रशिया : युक्रेन युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वॅग्नर ग्रुपचे भाडोत्री सैनिक आता कुठे आहेत?
रशिया-युक्रेन युद्धाच्या निमित्ताने रशियातील वॅग्नर ग्रुप (Wagner Group) चर्चेत आला. रशियातील या खासगी सैन्य समुहाचे प्रमुख होते, येवगेनी प्रिगोझिन. गेल्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला 24 ऑगस्ट 2024 रोजी एक वर्ष पूर्ण झालं.
वॅग्नर ग्रुप भाडोत्री सैनिक पुरवतो. पण प्रिगोझिन यांच्या मृत्यूनंतर या ग्रुपमध्ये काम करणाऱ्या भाडोत्री सैनिकांचं नेमकं काय झालं? याबाबत एक वर्षानंतरही काही स्पष्ट झालेलं नाही.या ग्रुपचे सैनिक युक्रेन, सीरिया आणि आफ्रिकेच्या काही भागात सक्रिय होते, तिथे ते युद्धात सहभागी होते.
बीबीसीच्या रशिया सेवेनं वॅग्नर ग्रुपच्या माजी सदस्यांशी आणि सैनिकांसह इतर संबंधित व्यक्तींशी याबाबत चर्चा केली. विमान अपघातात प्रिगोझिन यांचा मृत्यू झाल्यावर आणि रशियाबरोबर करार झाल्यानंतर या ग्रुपमधील भाडोत्री सैनिकांचं किंवा लढवय्यांचं अखेर काय झालं? हे आम्ही या चर्चेतून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पळून जाण्यात यशस्वी झालेला सैनिक
2023 चा सप्टेंबर महिना होता. निळ्या डोळ्यांचा एक तरुण इस्तांबूल विमानतळाच्या चेक-इन काउंटरवर उभा होता.किफाया (डोकं आणि चेहऱ्यावर गुंडाळलेलं लांब कापड) परिधान केलेला हा तरुण लिबियाला जाणार होता. दुसऱ्या एखाद्या आफ्रिकन देशात नवीन नोकरी करण्याचा त्याचा विचार होता. या तरुणानं वॅग्नर ग्रुपमध्ये सैनिक म्हणून काम केलं आहे.
अब्जावधी रुपयांच्या कंपन्या आणि प्रकल्प यावर वॅग्नर ग्रुपचं नियंत्रण होतं. पण हा ग्रुप फक्त रशियामध्येच सक्रिय होता असं नव्हे. सिरिया, माली, मध्य आफ्रिका, सुदान आणि लिबिया या देशांमध्येही हा ग्रुप सक्रिय होता.
रशियानं युक्रेनवर हल्ला केला त्यावेळी वॅगनर ग्रुपच्या सैनिकांची महत्त्वाची भूमिका होती.
ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयानं युक्रेनमध्ये वॅग्नर ग्रुपचे जवळपास 50 हजार सैनिक होते, असा अंदाज व्यक्त केला होता.
बीबीसीच्या रशिया सेवेला मिळालेल्या एका यादीनुसार, वॅग्नर ग्रुपच्या जवळपास 20 हजार सैनिकांचा बखमूतमधील युद्धात मृत्यू झाला होता. त्यातील बहुतांश आधी कैदी होते.
प्रिगोझिन यांनी मे 2023 मध्ये रशियाच्या संरक्षण मंत्रालयावर शस्त्रांचा पुरेसा पुरवठा न करण्याचा आरोप केला होता. तसंच युक्रेनच्या सैन्याबरोबर युद्ध करत असलेल्या त्यांच्या सैनिकांना परतही बोलावलं होतं.
त्यानंतरच हा किफाया परिधान केलेला तरुण पळून जाण्यात यशस्वी ठरला होता.
