लेंडी नाल्याचा प्रश्न तातडीने सोडवा

शेतकरी संघटनेची खासदार शेट्टर यांच्याकडे मागणी : पाठपुरावा करण्याचे आश्वासन बेळगाव : शहरातून पाणी वाहून नेणारा लेंडी नाला वारंवार फुटून शिवारात पाणी शिरत आहे. हा नाला बळ्ळारी नाल्याला जाऊन मिळतो. त्यानंतर ते पाणी राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या पूर्वेकडच्या बाजूला जाणे महत्त्वाचे आहे. मात्र, या महामार्गाला असलेले बॉक्स पूर्णपणे बुजून गेल्याने दरवर्षी समस्या निर्माण होत आहे. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सूचना करून तातडीने […]

लेंडी नाल्याचा प्रश्न तातडीने सोडवा

शेतकरी संघटनेची खासदार शेट्टर यांच्याकडे मागणी : पाठपुरावा करण्याचे आश्वासन
बेळगाव : शहरातून पाणी वाहून नेणारा लेंडी नाला वारंवार फुटून शिवारात पाणी शिरत आहे. हा नाला बळ्ळारी नाल्याला जाऊन मिळतो. त्यानंतर ते पाणी राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या पूर्वेकडच्या बाजूला जाणे महत्त्वाचे आहे. मात्र, या महामार्गाला असलेले बॉक्स पूर्णपणे बुजून गेल्याने दरवर्षी समस्या निर्माण होत आहे. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सूचना करून तातडीने ही समस्या सोडवा,अशी मागणी शहर शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे करण्यात आली आहे. बळ्ळारी नाल्याची खोदाई झाली नसल्यामुळे ती समस्याही दरवर्षी डोकेदुखी ठरू लागली आहे. लेंडी नाला हा शहरातील सर्व सांडपाणी वाहून नेणारा नाला आहे. मात्र, या नाल्याची खोदाई केली गेली नाही. वास्तविक हा नाला काँक्रिटचा करणे महत्त्वाचे आहे.
या नाल्यातून पाण्याचा निचरा झाला तर शहराला येणारा पूर कमी होऊ शकतो. विशेषकरून शास्त्राrनगर, मराठा कॉलनी, टिळकवाडी, मंडोळी रोड या परिसरात त्यामुळेच पूर येत आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करा आणि या नाल्याची दुरुस्ती करा, असे या निवेदनात म्हटले आहे. लेंडी नाल्याचे पाणी शिवारात शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ते नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. दरवर्षीच हा फटका बसत आहे. तेव्हा आता तुम्हीच आम्हाला सहकार्य करावे, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. खासदार जगदीश शेट्टर यांनी निश्चितच याबाबत पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. यावेळी नारायण सावंत, एम. जी. सावंत, पी. जे. पावशे, एम. एम. पावशे, ए. वाय. पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.