने तो चालत नदीवरील बंधाऱ्यांच्या बरोबर मधोमध आला. तेथेच तो सेल्फी घेत होता. त्यावेळी त्याचा तोल गेला. हा सेल्फी घेताना मोईन नदी पात्रात पडला. याबाबत सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. स्पेशल रेस्क्यू फोर्स, आयुष हेल्पलाईन टीमने बोटीतून तात्काळ शोध घेतला. मात्र तो रविवारी रात्रीपर्यंत मिळून आला नाही. सोमवारी दिवसभर त्याचा पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली.
म्हैसाळ बंधारा, हरिपूर येथून पुन्हा बंधाऱ्याजवळ शोध घेण्यात आला. पाण्याचा प्रवाह वाढल्याने शोध मोहीमेत अडथळा निर्माण होत होता. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी त्याचा मृतदेह आढळून आला. कोल्हापूर जिह्यातील शिरटी येथील नदीपात्रात मृतदेह तरंगत असल्याची माहिती पथकाला मिळाली. तातडीने पथक घटनास्थळी दाखल झाले मृतदेह पाहण्याबाहेर काढला त्यावेळी हा मृतदेह मोईन याचा असल्याचे स्पष्ट झाले. 48 तासानंतर वाहून गेलेल्या तऊणाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आला. या शोध मोहीमेत अमीर नदाफ, कैलास वडर, महेश गव्हाणे, योगेश आवटे, गणेश आवटी, मोहसीन शेख, योगेश मदने, सुरज शेख, ऊद्र कारंडे, अविनाश पवार यांना सहभाग घेतला. याबाबत अद्यापही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नाही.