या तरुणाला टेलिग्रामवर एक संदेश मिळाला. त्यात त्याला “न्यायासाठीच्या लढाईत” सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
पुतिन यांच्याच विरोधात बंड
वॅग्नर ग्रुप रशियाच्या बाजूनं युक्रेन विरुद्ध युद्धात लढत होता. मात्र एक वेळी अशी आली की या ग्रुपनं पुतिन यांच्या विरुद्धच बंड पुकारलं. वॅग्नर ग्रुपनं पुतिन यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी हा तरुणही वॅग्नर ग्रुपमध्ये होता. पण, आता तो रशियातून बाहेर इतर देशात गेला आहे.
प्रिगोझिन सेल्फीसाठी पोझ दिल्यानंतर कारनं कुठेतरी जात होते, तेव्हा या तरुणानं त्यांना शेवटचं पाहिलं होतं.
वॅग्नर ग्रुपनं पुतिन यांच्याविरोधात बंड पुकारल्यानंतर मॉस्कोच्या दिशेनं चाल करून जाण्याची घोषणा केली होती.
मात्र, नंतर त्यांची ही मॉस्कोच्या दिशेनं केलेली चाल रोखण्यात आली. त्यावेळी पुतिन यांचा प्रिगोझिन यांच्याबरोबर करार झाला होता. करारानुसार वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांसमोर दोन पर्याय असणार होते. त्यांना रशियन सैन्यात सामील किंवा भरती होता येणार होतं किंवा प्रिगोझिन यांच्यासोबत बेलारूसला जाता येणार होतं. “वॅग्नर ग्रुपमधलं माझं करिअर संपल्याचं तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं,” असं हा तरूण म्हणाला.”या करारात हलगर्जीपणा किंवा चालढकल शक्य नव्हती. काही जण बेलारूसला गेले. तर काही इतरत्र ठिकाणी गेले. पण काहीही निश्चित नव्हतं. अशावेळी मी स्वत:च्या हितासाठी निर्णय घेतला,” असं त्यानं सांगितलं.
वॅग्नर ग्रुपचं भवितव्य बदलणारा दिवस
दोन महिन्यांनी म्हणजे 23 ऑगस्ट 2023 रोजी मॉस्कोच्या उत्तर भागात प्रिगोझिन यांचं विमान कोसळलं. त्यात प्रिगोझिन यांचा मृत्यू झाला. या विमान अपघातात प्रिगोझिनसह वॅग्नर ग्रुपचे इतर अनेक सदस्य मारले गेले होते.
या विमान अपघातात रशियाचा (म्हणजेच पुतिन यांचा) हात असल्याची चर्चा होत होती. तशा अफवा तेव्हा पसरल्या होत्या. मात्र रशियानं या प्रकरणात कोणताही हात असल्याच्या अफवांचं खंडन केलं होतं. अर्थात वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांसह अनेक जणांचा यावर विश्वास नाही. वॅग्नर ग्रुप सोडलेला हा तरुण म्हणाला की, प्रिगोझिन यांची हत्या झाल्यानंतर माझ्यासाठी रशियात काही करण्यासारखं राहिलं नव्हतं.
त्यामुळंच या तरुणानं त्याच्यासमोर असणाऱ्या पर्यायांची माहिती घेतली.
किफाया घातलेल्या या तरुणाकडं वैध पासपोर्ट होता. त्याच्याकडं बचत केलेली काही रक्कम आणि युद्धात लढण्याचा अनुभव होता. त्या तरुणानं सीरियात जाण्याचा पर्याय निवडला. कारण यापूर्वी तो सीरियात लढला होता.
बीबीसीच्या रशिया सेवेशी बोलताना दोन सुत्रांनी म्हटलं की, सिरियामध्ये जे भाडोत्री सैनिक होते, त्यांना रशियन सैन्यात सामिल होण्याची ऑफर देण्यात आली होती.वॅगनर ग्रुपच्या एका माजी सैनिकानं म्हटलं की, अशा भाडोत्री सैनिकांसमोर दोन पर्याय होते. रशियन सैन्यात सामील होणं किंवा जे होईल त्यासाठी तयार राहणं.
वॅग्नरच्या सैनिकांनी कोणता पर्याय निवडला
वॅग्नरच्या एका माजी सैनिकानं म्हटलं की, त्यांना ही ऑफर स्वीकारायची नव्हती म्हणून ते दोन महिने गप्प राहिले. तरीही त्यांना पैसे मिळत राहिले. त्यांनी आफ्रिकेला जाऊन नोकरी करण्याचा पर्याय निवडला तेव्हा त्यांना कोणीही अडवलं नाही. याच काळात उत्तर आफ्रिकेत जाणाऱ्या लोकांमध्ये रशियाचे उप संरक्षण मंत्री युनूस बेक येवकुरोव देखील होते. युनूस यांच्यासोबत रशियाच्या गुप्तहेर संस्थेतील काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा होते. लिबिया, बुर्किना फासो, मीला, नायजर सारख्या ज्या देशांमध्ये वॅग्नर ग्रुप सक्रिय होता, तिथे हे लोक गेले.
रॉयल युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ब्रिटनमधील एक थिंक टँक आहे. त्यांच्या एका अहवालानुसार, युनूस म्हणाले की, वॅग्नर ग्रुपला आधीपासूनच ज्या गोष्टींचं आश्वासन देण्यात आलं आहे त्यांचं पालन केलं जाईल. मात्र आता थेट रशियाच्या संरक्षण मंत्रालयासोबत बोलणी होईल.
अहवालात म्हटलं आहे की, आफ्रिकेत वॅग्नर ग्रुप आता सरकारला लष्करी मदत पुरवतं. यामध्ये इस्लामिक आणि इतर घुसखोरांविरोधात मदत करण्यासारख्या कामांचाही समावेश आहे.
त्याबदल्यात वॅग्नर ग्रुपला व्यूहरचनात्मकदृष्ट्या महत्त्वाची असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती हवी आहे.
रशियाचं हित आणि वॅग्नर ग्रुप
माली, नायजर आणि बुर्किना फासोमध्ये मागील काही वर्षांपासून सैन्याच्या हाती सत्ता आहे. या देशांनी फ्रान्सपासून अंतर राखलं आहे आणि रशियाशी जवळीक वाढवली आहे.
मात्र, ब्रिटनच्या थिंक टँकच्या अहवालात म्हटलं आहे की, लिथियम, सोनं आणि युरेनियमसारख्या खनिजांमध्ये रशियाला रस आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाकडून 2023 च्या अखेरीस आफ्रिकन कोअरसाठी नियुक्ती जाहीर करण्यात आली. किफाया घातलेला तो माजी भाडोत्री सैनिक म्हणाला की, माझ्या मनात जो आफ्रिकन देश होता, मी तिथे पोहोचलो. त्याच्या मते, भाडोत्री सैनिकाचं काम दुसऱ्या इतर कामांसारखंच आहे. मला युक्रेन किंवा बेलारूसपेक्षा आफ्रिकेचा पर्याय चांगला वाटला. त्याचे अनेक माजी सहकारी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाबरोबर काम करू लागले आहेत. नव्यानं बनवण्यात आलेल्या युनिट्समध्ये ते तैनातही झाले आहेत. अर्थात प्रिगोझिन यांच्यासोबत काम केलेल्या एका सूत्रानं बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की, त्यांचा मुलगा पावेल अजूनही स्वत:चा प्रभाव राखून आहे.
सूत्रानं म्हटलं की, पावेल यांना आफ्रिकेत वडिलांचा वारसा सांभाळण्याची परवानगी रशियाकडून मिळाली आहे. मात्र यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे, यामुळे रशियाच्या हिताला धक्का लागता कामा नये.
पावेल रशियाच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत नाही तर नॅशनल गार्ड अंतर्गत वॅगनर ग्रुप चालवत आहेत, असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता.
भरतीसाठी जाहिरात
ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयानं फेब्रुवारीमध्ये म्हटलं होतं की, वॅग्नर ग्रुपशी संबंधित तीन तुकड्यांना रोसग्वार्डियामध्ये तैनात करण्यात आलं. आधी या तुकड्यांना युक्रेन किंवा आफ्रिकेत तैनात केलं जाईल, अशी शक्यता होती.
याबाबत पावेल यांच्या भूमिकेबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही. बीबीसीनं विचारलेल्या प्रश्नांना पावेल यांनी उत्तर दिलं नाही.
तसं पाहता, वॅग्नर ग्रुपच्या भाडोत्री सैनिकांबद्दल अधिकृतपणे फारच कमी माहिती उपलब्ध आहे. त्याचबरोबर आता त्यांना नोकरीवर कोणी ठेवलं आहे? याबद्दल देखील स्पष्ट माहिती नाही.
मात्र, या भाडोत्री सैनिकांच्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर अजूनही भरतीसंदर्भात जाहिराती पोस्ट केल्या जात आहेत. यामध्ये संबंधित मोहीम “एखाद्या दूर ठिकाणी” असल्याचं सांगितलं जातं आहे.
वॅग्नर ग्रुपच्या आधारे रशिया आपल्या आंतरराष्ट्रीय उद्दिष्टांना साध्य करतं आहे. शिवाय हे धोरण अवलंबून रशिया आंतरराष्ट्रीय समुदायाकडून लादल्या जाणाऱ्या निर्बंधापासूनही स्वत:चा बचाव करतं आहे.
त्याचबरोबर अशा कोणत्याही कामात स्वत:सहभाग असल्याचं रशियाला फेटाळताही येत आहे.
अनेक माजी भाडोत्री सैनिकांनी आतापर्यंत भूमिका स्पष्ट केलेली नाही. तसंच रशियाच्या संरक्षण मंत्रालयाला विरोधही केलेला नाही.
युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियन सैन्यानं एक गोपनीय व्यवस्था तयार केली. त्यात भाडोत्री सैनिकांचाही समावेश आहे. याला रेडट असं नाव देण्यात आलं आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये केलेल्या तपासात ‘रेडिओ फ्री युरोप’ला आढळलं की रेडट पीएमसी बॅनर अंतर्गत 20 वेगवेगळ्या ठिकाणी भरती प्रक्रिया केली जाते.
रेडट रशियन सैन्याच्या गुप्तहेर विभागाकडून चालवली जाणारी “बनावट खासगी लष्करी” कंपनी (फेक प्रायव्हेट मिलिटरी कंपनी) आहे, असं या तपासातून समोर आलं.
रेडटची अधिकृत कागदपत्रे बीबीसीच्या हाती लागलेली नाहीत. ही कंपनी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाशी संबंधित आहे, अनेक सूत्रांचं म्हणणं आहे. रेडट आणि रशियानं बीबीसीच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत.
कुठे असू शकतात वॅग्नरचे सैनिक?
मेडवेटी-बियर्स-81 स्पेशल ऑपरेशन ब्रिगेडमध्ये सामील झालेल्या वॅग्नर ग्रुपच्या भाडोत्री सैनिकांकडून बीबीसीनं माहिती घेतली.
इंटेलिजन्स रिसर्चर आणि पश्चिम आफ्रिकेचे संरक्षण तज्ज्ञ नोमेड साहेलिन यांच्या मते, ते भाडोत्री सैनिक रेडटशी जोडलेले आहेत. ते स्वत:ला स्पेशल ब्रिगेड म्हणत असले तरी ते एका खासगी लष्करी कंपनीसारखे आहेत.
ऑगस्ट 2023 मध्ये सैन्याला पाठिंबा दर्शवणाऱ्या सोशल मीडिया पेजवर या युनिटमधील भरतीसाठी जाहिराती पोस्ट करण्यात आल्या.
जाहिरातींमध्ये आम्हाला वैमानिक, तंत्रज्ञ हवे आहेत, एमआय-8, एमआय-24 हेलकॉप्टर हवेत असं लिहिलं होतं.
“सहा महिन्यांचा करार असेल आणि दरमहा 2500 डॉलर दिले जातील. शिवाय काही सुविधासुद्धा दिल्या जातील. वय 22 ते 50 वर्षे. क्रिमियामध्ये या, आम्ही प्रशिक्षण देऊ, कपडे देखील उपलब्ध करून देऊ.” असंही यात लिहिलं होतं.
या जाहिरातीमध्ये क्रिमियामध्ये जाण्याबद्दल सांगण्यात आलं होतं. मात्र, नोमेड यांच्या मते, याचं मुख्यालय बुर्किना फासोमध्ये आहे आणि 2500 ते 4000 डॉलर दरम्यान वेतन दिलं जाईल.वॅग्नर गुपच्या माजी सैनिकांशी झालेल्या संभाषणाच्या आधारे बीबीसीला आढळलं की, अनेक भाडोत्री सैनिकांनी आफ्रिकेत राहण्याचा पर्याय निवडला. यात बुर्किना फासो चाही समावेश आहे. हे माजी भाडोत्री सैनिक चेचन्यामध्ये असण्याचीही शक्यता आहे.
‘सर्वकाही वॅग्नर सारखंच’
एप्रिल महिन्यात चेचन्याचे नेते रमजान कदयोरोव्ह म्हणाले होते की, भाडोत्री सैनिकांमधील जवळपास 3000 जण अखमतच्या स्पेशल फोर्स ग्रुपमध्ये सामील झाले आहेत. तास या रशियन वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे.
वॅग्नर ग्रुपशी संबंधित अॅलेक्झांडर कुझनेत्सोव्ह या प्रसिद्ध व्यक्तीला ‘रेटीबर’ या नावानंही ओळखलं जातं.
ते एका व्हीडिओमध्ये बोलताना दिसतात की, “सर्वकाही वॅग्नरसारखंच असेल. कोणतीही कागदोपत्री प्रक्रिया किंवा इतर काहीही नाही. आमची काम करण्याची पद्धत आधीसारखीच असेल. काहीही बदलणार नाही.”
3,000 भाडोत्री सैनिक अखमतला गेल्याच्या दाव्याची बीबीसीनं पुष्टी केलेली नाही.
लष्करी हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या रिसर्च प्रोजेक्ट बेलारुस्की हाजुननुसार, बेलारूसला जाणाऱ्या भाडोत्री सैनिकांची संख्या 100 पेक्षा कमी आहे. ते लोक तिथल्या सैन्याला प्रशिक्षण देण्याचं काम करत आहेत.
28 जुलैला मालीमध्ये वॅग्नरचे भाडोत्री सैनिक असल्याचं वृत्त आलं होतं.
वॅग्नर पीएमसीच्या टेलिग्राम चॅनलवर एक वक्तव्यं जारी करण्यात आलं आणि सांगण्यात आलं की, काही भाडोत्री सैनिक मारले गेले आहेत. त्यामध्ये एक कमांडरचा देखील समावेश आहे. मात्र मरण पावलेल्यांची संख्या नाही.
अनेक रशिया समर्थक टेलिग्राम चॅनलकडून सांगण्यात आलं की, अनेक वॅग्नर सैनिक मारले गेले आहेत. या ग्रुपचं आफ्रिकेतील हे सर्वात मोठं नुकसान असू शकतं.
भाडोत्री सैनिकांबद्दल ते आफ्रिकन कोअरचा भाग आहेत, असं मानलं जातं. मात्र, यासंदर्भात रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून अधिकृत वक्तव्यं करण्यात आलेलं नाही. किफाया घातलेल्या तरुणानंही तेव्हापासून आमच्या संदेशाला उत्तर दिलेलं नाही. मात्र, त्याच्या आईच्या सोशल मीडिया पेजवर श्रद्धांजली देणारी एक पोस्ट आम्हाला दिसली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
Published By- Priya Dixit